उपयोजित लेखन: कथालेखन

स्वतंत्र्याचे गोल

       रामपूर नावाचे गाव होते. त्या गावातील राजाचे शासन अतिशय कठोर होते. कोणीही छोटा-मोठा गुन्हा केला, तर त्याची रवानगी थेट कैदखान्यात होत असे. लक्ष्मण नावाचा एक तरुण मात्र निष्पाप असूनही कैदेत सापडला होता. कैदेत असताना त्याला रोजचे जेवण वेळेवर मिळत होते; मात्र बाहेरचे जग आणि नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटला होता. एके दिवशी तेथील गावप्रमुखाने कैदखान्याला भेट दिली आणि कैदखान्याचे निरीक्षण केले. लक्ष्मणने ती संधी समजून त्या गावप्रमुखाकडे सुटकेसाठी विनंती केली. लक्ष्मणचे आजवरचे वर्तन व प्रामाणिकपणा पाहून गावप्रमुखाला त्याची दया आली. त्याने आपल्या सैनिकांना लक्ष्मणची सुटका करण्याचे आदेश दिले व त्याला काही आर्थिक मदतही देऊ केली.
       कैदखान्यातून सुटका झालेला लक्ष्मण थेट पक्षी बाजारात आला. गावच्या पक्षीबाजारात पिंजऱ्यात अनेक पक्षी विक्रीसाठी ठेवले होते. त्याने आपल्याला मिळालेल्या पैशांतून हे पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेतले. पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. लक्ष्मणने एकामागोमाग एक साऱ्या पक्ष्यांना पिजऱ्यातून मुक्‍त केले. पिंजऱ्यातून मुक्‍त होताच पक्ष्यांनी आनंदाने आकाशात भरारी घेतली. त्या भरारी घेणाऱ्या पक्ष्यांकडे लक्ष्मण आनंदाने पाहत राहिला. पक्षी विक्रेत्याने त्याला विचारले, “अरे लक्ष्मण, हे तू काय केलेस?” त्यावर त्याने हसत हसत उत्तर दिले, “माणूस असो, की प्राणी किंवा पक्षी, कैदेत राहणे कोणालाच आवडत नाही. प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याचे मोल प्राणापेक्षाही श्रेष्ठ वाटते. मी स्वत: हा अनुभव घेतला आणि म्हणून या साऱ्या पक्ष्यांना मी मुक्‍त केले.”
        हे सांगताना लक्ष्मणच्या चेहऱ्यावरील स्वत:च्या आणि पक्ष्यांच्या सुटकेचा आनंद तर दिसत होताच; पण त्याचबरोबर आपण केलेल्या एका चांगल्या कामाचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते.

तात्पर्य: स्वातंत्र्य अनमोल असते.

प्रयत्नांती परमेश्वर

       रायबा नावाचा एक गरीब शेतकरी होता. त्याची जमीन कोरडवाहू होती. आपल्या कुटुंबापुरते कसेतरी उत्पन्न त्याला मिळत असे; मात्र शेतजमीन कोरडवाहू असल्यामुळे त्याने केलेल्या परिश्रमाचा मोबदला त्याला म्हणावा तसा मिळत नव्हता. पावसाची उशिरा सुरुवात व अपुरे प्रमाण यांमुळे त्याने केलेल्या कष्टाचे फळ त्याला मिळत नव्हते. काय करावे त्याला काहीच सुचत नव्हते. दारिद्र्याने पिचलेला तो गरीब शेतकरी पार हवालदिल झाला होता. एके दिवशी रायबाने आपल्या मित्राकडून शेतीतल्या नव्या प्रयोगांबद्दल ऐकले. त्याने मनाशी निश्‍चय केला. आपणही प्रयोग करून पाहायचे. कठोर परिश्रम घ्यायचे आणि शक्‍य होतील तेवढे प्रयत्न करायचे.
       या नव्या प्रयोगामध्ये त्याने माती परीक्षण करून घेतले. त्यानुसार योग्य त्या पिकांची लागवड करून आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला. आपल्या शेतीच्या देखभालीकरता त्याने रात्रंदिवस कष्ट केले. याचा परिणाम म्हणजे त्याच्या उत्पन्नात भरभराट झाली. रायबाचे नाव सर्वदूर पोहोचले. त्याला मिळालेल्या यशाने तो आनंदी झाला. त्याची शेती पाहण्याकरता जिल्ह्यातील अनेक शेतकरी त्याच्या शेतीला भेट देऊ लागले. रायबा अगदी आनंदाने आपल्या शेतीची इतर शेतकऱ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन करू लागला. त्याच्या शेतीतील कार्याची दखल शासनाने घेतली आणि अभिनव शेती पद्धतीचा राष्ट्रीय पुरस्कार रायबाला जाहिर झाला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

तात्पर्य: प्रयत्न करणे हे आपल्या हाती असते. ते करत राहिलो तर यश नक्कीच मिळते.

हत्ती आणि चिमणी

        जंगलातील एका झाडावर एक चिमणी आणि चिमणा आनंदाने राहात होते. चिमणा-चिमणीच्या या जोडप्याने आपले घरटे झाडाच्या फांदीवर बनवले होते. चिमणीने त्यात अंडी दिली होती. थोड्याच दिवसांत त्या अंड्यांतून छोटी छोटी पिले बाहेर आली. चिमणा-चिमणीचा आनंद गगनात मावेना. चिमणी घरट्यात बसून पिल्लांची काळजी घेई, तर चिमणा आपल्या पिल्लांसाठी काही न काही खायला घेऊन येई. त्या दोघांच्या संसारात आलेल्या नव्या पाहुण्यांच्या आगमनाने त्यांची कामाची लगबग खूप वाढली होती.
        एके दिवशी त्याच जंगलातील एक हत्ती आपल्याच मस्तीत फिरत होता. कुठे फांदी वाकव, कुठे झाडच मुळासह उपटून टाक असा धुमाकूळ घालत तो जंगलभर फिरत होता. त्या अवस्थेत त्याला कशाचेही भान नव्हते. चित्कार करतच तो चिमणीचे घरटे असलेल्या झाडापाशी आला. चिमणीचे घरटे असलेली फांदी आपल्या सोंडेने हलवू लागला. चिमणीने चिव चिव करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो आपल्याच मस्तीत जोरजोराने फांदी हलवत होता. अखेरीस व्हायचे तेच झाले. फांदी तुटली आणि चिमणीचे घरटे त्या फांदीबरोबर खाली कोसळले. चिमणीची पिल्ले त्या घरट्यातून जमिनीवर पडली आणि मरण पावली. एवढ्यात चिमणा तेथे आला. झाल्या प्रकाराने चिमणा-चिमणी हादरून गेले होते. ते जोरजोरात रडत होते. हत्ती अजूनही धुमाकूळ घालत होता.
        बाजूच्या झाडावरील सुतारपक्ष्याने हे दृश्य पाहिले. तो चिमणीकडे गेला. त्याने चिमणीला धीर दिला. परत घरटे बांधण्याचा सल्ला दिला. सुतारपक्षी उडत उडत हत्तीपाशी गेला. त्याने आपल्या चोचीने हत्तीच्या कपाळावर प्रहार करताच हत्ती भानावर आला. त्याने हत्तीला झालेला प्रकार सांगितला. हत्तीला आपली चूक समजली. तो वारंवार चिमणा-चिमणीची माफी मागू लागला. सुतारपक्ष्याने हत्तीला समजावले, आपल्या आनंदासाठी इतरांना दु:ख देणे योग्य नाही. हत्तीला आपल्या वागण्याचा पश्‍चात्ताप झाला.

