विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक: १ फेब्रुवारी २०२१
प्रति,
माननीय श्री. रमेश पाटील
आयोजक- सुलेखन कार्यशाळा,
अक्षर पुस्तकालय, राजापेठ,
अमरावती xxxxxx
विषय: ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत होणाऱ्या सुलेखन कार्यशाळेत प्रवेश मिळण्याबाबत.’
माननीय महोदय,
मी किरणकुमार बेलसरे, रमाई विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. मी आणि माझ्या वर्गातील काही विद्यार्थीमित्र अक्षर पुस्तकालय, राजापेठ, अमरावती आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत होणाऱ्या सुलेखन कार्यशाळेत सहभागी होण्यास इच्छुक आहोत. मागच्या सुट्टीत आपल्या पुस्तकालयामार्फत प्रकाशित ‘सुलेखन – एक कला’ हे पुस्तक आमच्या वाचनात आले होते. त्यातील बारकावे वाचून आम्ही प्रेरित झाली आहोत.
‘सुंदर अक्षर हाच खरा दागिना’ असे म्हटले जाते. आम्हालाही आमचे अक्षर सुंदर, नीटनेटके व वळणदार करण्याची इच्छा आहे, म्हणून १२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या आपल्या सुलेखन कार्यशाळेत आम्हांला सहभागी व्हायचे आहे. माझ्या वर्गातील माझ्यासह एकूण वीस विद्यार्थ्यांची यात सहभागी होण्याची इच्छा आहे.
माझ्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी आपणांस विनंती करतो, की माझ्या वर्गातील २० विद्यार्थ्यांना या सुलेखन कार्यशाळेत सहभागी करून घ्यावे.
कळावे,
आपला विश्वासू,
किरणकुमार बेलसरे
विद्यार्थी प्रतिनिधी,
रमाई विद्यालय, ठाकूरनगर,
राजापेठ,
अमरावती xxxxxx
abc@xyz.com
अभिनंदन पत्र – (अनौपचारिक)
दिनांक: २८ फेब्रुवारी २०२१
प्रिय विश्वास,
सप्रेम नमस्कार.
विश्वास सर्वप्रथम तुझे मनापासून अभिनंदन!
अक्षर पुस्तकालय आयोजित सुलेखन कार्यशाळेत शेवटच्या दिवशी झालेल्या कौशल्य चाचणीत तू प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालास त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन!
अक्षर पुस्तकालयामार्फत राबवले जाणारे सर्वच उपक्रम स्तुत्य असतात. एक अभ्यासपूर्ण आयोजन करणारी संस्था म्हणून ती सर्वपरिचित आहे. अशा संस्थेच्या कार्यशाळेत सहभागी होणे ही खरंच भाग्याची गोष्ट आहे.
लहानपणापासून पाहतोय मी, तुझे अक्षर म्हणजे मोती. हे अक्षर आणखी सुंदर, रेखीव आणि सुबक बनवण्याकरता या सुलेखन वर्गाचा तुला निश्चितच फायदा झाला असेल.
तुझ्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. सुलेखन क्षेत्रात तुझे नाव उज्ज्वल करशील याची खात्री आहे मला. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन!
तुझा मित्र,
किरणकुमार बेलसरे
२०३, वास्तू विठ्ठल,
ठाकूरनगर, राजापेठ,
अमरावती, xxxxxx
abc@xyz.com
मागणी पत्र – (औपचारिक)
दिनांक: ३ मार्च २०२१
प्रति,
माननीय श्री. गणपत भवरे
व्यवस्थापक-वनश्री,
कारंजा रोड,
वाशिम ४४४००३.
विषय: ‘सहलीकरता माहिती पत्रकाची मागणी करण्याबाबत.’
माननीय महोदय,
मी अ.ब.क. मंगलगड येथे राहत असून आपल्या वनश्री सहलीकरता पर्यटक म्हणून येण्यास उत्सुक आहे. आपल्या वनश्री विषयी अनेकांकडून आम्ही स्तुती ऐकली आहे. त्यामुळे, येथे भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे.
