‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगात संत नामदेवांनी आई व बाळाच्या उदाहरणाद्वारे आपले व परमेश्वराचे नाते सांगितले आहे.
आगीच्या तडाख्यात सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी जशी त्याची दयाळू, प्रेमळ आई धाव घेते, तसा तू माझ्यासाठी धाव घेतोस. मी तुला शरण आलेला दास आहे, असा भाव संतकवी नामदेव विठ्ठलाजवळ व्यक्त करत आहेत. आई-बाळाच्या उदाहरणाद्वारे कवीची परमेश्वर भेटीची तीव्रता, कळकळ व्यक्त होते. भक्ती, प्रेम, विरह, व्याकुळता अशा सर्व भावभावना उत्कटपणे येथे व्यक्त झाल्या आहेत. आई-मुलाच्या नात्यातील प्रेम कवी स्वत:च्या व भगवंताच्या नात्यात शोधू पाहतो.
नि:स्वार्थ भावनेने मुलाला अखंड जपणारी आई ज्याप्रमाणे मुलाला संकटापासून दूर करते त्याचप्रमाणे माझी विठूमाऊली माझ्यासाठी नेहमीच धावत येते. या उत्कट प्रेमनेच मला परमेश्वराचा दास केले आहे. असा परमेश्वरावरील अपार प्रेमभाव व अतूट श्रद्था नामदेवांनी येथे व्यक्त केली आहे.