तात्पर्य: एखादी गोष्ट करण्यापूर्वी विचार केला, तर नंतर पश्‍चात्ताप करण्याची वेळ येत नाही.

परीक्षेची परीक्षा

        मार्च महिना म्हटला, की शाळांमध्ये सुरू असते परीक्षांची लगबग. मार्च २०२० उगवला आणि परीक्षा कालावधी असल्याने सारेच तयारीला लागले. सारे विद्यार्थी आपल्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त होते. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी जवळपास पूर्ण झाली होती आणि ते परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते.
        अशातच जगभरातून कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या बातम्या येऊ लागल्या आणि एक एक शहर बंद होऊ लागले. कोरोना विषाणूवर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नसल्यामुळे सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये ‘बंद’ घोषित केला. मग अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सेवा ठप्प झाल्या. शाळा बंद पडल्या. सुरू असलेल्या परीक्षा थांबवल्या गेल्या. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणालाही काही कळत नव्हते. सामाजिक परिस्थिती अतिशय बिकट होती. ‘नेमेचि येतो पावसाळा’ या धर्तीवर ‘नेमेचि येती परीक्षा’ असे समजून परीक्षा देणाऱ्या आणि त्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली. अनेक विद्यार्थी खूश होते. काही जणांची परीक्षा झाली, तर काही जण परीक्षेची वाट पाहत राहिले. कोरोनाने जणू परीक्षेची परीक्षा घेतली होती. विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली होती. आपण पास होणार की नापास? आपल्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार, की नाही या चिंतेत सारा विद्यार्थीवर्ग होता. अशातच निकाल जाहिर झाले. न झालेल्या विषयांच्या पेपरचे गुण सरासरी गुणांच्या आधारे देऊन निकाल देण्यात आला होता. अनेकांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतोने घेण्यात आल्या. जवळपास सारे विद्यार्थी आनंदित होते. काहीजणांना, तर परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात संधी मिळाली होती.
        या सार्‍या परिस्थितीचा सामना केल्यावर एका गोष्टीचा बोध झाला, की निसर्गापुढे माणूस अगदी क्षुल्लक आहे. निसर्ग ही मानवाची निर्मिती नाही, तर मानव हा निसर्गाची निर्मिती आहे, मानवाला आपले स्थान या निसर्गाने दाखवून दिले. निसर्गावर विजय मिळवू पाहणाऱ्या माणसाला त्याने वठणीवर आणले.

तात्पर्य: निसर्गापुढे मानव क्षुल्लक असून त्याचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मानवाचा विनाश अटळ आहे.

कष्टाचे फळ

        सावर्डे नावाच्या खेड्यात एका गरीब कुटुंबात महेंद्रचा जन्म झाला. आपल्या विद्यार्थिदशेत त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. दोन वेळचे जेवण मिळणेदेखील कठीण होते. गरिबीचे चटके असह्य होऊन निराशेच्या भरात तो एकदा जंगलात निघून गेला. मनात विचार येत होते, की कधीच घरी परत जायचे नाही. चालून चालून थकल्यामुळे एका झाडाखाली तो बसला. इकडे तिकडे पाहत असताना त्याने काही रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहिला. त्याच्या मनात चटकन काहीतरी विचार चमकला. झाडाचा शेंडा तुटलेला आहे; पण झाड अजूनही जिवंत आहे. नव्या फांद्यांनी, पानांनी ते बहरत आहे. त्याने हार मानलेली नाही. लढण्याची वृत्ती आपण दाखवली, तर आपणही असेच झाडासारखे ताठ मानेने जगू शकतो. हे विचार मनात येताच तो उठला.
        महेंद्र जंगलातून परतला, तो एक सकारात्मक विचार मनात घेऊन. त्याची आत्मज्योत जागृत झाली होती. त्याने मनाशी ठरवले आता रडायचे नाही, तर लढायचे. घरकाम करून रात्रशाळेत जात त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महाविद्यालयात शिकत असतानाच त्याला लेखनाचा छंद लागला. तो लिहू लागला. त्याचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. लोकांकडून कौतुक होऊ लागले. त्याच्या पुस्तकांचा खप वाढला. त्याला लेखक म्हणून प्रसिद्धी मिळाली आणि त्याचे नाव यशस्वी लेखकांमध्ये घेतले जाऊ लागले.
        कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मोडून पडलो तरीही उभे राहण्याचे धाडस त्या जंगलातील शेंडे तुटलेल्या रोपट्यांकडून महेंद्र शिकला आणि त्याने आपले जीवन यशस्वी करण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.

तात्पर्य: परिस्थितीसमोर न खचता खंबीरपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश निश्‍चितच मिळते.