आपले वनश्री पर्यटनस्थळ हे निसर्गसान्निध्यात रुचकर भोजन, खेळांच्या वैविध्यपूर्ण प्रकारांसाठी विशेष प्रसिद्ध असल्याचे ऐकले आहे. शहरी धावपळीपासून काही काळ निवांत जगण्यासाठी अशा ठिकाणी यायला आम्हांला निश्चितच आवडेल.
या सहलीसाठी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब असे २५ लोक येऊ इच्छित आहोत; मात्र येण्यापूर्वी या ठिकाणची संपूर्ण माहिती देणारे माहिती पत्रक आम्हांला मिळाले, तर आम्हांला सहलीची रूपरेषा आखण्यास निश्चितच मदत होईल.
तरी एक उत्सुक पर्यटक या नात्याने मी आपणाकडे आपल्या वनश्री पर्यटनस्थळाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या माहितीपत्रकाची मागणी करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे. लवकरच हे माहिती पत्रक आम्हांला मिळेल असा मला विश्वास आहे.
कळावे,
आपला कृपाभिलाषी,
अ.ब.क.
१२०, रमा निवास
मंगलगड, घाटकोपर
मुंबई, xxxxxx
abc@xyz.com
विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक: ४ मार्च २०२१
प्रति,
माननीय श्री. गणपत भवरे
व्यवस्थापक-वनश्री,
कारंजा रोड,
वाशिम, ४४४००३
विषय: ‘शालेय सहलीकरता विद्यार्थ्यांना प्रवेशदरात सवलत मिळण्याबाबत.’
माननीय महोदय,
मी अ.ब.क. ज्ञानसंपदा विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे. माझ्या शाळेतील १० वी च्या वर्गातील ७५ मुले आपल्या वनश्रीमध्ये पर्यटनाकरता येण्यास उत्सुक आहेत. शाळेच्या वतीने आयोजित केलेली ही सहल आम्हां विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच आहे.
या सहलीकरता आम्हां विद्यार्थ्यांना प्रवेशदरात सवलत मिळाली, तर या सहलीमध्ये माझ्या आणखी विद्यार्थी मित्रांना सहभाग नोंदवता येईल. तरी शालेय विद्यार्थी म्हणून आम्हां सर्वांना प्रवेशदरात सवलत मिळावी अशी मी आपणांस विनंती करत आहे.
आपला विश्वासू,
अ.ब.क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
ज्ञानसंपदा विद्यालय,
राजगड, घाटकोपर
मुंबई, xxxxxx
abc@gmail.com
मागणी पत्र – (औपचारिक)
दिनांक: २ एप्रिल २०२१
प्रति,
माननीय श्री. यदुनाथ चाफेकर
व्यवस्थापक- मातृसेवा पुस्तकालय,
नेताजी सुभाषचंद्र मार्ग,
ता.जि. लातूर xxxxxx
विषय: ‘पुस्तकांच्या मागणीबाबत.’
महोदय,
सर्वप्रथम, मातृसेवा पुस्तकालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
मी कुमारी अ.ब.क. एक रसिक वाचक या नात्याने आपल्या मातृसेवा पुस्तकालयातून माझ्या आवडीची काही पुस्तके मागवू इच्छिते. पुस्तकांची यादी सोबत जोडत आहे. तरी ही सर्व पुस्तके लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवल्यास आनंद होईल. सोबत बिलही पाठवावे म्हणजे बिलाची रक्कम घरपोच सेवा उपलब्ध झाल्यावर त्वरित देता येईल. आपण या पुस्तकांवर योग्य ती सवलत द्याल असा विश्वास आहे.
पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे:
कृपया, पुस्तके लवकरात लवकर पाठवावीत ही नम्र विनंती.
कळावे,
आपली विश्वासू,
अ.ब.क.
बी-४०१, श्रीगणेश अपार्टमेंट,
वझिरानाका, महात्मा गांधीनगर,
लातूर xxxxxx
abc@xyz.com
विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक: ३ एप्रिल २०२१
प्रति,
माननीय श्री. यदुनाथ चाफेकर
व्यवस्थापक- मातृसेवा पुस्तकालय,
नेताजी सुभाषचंद्र मार्ग,
ता.जि. लातूर xxxxxx
विषय: अधिक सवलत देण्याविषयी.