कल्पकता: यशाचे रहस्य

       रतन नावाचा एक तरुण आपल्या कुटुंबासह सायगाव या गावात राहात होता. त्याचे वडिल पूर्वी गाडी दुरुस्त करण्याचे काम करत. वयोमानाप्रमाणे थकल्यामुळे त्यांनी ते काम सोडले होते. रतनला शेती करण्याची आवड होती; मात्र साधारण जीवनशैली असल्यामुळे त्याच्या मनाप्रमाणे आधुनिक शेती त्याला करता येत नव्हती. नवी यंत्रे विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल त्याच्याकडे नव्हते.
       रतन हा लहानपणापासूनच ज्ञानी आणि धडपड्या वृत्तीचा होता. त्याची कल्पनाशक्ती अफाट होती. एकदा सहज विचार करत असताना त्याच्या डोक्यात काहीतरी चमकले. तो उठला व अडगळीच्या खोलीत गेला. तेथे त्याच्या वडिलांचे काही सामान पडलेले होते. त्या वस्तूंमधून त्याने काही वस्तू उचलल्या. त्याची जोडणी केली. दहा दिवस तो या वस्तूंची उलटसुलट जोडणी करत होता. प्रयत्न फसत होते; पण तो तितक्याच जोमाने पुन्हा सुरुवात करत होता. शेवटी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून त्याने आपल्या शेतीसाठी एक उपयुक्त यंत्र बनवले.
       या यंत्रामुळे शेतीसाठी पाणी देणे सोपे झाले होते. पाणी खेचणाऱ्या पंपाला हे यंत्र बसवल्यानंतर एका ठरावीक काळानंतर पंप आपोआप बंद होत होता. त्यामुळे, शेतीला आवश्यक तेवढेच पाणी मिळू लागले. शिवाय, वीजबचत आणि पाणीबचतही होऊ लागली. त्याच्या या यंत्राची प्रसिद्धी पाहता पाहता सर्वत्र पसरली.
       रतनच्या या कल्पक शोधाबद्दल त्याला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्राप्त झाला. सारेच त्याचे कौतुक करत होते. आपल्याकडे असलेल्या कल्पकतेचा उपयोग केला, तर यश नक्कीच मिळते, हा धडा त्याने साऱ्या तरुणांसमोर घालून दिला.

तात्पर्य: ज्ञानाला कल्पकतेची जोड दिली असता अशक्य ते शक्य होते.

जिद्द

        एका छोट्याशा खेडेगावात रोहिणी तिच्या आईसह आणि दोन बहिणींसह राहत होती. तिचे वडील काही वर्षांपूर्वी देवाघरी गेल्यामुळे घरामध्ये कमावणारे कोणीच नव्हते. नाही म्हणायला आई गावातील धुणीभांडी करी. वडिलांनंतर रोहिणीच्या घरी शेती करणारे कोणीही नसल्यामुळे शेती ओस पडली होती. सर्वसाधारण परिस्थितीत आपल्या बहिणींचा व आपला उदरनिर्वाह होणे कठीण आहे हे रोहिणीने ओळखले.
        रोहिणी मुळातच हुशार होती. तिने आपल्या आईला म्हटले, “आई, तू घरकाम करतेस त्यात आपले घर चालत नाही. त्यापेक्षा आपण आपली शेती केली तर?” रोहिणीच्या आईला तिचे म्हणणे पटले. रोहिणोने मनाशी खूणगाठ बांधली, मी तर शिकणारच; पण माझ्या दोन्ही बहिणींना मी शिकवणार. तिघी बहिणी जिद्दी होत्या. रोहिणी आपल्या बहिणींसह शेतात राबू लागली. मोकळ्या वेळात अभ्यास करत होती. आपल्या बहिणींचा अभ्यास घेत होती. तिचे स्वप्न मोठे होते. तिला पोलीस अधीक्षक बनायचे होते. तिची अभ्यासातील हुशारी आणि शेतात काम करून आलेली शारीरिक व मानसिक कणखरता यांमुळे तिने तिचे स्वप्न साकार केले. ती पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्‍त झाली.
        स्वत:बरोबरच तिने आपल्या बहिणींना शिक्षणाची गोडी लावली. त्यांचे शिक्षण पूर्ण केले. तिच्या दोन्ही बहिणी तिच्यासारख्याच मेहनती होत्या. त्यातील एक शिक्षिका, तर दुसरी सनदी अधिकारी म्हणून नियुक्‍त झाली. घरची परिस्थिती बेताची असतानासुद्धा कष्ट करण्याची व शिक्षणाची आवड असल्यामुळे रोहिणीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले.

तात्पर्य: इच्छा असेल, तर मार्ग सापडतोच.

हिऱ्याची पारख

        ………आणि त्याचे जग पालटले. सुरुवातीला काही दिवस त्याच्यासाठी कठीण होते. इतर विद्यार्थी त्याची टिंगल करत. त्याची भाषा आदिवासी असल्याने तो बोलायला लागला, की इतर विद्यार्थी त्याला हसत. सुरुवातीला राजू या साऱ्यांपासून दूर पळत असे. बोलायला घाबरत असे; पण गुरुजींनी दाखवलेला विश्‍वास आठवत राजूने या साऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्याने गुरुजी काय सांगतात याकडे आपले लक्ष केंद्रित केले.
        रानावनात राहणाऱ्या राजूने अल्पावधीतच आपल्या हुशारीच्या आणि मेहनतीच्या जोरावर सुहास गुरुजींच्या मनात आपली जागा निर्माण केली. गुरुजी त्याला मार्गदर्शन करत. राजूदेखील गुरुजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कान देऊन ऐकत असे. गुरुजींचा प्रत्येक शब्द त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. राजूने आपल्या मेहनतीमुळे दहावीच्या परीक्षेत ९५% गुण मिळवले आणि तो संपूर्ण तालुक्‍यात पहिला आला. गुरुजींनी त्याला प्रेमभराने मिठी मारली आणि राजूच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
        सुहास गुरुजींसारख्या शिक्षकाने जातिवंत हिऱ्याची पारख केली आणि त्याला आकार दिला आणि राजूने त्यांची निवड सार्थ ठरवली.

तात्पर्य: एखाद्या व्यक्तीने आपल्यावर दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी केलेली मेहनत कधीही वाया जात नाही.

मेहनती रिंकी

       ………. आपल्या भावाच्या पावलांवर पाऊल ठेवून रिंकी धावण्याचा सराव करू लागली. तालुका स्तरावरील शालेय स्पर्धा होत्या. रिंकीला शाळेमध्ये या स्पर्धेबद्दल माहिती मिळाली. तिने आपल्या भावाजवळ हट्ट केला, की तिला या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. रिंकीचा भाऊ स्वत: उत्तम धावपटू होता. त्याने शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांची भेट घेतली. शिक्षकांनी रिंकीचा सराव सुरू केला. रिंकी नियमित धाऊ लागली. तिला पळण्यासाठी स्पर्धेकरता बूट हवे होते. तिच्या भावाने बाजारातून ते आणून दिले.
       रिंकीला बूट घालून धावण्याची सवय नसल्यामुळे तिला त्रास होऊ लागला. तिच्या वेगावर त्याचा परिणाम झाला. तिने आपल्या प्रशिक्षकांना याविषयी सांगितले. तिच्या प्रशिक्षकांनी तिला सराव सुरू ठेवायला सांगितला. रिंकीचा सराव सुरू होता. तिच्या अनवाणी धावणाऱ्या पायांना आता बूट घालून धावण्याची सवय झाली होती. अखेरीस तो दिवस उजाडला. तालुकास्तरावर धावण्याच्या स्पर्धेत रिंकीने विक्रमी वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या सरावाचे फळ तिला मिळाले. तिची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली. तिचे स्वप्न मोठे होते. ऑलिंपिक स्पर्धेत देशासाठी खेळण्याचे स्वप्न तिने पाहिले होते. तिने त्या दृष्टीने सराव सुरू केला. अनेक अडचणी येणार होत्या; मात्र रिंकीचा निर्णय पक्का होता. तिचे हेही स्वप्न पूर्ण होणार याची तिला खात्री होती. त्यासाठी जिवापाड मेहनत करण्याची तिची तयारी होती.

तात्पर्य: एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सराव आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच.

जिद्द

       ……….त्या सर्वांच्या अपेक्षेनुसार अभ्यास करू लागली. आपल्या मूळच्या हुशारीला कष्टाची साथ दिल्यामुळे प्रांजलने अल्पावधीतच ब्रेल लिपी आत्मसात केली. अंध मुलांच्या शाळेत आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस तिला खूप त्रास झाला. ती जन्मजात आंधळी नसल्यामुळे तिला अंध व्यक्तींप्रमाणे स्पर्शाने वस्तू ओळखण्याची सवय व्हायला वेळ लागला. तिने त्या गोष्टी आत्मसात केल्या. दहावी व बारावीमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने अंधांसाठी शिक्षणक्षेत्रात काम करण्याचे ठरवले. त्यासाठीचे योग्य प्रशिक्षण घेऊन ती शिक्षिका झाली. आपल्याला मदत करून येथे पोहोचण्यास मदत करणाऱ्या शिक्षकांप्रमाणेच तिने देखील नवे विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. स्वत: अंधत्व अनुभवल्याने ती अंध विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊ शकली. परिणामी, ती उत्तम शिक्षिका बनली.
       सर्वकाही संपले असे वाटत असते तेव्हाच प्रयत्न केले, तर नवे रस्ते आपल्याला सापडतात. प्रांजलने हा रस्ता आपल्या आईवडिलांच्या, गुरुजनांच्या मदतीने आणि स्वकष्टाने मिळवला.

तात्पर्य: कोणत्याही संकटाने खचून न जाता त्यावर मात करण्याची जिद्द मनात ठेवली, तर त्या संकटावर सहज मात करता येते.

जीवनाची परीक्षा

       ……….म्हणाला, “आपल्या वाड्याच्या पश्चिमेकडे तीन खोल्या आहेत. मी तुम्हांला दिलेल्या पैशांतून तुम्ही आज संध्याकाळपर्यंत आपापली खोली कशानंही पूर्ण भरून दाखवायची.” व्यापाराची जबाबदारी घेण्याकरता उत्सुक असलेल्या मुलांना ही परीक्षा क्षुल्लक वाटली. तिन्ही मुलांनी आपापले पैसे घेतले व ते निघून गेले.
       मोठा मुलगा खादाड होता. त्याला खाण्याची हौस होती. त्याने पैसे मिळताच हॉटेल गाठले. चमचमीत पदार्थ, मिठाई खाऊन तृप्त मनाने तो घरी आला. त्याला एवढे सारे पदार्थ खाऊन झोप येत होती. घरी येऊन त्याने पलंगावर अंग टाकले आणि तो झोपी गेला.
       रमणलालचा दुसरा मुलगा त्या खोलीत विचार करत बसला होता. खोली कशाने भरावी याचे उत्तर त्याला सापडत नव्हते. एवढ्यात त्याला रस्त्यावरून गवताचे भारे घेऊन जाणाऱ्या स्त्रिया दिसल्या. त्याने त्या स्त्रियांना थांबवले व त्यांच्याकडून गवत विकत घेऊन खोली गवताने भरू लागला; पण पैसे संपले तरीही खोलीचा निम्मा भाग मात्र रिकामाच राहिला.
       रमणलालने संध्याकाळ होताच फेरफटला मारून आपल्या मुलांनी काय केले हे पाहायचे ठरवले. तो बाहेर आला. पहिल्या मुलाच्या खोलीकडे गेला. खोलीत अंधार होता आणि मुलगा घोरत पडला होता. दुसऱ्या मुलाची खोली गवताने अर्धी भरलेली पाहून रमणलाल तेथून पुढे निघाला. त्याने तिसर्‍या मुलाच्या खोलीकडे मोर्चा वळवला. त्या खोलीतून मंद मंद सुगंध दरवळत होता. खोली स्वच्छ केलेली होती. देवाचा फोटो लावून त्यापुढे दिवा लावून रमणलालचा मुलगा भजन करत होता. भक्तिमय वातावरणाने, दिव्याच्या प्रकाशाने व सुगंधाने संपूर्ण खोली भरलेली होती.
       रमणलालने लगेच आपला निर्णय जाहिर केला, की मी माझा व्यापार तिसऱ्या मुलाच्या हातात देत आहे. इतर दोघांनी त्याच्या सोबत राहून शिका आणि त्याला मदत करा.

तात्पर्य: विचारपूर्वक कामे केली असता कठीण कामेही सहज, सोपी होतात.