महोदय,
मी य.र.ल. ज्ञानप्रबोधिनी हायस्कूल, लातूर या शाळेची शालेय ग्रंथालय प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. दिनांक २ एप्रिल रोजी आमच्या शाळेने आपल्या पुस्तकालयातून सुमारे ३०० वेगवेगळ्या पुस्तकांचा संच खरेदी केला आहे. ही सर्व पुस्तके सर्व विद्यार्थ्यांकरता शाळेच्या ग्रंथालयातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या २०% सवलतीशिवाय अधिकची सवलत दिल्यास उरलेल्या रकमेतून शालेय ग्रंथालयासाठी आणखी काही पुस्तके घेण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे, या खरेदीवर आपण सवलत द्यावी अशी मी आपणांस नम्र विनंती करते.
कृपया, सवलती संदर्भात विचार करून लवकरात लवकर उत्तर कळवावे ही विनंती.
कळावे,
आपली कृपाभिलाषी,
य.र.ल.
शालेय ग्रंथालय प्रतिनिधी,
ज्ञानप्रबोधिनी हायस्कूल
घनश्यामनगर,
लातूर xxxxxx
abc@xyz.com
विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक: ६ जानेवारी २०२१
प्रति,
श्री. विनोद कुमरे सर
माननीय पोलीस अधिकारी,
पोलीस स्टेशन, कारंजा
ता. कारंजा, जि. नागपूर xxxxxx
विषय: ‘किशोरवयीन विद्यार्थ्यांकरता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्याची विनंती करण्याबाबत,’
माननीय महोदय,
मी कारंजा येथील विकास विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. कालच वर्तमानपत्रातील आपल्या अभिनव उपक्रमाविषयीची जाहिरात वाचनात आली. महिला सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले, ‘महिला सुरक्षा स्वतंत्र अॅप’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.
आजच्या घडीचा विचार करता महिलांना आणि किशोरवयीन मुलांना अनेक संकटांशी सामना करावा लागतो. अशावेळी स्वसंरक्षणासाठी त्यांनी सज्ज असणे आवश्यक ठरते. यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
याचा विचार करूनच आमच्या शाळेने ‘स्वसंरक्षण शिबीर’ आयोजित केले आहे. या शिबिरात आपण किशोरवयीन विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयक मार्गदर्शन करावे अशी मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विनंती करत आहे.
कृपया, यासंबंधीचा आपला विचार आपण लवकरात लवकर कळवावा ही विनंती.
कळावे,
आपली कृपाभिलाषी,
य.र.ल.
विकास विद्यालय,
राजवीर नगर, ता. कारंजा,
जि. नागपूर xxxxxx
abc@xyz.com
अभिनंदन पत्र – (औपचारिक)
दिनांक: ११ जानेवारी २०२१
प्रति,
माननीय श्री. रमाकांत जाधव
पोलीस स्टेशन प्रभारी,
पोलीस स्टेशन कारंजा,
ता. कारंजा,
जि. नागपूर xxxxxx
विषय: कारंजा पोलीस स्टेशन येथील कार्यरत बांधवांचे अभिनंदन करण्याबाबत.
महोदय,
मी य.र.ल. कारंजा येथील विकास विद्यालयाची विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. मागच्या आठवड्यात आमच्या शाळेत राबवलेल्या संरक्षण शिबिरामध्ये आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत बांधवांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या अभिनव उपक्रमाविषयी आम्हां विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल आपणां सर्व पोलीस बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन.
महिला सुरक्षेची गरज लक्षात घेता महिलांना निर्भयपणे जगण्याचे स्वातंत्र्य मिळावे याकरता राबवलेला हा अभिनव उपक्रम खरोखरच महिला सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘महिला सुरक्षा स्वतंत्र अॅप’ द्वारे महिला कोणत्याही संकटात असताना पोलिसांशी तत्काळ संपर्क साधू शकतात व पोलीस यंत्रणाही तत्काळ उपस्थित राहून महिलांना सुरक्षा प्रदान करू शकते. त्यामुळे, महिलांना मोकळेपणाने जगता येणे शक्य होईल अशी खात्री या उपक्रमातून मिळते.