एकीचे बळ

       ‘शिवथर’ नावाचं डोंगरात वसलेलं, लहानसं गाव होतं. इतर वस्तीपासून हे गाव जरा दूरच आणि उंचावर होतं. गावात शाळा नव्हती. गावातील काही मोजकीच मुलं आठ किलोमीटर दूर असलेल्या शाळेत जात. मुलींना तर घरातील लोक एवढ्या लांब पाठवायला तयार नसत. त्यामुळे, इथल्या मुली आणि बरीच मुले शिक्षणापासून वंचित होती.
       ‘विद्याधर’ हा त्याच गावातील लोहाराचा मुलगा. त्याला लहानपणापासूनच शिक्षणात रस होता. त्याने त्याचे सुरुवातीचे शिक्षण घरापासून आठ किलोमीटरवर असलेल्या शाळेतून घेतले. पुढे शिष्यवृत्ती मिळवून शहरातील शाळेत वसतिगृहात राहून तो उच्चशिक्षित झाला. सरकारी शाळेत नोकरीत रुजू झाला. सारं काही सुखाचं झालं, पण विद्याधरला आपल्या गावातील स्थिती स्वस्थ बसू देईना. त्याला काहीही करून गावात शाळा बांधायची होती. त्याने बरीच खटपट केली; पण कोणीही या गावात शाळा सुरू करण्याकरता त्याला मदत केली नाही. शेवटी विद्याधरने एक निर्णय घेतला. आपली थोडीफार जमलेली जमापुंजी घेऊन तो गावी आला. गावात त्याने सगळ्यांना जमा करून आपण सगळे मिळून शाळा उभारू शकतो असा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. सुरुवातीला कोणालाच हे शक्‍य होईल असं वाटलं नाही; पण सर्वांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न केले, तर हे शक्‍य होईल हे विद्याधरने सर्वांना पटवून दिले.
        विद्याधरने त्याची सगळी जमापुंजी लावून शाळेच्या इमारतीचा पाया उभारला. त्याकरता तो स्वत: मेहनत करत होता. गावातील गवंड्याने त्याला मदत केली. वीटभट्टीच्या मालकाने बांधकामाकरता विटा देऊ केल्या. सुतार, लोहार, कुंभार, रंगारी अशा साऱ्यांनी आपापल्या परीने हातभार लावला. गावातील प्रत्येक व्यक्ती जोमाने काम करू लागली. आबालवृद्ध सारे यात सहभागी झाले आणि पाहतापाहता शाळेची इमारत उभी राहिली. सर्व सुखसोईंनीयुक्‍त शाळा, त्यात विद्याधरसारखा गुणी शिक्षक लाभल्याने गावकऱ्यांना खूप आनंद झाला. गावातली सारी मुलं आणि मुली रोज शाळेत जाऊ लागली. शिक्षणाने गावात हळूहळू समृद्धी आणली. विद्याधरने तर प्रौढ साक्षरता वर्गही सुरू केले. त्यामुळे, संपूर्ण गाव शिक्षणाच्या वाटेवर चालू लागले. एकीचे बळ असेल, तर आपण अवघड गोष्टीही साध्य करू शकतो हे सर्वांनाच पटले.

तात्पर्य: एकत्र येऊन काम केल्याने असाध्यही साध्य होते.

ऐकावे जनाचे करावे मनाचे

       एका गावात एक कुंभार आणि त्याचा मुलगा राहत होता. त्यांच्याकडे एक गाढव होते. एकदा ते आपल्या गाढवाला घेऊन बाजाराला जात होते. गाढव पुढे चालत होते आणि त्याच्यामागे बाप लेक चालले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पायाला चटके बसत होते. एवढ्यात समोरून काही लोक चालत येताना दिसले. ते कुंभार आणि त्याच्या मुलाकडे पाहून म्हणाले, “काय फायदा गाढव असून? मुलाला एवढ्या उन्हात चालतच घेऊन जातोय हा कुंभार.” कुंभाराने ते ऐकले आणि मुलाला गाढवावर बसवले. थोडे अंतर चालून गेल्यावर काही लोक पारावर बसलेले दिसले. कुंभार तिथून जाऊ लागताच त्यातील एक जण ओरडला, “काय दिवस आले आहेत, मुलगा मजेत गाढवावर बसला आहे आणि म्हातारा बाप रस्त्याने चालतोय.”
       मुलाला वाईट वाटले. तो झटकन खाली उतरला. त्याने आपल्या बाबांना गाढवावर बसावयास सांगितले. थोड्याच अंतरावर पुन्हा काही लोक भेटले. त्यांनी कुंभाराला जोराने ओरडून म्हटले, “अरे काही लाज आहे की नाही? मुलगा पायी चालतोय आणि तू आरामात गाढवावर बसून जातोस.” कुंभार मुलाला म्हणाला, “बाळ, तू पण ये, गाढवावर आपण दोघेही बसू.” त्याप्रमाणे दोघेही गाढवावर बसून पुढे जाऊ लागले. पुढे जात असताना अजून एक माणूस त्यांना भेटला. त्याने कुंभाराला थांबवले आणि त्याच्या अंगावर खेकसला, “तुम्ही मुक्या जनावरांची काळजी कधी घेणार? दोघे दोघे त्याच्या पाठीवर बसून त्या गाढवाचा जीव घेणार का?” कुंभाराला वाटले आपले चुकलेच. ते दोघे गाढवावरून उतरले आणि दोघांनी त्या गाढवालाच आपल्या खांद्यावर घेतले. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघून फिदीफिदी हसत होते आणि माणूस कोण अन्‌ गाढव कोण कसं ओळखायचं? असे म्हणत होते. शेवटी कुंभाराने गाढवाला खाली उतरवले आणि तो त्याच्यामागे मुलासह चालू लागला. यापुढे लोक काय म्हणतात हे ऐकून घेतले तरी वागताना मात्र आपल्याला काय वाटते, त्याप्रमाणेच आचरण करायचा निर्धार करून तो पुढच्या प्रवासाला लागला.

तात्पर्य: ऐकावे जनाचे; पण करावे मात्र आपल्याला जे योग्य वाटते तेच.

कष्टाची गोड फळे

       हरिदास नावाचा मोठा शेतकरी हमरापूर गावी आपल्या तीन मुलांसह राहत होता. त्याची खूप शेती होती. म्हातारपणामुळे हरिदास थकला होता आणि शेती करणे त्याला शक्य नव्हते. त्याची तीन मुले अतिशय आळशी होती. त्यामुळे, मोठी शेती असूनही ती ओसाड पडली होती. हरिदासला मुलांच्या भविष्याची चिंता लागून राहिली होती. एके दिवशी तो खूप आजारी पडला. त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून घेतले आणि तो म्हणाला, “बाळांनो, आता माझ्याकडे फार वेळ नाही. मी तुम्हांला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आपल्या शेतात मी खूप धन पुरून ठेवले आहे. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही शेत खोदा आणि मिळालेले धन वाटून घ्या.” एवढे बोलून तो म्हातारा शेतकरी मरण पावला.
       हरिदासच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मुलांना शेतात पुरून ठेवलेल्या धनाची आठवण झाली. त्यांनी एक एक करून सारी शेती खोदून काढली. त्यांना धन काही मिळाले नाही. ती मुले निराश झाली. त्यांना समजले, की त्यांच्या वडिलांनी त्यांना फसवले आहे. हताश होऊन बसलेले असताना त्यांचे शेजारी व हरिदासचे मित्र रामदास यांनी त्या मुलांना पाहिले. त्यांनी मुलांना समजावले, की निराश होऊ नका. तुम्ही शेती खोदली आहेच, तर त्यात पेरणी करा. मुलांना तो सल्ला पटला. त्याने शेतीत धान्य पेरले. लवकरच पाऊस पडला. मुलांची शेती बहरून आली. त्यांच्या शेतातील धान्य विकून त्यांना खूप पैसे मिळाले.
        त्यावेळी रामदास काकांनी त्या मुलांना परत समजावले. हरिदासने शेतात कोणतेही धन पुरले नव्हते, तर तुमच्या कष्टाने तुम्ही ते मिळवावे अशी त्याची इच्छा होती. तुम्ही कष्टाची गोड फळे चाखली आणि तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली.

तात्पर्य: कष्टाने मिळवलेले कोणतेही फळ गोडच असते.

प्रामाणिकपणाचे फळ

        सकाळची वेळ होती. राजू पेपर टाकण्याचे काम करत होता. घरच्या गरिबीमुळे राजूला शाळेची फी भरणे शक्य नव्हते. त्यामुळे, तो पेपर टाकणे, दूध पोहोचवणे अशी कामे करून आपले व आपल्या आईचे पोट भरण्याचा प्रयत्न करत असे. त्याचे स्वप्न होते, की आपण शाळेत जावे, खूप शिकावे, मोठा माणूस व्हावे असाच विचार करत असताना त्याचा पाय कुठल्याशा वस्तूवर तरी पडला. त्याने खाली वाकून पाहिले, तर ते एक पैशांचे पाकीट होते. झटकन वाकून त्याने ते पाकीट उचलले, कुणाचे आहे का असे विचारण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहिले; मात्र सकाळची वेळ असल्यामुळे रस्ता निर्मनुष्य होता. त्याने पाकिटात काय आहे हे पाहण्यासाठी ते उघडण्याचा विचार केला; मात्र त्याला आईचे शब्द आठवले, ‘जे आपले नाही ते घेण्याचा विचार करणे म्हणजे चोरीच.’ त्याने तडक पोलीस स्टेशन गाठले व ते पैशांचे पाकीट पोलीस स्टेशनमध्ये जमा केले.
        संध्याकाळच्या सुमारास राजू आईला घरकामात मदत करत असताना एक मध्यमवयीन गृहस्थ त्याच्या घरी आले. पेपर टाकणारा मुलगा येथेच राहतो का? अशी विचारणा केल्यावर राजू घरातून बाहेर आला. त्यांनी राजूला पैशांच्या पाकिटाबद्दल विचारले. त्यांनी खात्री पटताच राजूचे आभार मानले व खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून राजूला बक्षिस देण्याचा प्रयत्न केला. राजूने ते बक्षिस नम्रपणे नाकारले.
        त्या गृहस्थांनी राजूच्या शाळेची चौकशी करताच त्यांना समजले, की गरिबीमुळे राजू शाळेत जात नाही. त्यांनी राजूला जवळ घेतले आणि म्हटले, “काळजी करू नकोस. उद्यापासून तुझी सारी कामे बंद. तुझ्या शाळेचा|; खर्च मी करणार. तू फक्त अभ्यास कर आणि मोठा हो.” हे ऐकून राजूच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ त्याला मिळाले होते.

तात्पर्य: प्रामाणिकपणा कधीही वाया जात नाही. त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते.

बुद्धी आणि ताकदीचा मेळ

       छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक किल्ले घेण्यास सुरुवात केली तेव्हा विजापूरच्या बडी बेगमने भर दरबारात आवाहन केले, की जो सरदार शिवाजी महाराजांना कैद करून आणेल त्याला मोठे इनाम दिले जाईल.
       एक सरदार यासाठी तयार झाला. तो सरदार होता क्रूर, धूर्त अफझल खान! त्याला हरवणे सोपे नव्हते. त्याने मोठ्या सैन्यासह स्वराज्यावर आक्रमण केले. अनेक देवळे पाडली, गावे लुटली, लोकांना मारले. या अत्याचाराने शिवाजी महाराज चिडतील आणि युद्ध करायला मैदानात येतील अशी त्याची अपेक्षा होती.
       परंतु, महाराजांनी नेहमीच गनिमी काव्याला म्हणजेच शक्‍तिपेक्षा युक्‍तीला महत्त्व दिले. त्यांनी प्रतापगडावरून खानाला आपण घाबरलो असल्याचा निरोप पाठवला व तहाची बोलणी सुरू केली. भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याचे ठिकाण ठरले. या भेटीत खान दगाफटका करणार हे महाराजांना ठाऊक होते. त्यामुळे, त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून चिलखत, बिचवा, वाघनखे अशा तयारीसह खानाची भेट घेण्याचे ठरवले. आपल्या बुद्धीने खानाला प्रतापगडासारख्या अवघड जागी त्यांनी बोलावून घेतले आणि प्रत्यक्ष भेटीत खानाने दगाफटका करून वार करण्याचा प्रयत्न करताच आपली ताकद पणाला लावून वाघनखे खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला.
       हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट बनून आलेल्या अफझलखानाला अत्यंत शौर्याने व चतुराईने बुद्धी आणि ताकदीचा मेळ घालून महाराजांनी ठार केले व स्वराज्याचे रक्षण केले.

तात्पर्य: ताकदीला बुद्धीची जोड दिल्यास कोणतेही कार्य अशक्य राहत नाही.

पळसाला पाने तीनच

        रामराव नावाच्या एका व्यापाऱ्याने आयुष्यभर कष्ट करून अमाप संपत्ती मिळवली. म्हातारपणात मात्र कोणीही नातेवाईक नसल्याने या संपत्तीचे काय करावे असा प्रश्‍न त्या व्यापाऱ्यास पडला.
        ही संपत्ती एखाद्या योग्य माणसाच्या हाती सोपवावी असा निर्धार त्याने केला. त्याकरता एका नि:स्वार्थी माणसाचा शोध घेत तो भटकू लागला. रामरावाला रस्त्यात एक व्यापारी भेटला. त्या व्यापाऱ्याला त्याने आपली समस्या सांगितली. व्यापारी लगेचच रामरावाशी गोड बोलू लागला. आपण किती मोठे समाजसेवक आहोत आणि आपण किती लोकांना मदत केली आहे, याचा पाढा तो रामरावासमोर वाचू लागला. रामरावाला व्यापाऱ्याचा हेतू लक्षात आला. त्याने आपला मार्ग बदलत व्यापाऱ्यापासून आपला पिच्छा सोडवला.
        पुढे रामरावाला एक जमीनदार भेटला. रामराव बाहेर पडण्याचे कारण कळताच जमीनदारही आपल्याकडे असलेल्या जमिनींवर उगणारे धान्य आपण नि:स्वार्थीपणे दान करतो असे सांगू लागला. ऐशोआरामाचे जीवन जगणारा हा जमीनदार स्वार्थापोटी रामरावाची हाजी-हाजी करू लागला. त्याचे लक्षण ओळखून रामराव त्याच्यापासून दूर झाले.