या अभिनव उपक्रमाबाबत विकास विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने संपूर्ण विद्यालयाच्या वतीने मी आपल्या पोलीस बांधवांचे अभिनंदन करते.
आपली विश्वासू,
य.र.ल.
विकास विद्यालय,
राजवीर नगर, ता. कारंजा,
जि. नागपूर xxxxxx
abc@xyz.com
मागणी पत्र – (औपचारिक)
दिनांक: १० जून २०२१
प्रति,
माननीय श्री. प्रसाद राजे
सरपंच (आयोजक), माझी वसुंधरा अभियान,
ग्रामपंचायत कार्यालय, सातनूर,
ता. वरुड, जि. अमरावती xxxxxx
विषय: ‘वृक्षलागवडीकरता रोपांची मागणी करण्याबाबत.’
माननीय महोदय,
मी अ.ब.क. करडे गावात राहणारा एक वृक्षमित्र या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. आपण सुरू केलेले ‘माझी वसुंधरा अभियान’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या अभियानामार्फत दरवर्षी १००० वृक्षांची लागवड आपल्या आसपासच्या प्रदेशात केली जाते, ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. निसर्गाचा ठेवा जोपासण्याच्या आपल्या या कार्यामध्ये आमचाही हातभार लागावा अशी माझी व माझ्या गावकऱ्यांची इच्छा आहे.
आमच्या गावाच्या बाजूलाच उघडे माळरान आहे. येथे वृक्षलागवडीकरता उत्तम जागा आहे. आमचे गाव हिरवळीने नटावे, पावसाच्या समस्या दूर व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. तरी आपण आपल्या या वसुंधरा वाचवण्याच्या अनोख्या अभियानात आम्हांला सामावून घ्याल अशी आशा बाळगतो.
वृक्ष लागवड कार्यक्रमाकरता आम्हांला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या विविध रोपांचे प्रकारांनुसार प्रत्येकी ३ नग १४ जूनपर्यंत आपण पाठवून द्यावेत, जेणेकरून माळरानाच्या परिसरात विविध झाडांची लागवड आम्हांला पावसाळ्याच्या प्रारंभीच करता येईल.
आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हांस या स्तुत्य अभियानात सहभागी करून घ्याल अशी आशा वाटते. त्याकरता आपण ही रोपे लवकरात लवकर आमच्या ग्रामपंचायतीच्या पत्त्यावर पाठवावीत ही नम्र विनंती.
कळावे,
आपला विश्वासू,
अ.ब.क.
वृक्षमित्र, मु. करडे,
पो. वनसे ता. वरुड
जि. अमरावती xxxxxx
abc@xyz.com
अभिनंदन पत्र – (औपचारिक)
दिनांक: २६ जून २०२१
प्रति,
माननीय सरपंच श्री. प्रसाद राणे
आयोजक- माझी वसुंधरा अभियान,
ग्रामपंचायत कार्यालय, सातनूर,
ता. वरुड, जि. अमरावती xxxxxx
विषय: ‘माझी वसुंधरा अभियानाचे’ आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करण्याबाबत.
माननीय महोदय,
मी अब.क. आपल्या गावातील शारदा विद्यामंदिरातील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. १५ जून ते २५ जून या कालावधीत आपण आयोजित केलेले ‘माझी वसुंधरा अभियान’ हा एक स्तुत्य उपक्रम आहे. गेली पाच वर्षे आपण या अभियानाचे आयोजन करत आहात. यामुळे, आपला गाव व आजूबाजूची गावेही आता हिरवळीने नटली आहेत. आपल्या या पर्यावरणस्नेही कार्याकरता आपले मनापासून अभिनंदन.
आपण आयोजित केलेल्या या अभियानाला आता भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या अभियानासोबत अनेक गावे जोडली आहेत. आपण करत असलेले हे कार्य आम्हां विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरत आहे. आपल्या या कार्याबद्दल, उत्तम आयोजनाबद्दल मी शारदा विद्यामंदिरातील सर्व विद्यार्थ्यांतर्फे आपले हार्दिक अभिनंदन करतो.
कळावे,
आपला विश्वासू,
अ.ब.क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्यामंदिर, नवगाव, सातनूर,
ता. वरुड, जि. अमरावती xxxxxx
abc@xyz.com