        आपण एखाद्या साध्या माणसाला भेटावे असे रामरावांच्या मनात आले. तेवढ्यात त्यांना समोरच्या देवळात देवपूजा करणारा पुजारी दिसला. त्याला पाहून रामराव खुलले. या पुजाऱ्याला स्वार्थाचा स्पर्शही नसावा असे मानून रामराव त्याच्याजवळ गेले. पुजाऱ्याला रामरावांचा हेतू कळताच पुजाऱ्याने मंदिरात येणाऱ्यांना आपण किती मदत करतो ते सांगायला सुरुवात केली. आपण किती नि:स्वार्थी आहोत हे दर्शवण्याचा पुजाऱ्याचा प्रयत्न रामरावाच्या नजरेतून सुटला नाही. पुजाऱ्याचीही ही स्थिती पाहून मात्र रामरावाला ‘पळसाला पाने तीनच’ ही म्हण खऱ्या अर्थाने पटली. रामराव तेथून निघाला आणि आपली सारी संपत्ती अनाथाश्रमास दान करून निश्चिंत झाला.

तात्पर्य: जगभरात कोठेही गेलो तरीही सर्वत्र परिस्थिती सारखीच असते.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट

        एका जंगलात एक कोल्हा राहत होता. दोन दिवस  शिकार न मिळाल्याने भुकेने तळमळत होता. आपल्याला खायला काही मिळेल या शोधात भटकत भटकत तो एका मळ्यात आला. तो द्राक्षांचा मळा होता. द्राक्षांच्या मांडवाला पिकलेल्या द्राक्षांचे घड लोंबकळत होते. ते द्राक्षांचे घड पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले.
        द्राक्ष खाण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. त्याने उड्या मारून ती द्राक्षे खाण्याचा प्रयत्न केला; मात्र द्राक्षाचे घड खूप उंचावर असल्यामुळे तेथे पोहोचणे त्याच्यासाठी अवघड होते. कोल्हा उड्या मारून द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करत होता; मात्र त्याची उडी तिथपर्यंत पोहोचत नव्हती. खूप वेळा उड्या मारल्यानंतर तो थकला.
        मांडवाच्या थोड्या बाजूला जाऊन पुन्हा एकदा त्या द्राक्षांकडे पाहिले आणि म्हणाला, “ही आंबट द्राक्षे ज्याला खायची असतील त्याने खाऊ दे. आपल्याला काही ही आंबट द्राक्षे नकोत.” असे म्हणून आपल्या मनातील निराशा लपवत कोल्हा तेथून निघून गेला. त्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही तेव्हा त्याने ती द्राक्षेच आंबट आहेत, असे म्हणून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न केला.
        कित्येक लोक असे असतात, की त्यांच्या हाती एखादी चांगली गोष्ट लागली नाही, तर त्या चांगल्या गोष्टीलाच वाईट ठरवून मोकळे होतात.

तात्पर्य: एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही, तर त्या गोष्टीला वाईट ठरवून तिची निंदा केली जाते.

अति तिथं माती

       एका गावात एक गरीब भिकारी राहत होता. तो दिवसभर भीक मागून आपला उदरनिर्वाह करी. एके दिवशी त्यास कोणीतरी सुचवले, की इंद्रदेवाची साधना कर, तो प्रसन्न झाला, तर तुझे दारिद्र्य संपेल. भिकाऱ्याने इंद्रदेवाची तपस्या सुरू केली. इंद्र त्याच्यावर प्रसन्न झाला. कृपा म्हणून इंद्राने त्यास सुवर्णनाणी देऊ केली. भिकाऱ्याने आपली झोळी पसरली. तेव्हा इंद्राने त्यास इशारा दिला, की झोळीतून नाणे जमिनीवर पडले, तर त्याची माती होईल. भिकाऱ्याने आपली झोळी भरताच इंद्रास थांबवले. झोळीत मावेल तेवढी सुवर्णनाणी घेऊन तो आनंदात घरी गेला. नवीन कपडे, खाऊ घेतले, घर बांधले.
         गावात सर्वांना आश्‍चर्य वाटले, की हा भिकारी एकाएकी श्रीमंत कसा झाला. त्याच्या एका मित्राने याबाबत त्याला विचारले. भिकाऱ्याने त्याला आपली हकीकत सांगितली. ते ऐकून त्यानेही इंद्राची तपस्या करायला सुरुवात केली. त्याच्या तपस्येने इंद्र प्रसन्न झाला. इंद्राने त्यालाही कृपा म्हणून सुवर्णनाणी देऊ केली. त्याने झोळी पसरली तेव्हा इंद्राने त्यासही नाणे जमिनीवर पडल्यास त्याची माती होईल असा इशारा दिला. झोळी भरू लागताच त्याला हाव सुटली. तो अधिकाधिक सुवर्णनाणी मागत राहिला. ताण येऊन झोळी फाटली. सगळ्या सुवर्णनाण्यांची जमिनीवर पडताच माती झाली. त्याचक्षणी इंद्रदेवही नाहीसा झाला. अति लोभापायी त्याच्यावर रडायची वेळ आली.

तात्पर्य: अतिलोभ नेहमीच वाईट असतो.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे

       पावसाळ्याचे दिवस होते. दोन दिवसांपासून खूप पाऊस पडत होता. त्या पावसातच रामराव नावाचा एक गाडीवान बैलगाडीत बसून दुसऱ्या गावी निघाला होता. आधीच मातीचा खडकाळ रस्ता, आता पावसामुळे चिखलाने भरून गेला होता. मोठ्या कष्टानेच रामराव गाडी हाकत होता. जाता जाता त्याची बैलगाडी चिखलात रुतली. बैलांनी खूप जोर लावला; पण व्यर्थ! बैल खालीच बसले.
       रामराव मोठमोठ्याने रडू लागला. “मला कोणीतरी मदत करा हो ! माझी गाडी चिखलात रुतली. आता मी काय करू ? मी पुढे कसा जाऊ ? देवा ! माझी गाडी चिखलातून वर काढ. मी तुझ्यापुढं नारळ फोडीन.”
       बराच वेळ गेला. जंगलातून जाणाऱ्या त्या आडवाटेवरून कोणीही येत-जात नव्हते. तो तसाच बसून होता. अखेर आकाशवाणी झाली. “अरे आळशी माणसा, रडून काय होणार? उठ, बैलांना हाक दे ! तू स्वत: गाडीची चाकं वर काढण्याचा प्रयत्न कर. मी आळशी आणि रडणाऱ्या माणसांना मदत करत नसतो. मला धाडसी व कष्टाळू माणसं आवडतात.”
       रामरावाने डोळे पुसले. तो बैलांना हाकारू लागला. स्वत: गाडीची चाके वर काढण्याचा प्रयत्न करू लागला. सगळी शक्‍ती एकवटून त्याने जोर लावला आणि आश्‍चर्य म्हणजे क्षणार्धात त्याची गाडी चिखलातून बाहेर आली.
       रामरावला कोण आनंद झाला ! त्याने देवाचे आभार मानले व तो पुढच्या प्रवासाला निघाला.

तात्पर्य: प्रयत्न केल्यावरच कोणतीही गोष्ट साध्य होते.

विज्ञानाची कास धरा

       त्यावर्षी गावात दुष्काळ पडला. पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. गावातील लोकं हवालदिल झाले. वेगवेगळ्या  पद्धतीने पूजाअर्चा, होम-हवन सुरू झाले. अशातच गावात एक साधू आला. त्याने गावात वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रमंत्राचे प्रयोग दाखवण्यास सुरुवात केली. साऱ्या गावकऱ्यांना त्याने गावाबाहेरील मंदिरात एकत्र केले. गावावर आलेले संकट आपण दूर करू शकतो, कारण आपल्याला त्याचे कारण सापडले आहे असे म्हणत तो जोरजोराने घुमू लागला. गावच्या सरपंचाकडे त्याने पूजाविधीसाठी २ लाख रुपयांची मागणी केली. गावावरचे संकट टळावे म्हणून नाइलाजाने सरपंचांनी त्याचे म्हणणे मान्य केले.
       त्या साधूने आपल्यासमोर काही लिंबू ठेवले होते. साधू जोरजोराने ओरडत होता. “गावावर कोणीतरी करणी केली आहे. बघा आता, मी या लिंबूमध्ये टाचण्या टोचतो. लिंबू कसा उडू लागेल ते पाहा.” त्याने टाचण्या टोचल्यावर लिंबू खरोखर उडू लागला. साधूने आपल्या शिष्याला एक सुरी आणावयास सांगितली. साधूने सुरी हातात घेऊन म्हटले, “बघा आता या लिंबूमधून रक्‍त बाहेर पडेल.” साधूने सुरीने लिंबू कापला आणि काय आश्‍चर्य लिंबूतून खरोखर लाल रंगाचा द्रव बाहेर आला. सारे गावकरी साधूचा जयजयकार करू लागले.
       एका कोपऱ्यात उभे राहून सोहम हे सारे पाहत होता. साधूची लबाडी त्याच्या लक्षात आली. पारा आणि लिंबू यांच्यात रासायनिक क्रिया झाल्यामुळे लिंबू उडतो हे तो विज्ञानाच्या तासाला शिकला होता. तसेच, त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी लिंबाच्या रसात आम्ल असते हे शिकवले होते. तो पुढे आला आणि म्हणाला, “सरपंच साहेब हे सगळे थोतांड आहे. या साधूने केलेला हा कोणताही चमत्कार नाही, तर केवळ विज्ञानाचा प्रयोग आहे. मी हे सिद्ध करू शकतो. या साधूला आपण टाचण्या दिल्या, तर तो लिंबू उडेल का विचारा?” आपण दिलेल्या सुरीने कापून लिंबातून रक्‍त येईल का? सरपंचाने सोहमच्या म्हणण्याप्रमाणे साधूला विचारताच साधूची बोबडी वळली. लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सोहमचे सर्वांनी कौतुक केले.

तात्पर्य: अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानाची कास धरल्यास माणूस फसवणुकीला बळी पडत नाही.

पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज

       एका गावातली माणसं फार कष्टाळू होती. खूप कष्ट करायची. धान्य पिकवायची आणि एकमेकांशी, प्रेमाने वागायची. त्या गावाशेजारी एक नदी होती. त्या नदीला खूप पाणी होते. माणसे, प्राणी त्या नदीचे पाणी पित. जंगलातील हत्ती नदीवर येऊन दंगामस्ती करत, पाण्यात डुंबत. सर्वत्र आनंदीआनंद होता.
       अचानक पाऊस पडायचा बंद झाला. ऊन वाढले. प्यायला पाणी मिळेनासे झाले. शेती सुकली. जंगले ओसाड होऊ लागली. प्राणी हैराण झाले. यामुळे एक हत्ती  वैतागला, त्याला पाण्यात डुंबायला मिळत नव्हते. तो नदीला विचारायला गेला. त्याने नदीला विचारले. तू आता का बरं वाहत नाहीस? तुझ्यात पाणी का साचत नाही? मला त्यामुळे डुंबायला मिळत नाही.
       नदी म्हणाली, “अरे काय सांगणार बाबा. आता ढग इथे थांबत नाहीत. त्यामुळे, येथे पाऊसच पडत नाही. मला तरी पाणी कसे मिळणार? तू ढगालाच जाऊन विचार.” हत्तीने मान हलवली. तो गेला ढगाकडे. त्याने ढगाला विचारले, “ढगदादा तू रुसलास का? पाऊस पाडायचे विसरलास का? तू नदीला पाणी देत नाहीस, त्यामुळे मला डुंबता येत नाही.”
       ढग म्हणाला, “अरे आम्ही नाही कुठे म्हणतो पाणी द्यायला; पण आमचे मित्र आम्हांला अडवायला तिथं नाहीत. झाडे नाहीत मग आम्ही थांबत नाही. माणसाने झाडे तोडली. जंगले उजाड केली. तू माणसाला विचार.”
       हत्ती माणसाकडे गेला. त्याने माणसाला म्हटले, “तुम्ही झाडे तोडली. नवी झाडे लावली का नाहीत?” माणूस म्हणाला, “आमच्या हातून चूक झाली. आम्ही झाडे लावली नाहीत, म्हणून ढग थांबत नाहीत. त्यामुळे, पाऊस नाही. नदीला पाणी नाही. आम्ही नवीन झाडे लावू. त्यांची काळजी घेऊ. जंगल हिरवेगार करू. झाडांमुळे गारवा येईल. पाऊस पडेल. सारे सजीव सुखी होतील, शेती भरभरून पिकेल. याशिवाय, आपल्याला वीजही मिळेल. उद्योगधंदेही वाढतील.”
       हत्ती म्हणाला, “छान! माणसा तुला तुझी चूक कळली हे बरं झालं. पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज आहे. हे लक्षात घे आणि पुन्हा अशी चूक करू नकोस. नाहीतर तुझ्यासह आम्ही आणि पर्यायाने संपूर्ण सृष्टी नष्ट होईल.”

तात्पर्य: पर्यावरणाचे रक्षण करून त्याचे संवर्धन केले तरच पृथ्वीवरील सजीवसृष्टी बहरत राहील. अन्यथा विनाश अटळ आहे.

error: Content is protected !!