या कवितेतील सूर्याची भूमिका ही एखाद्या घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे वाटते. जसे एखादा कुटुंबप्रमुख, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये, म्हणून योग्य ती सोय करून ठेवतो, तसाच सूर्यही त्याच्या अस्तानंतर पृथ्वीच्या प्रकाशमान भविष्याची सोय करू इच्छितो. सूर्य अस्ताला जाताच पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाणार आहे, तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी कोणीतरी पुढे यावे असे त्याला वाटते. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणावतात. त्याच्यामागे पृथ्वीला आधार देणारे कोणीतरी असावे यासाठी तो संपूर्ण सृष्टीला विनंती करतो; परंतु पृथ्वीच्या रक्षणासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम करण्यासाठी जेव्हा इवलीशी पणती स्वत:हून पुढे येते तेव्हा हा सूर्य तिच्या हिमतीचे कौतुक करतो. तिचे नम्र; पण आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी येते. तो बिनधास्तपणे तिच्यावर पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी सोपवतो. जणू त्याच्यामागे पणती पृथ्वीला सांभाळून घेईल, तिला अंधारात बुडू देणार नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे, तो शांतपणे अस्ताकडे झुकतो.
सूर्य : (उदास) अहो, कोणी ऐकतंय का? माझी अस्ताची वेळ झाली आहे. मी अस्ताला गेल्यानंतर या धरतीचे कसे होईल? कोणी येईल का माझ्या मदतीला? या पृथ्वीला अंधारात बुडण्यापासून वाचवा हो!
पणती : हे महान सूर्या! मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.
सूर्य : बोल… पणती!
पणती : (नम्रतेने) मी तुझी चिंता दूर करू इच्छिते. मला माहीत आहे, मी तुझ्याइतकी सामर्थ्यवान नाही; पण मला जमेल तसा पृथ्वीवरील अंधकार दूर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
सूर्य : (आनंदाने) खरंच पणती, तू वाचवशील या पृथ्वीला? तू करशील मला मदत?
पणती : हो! आनंदाने.
सूर्य : तू लहान आहेस; परंतु तुझी जिद्द मोठी आहे. तुझे हे बोल ऐकून माझ्या मनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
पणती : सूर्यदेवा, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी नक्कीच तुझा विश्वास सार्थ ठरवेन.
सूर्य : माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्कीच या धरतीला प्रकाशित करशील. आता मी निश्चिंत मनाने अस्ताला जातो.
पणती : धन्यवाद भास्करा! तू मला माझी क्षमता दाखवण्याची संधी दिलीस.
सूर्य हा प्रकाश आणि उष्णता ऊर्जेचा प्रमुख नैसर्गिक स्रोत आहे. सातत्याने आपल्या ऊर्जेने तो संपूर्ण पृथ्वीला सहकार्य करत असतो. येथील प्रत्येक जिवाचे अस्तित्व टिकून राहण्यात या सूर्याच्या ऊर्जेचा प्रमुख वाटा आहे. मनुष्य आणि इतर सजीव सृष्टी सूर्याच्या प्रकाश व उष्णतेविना उद्ध्वस्त होईल, दुरावस्थेत जाईल याची सूर्यास कल्पना आहे. हा सूर्य प्रस्तुत कवितेमध्ये कुटुंबप्रमुखाप्रमाणे वाटतो. ज्याप्रमाणे साऱ्या कुटुंबाच्या ऊर्जेचा स्त्रोत हा कुटुंबप्रमुख असतो त्याचप्रमाणे पृथ्वीरूपी कुटुंबाचा सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. तोच या चराचरांत प्राण फुंकतो. सूर्य नसेल, तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत सुरू राहणे केवळ अशक्यच आहे, याची जाणीव असलेल्या सूर्याला, महान ऊर्जास्रोताला आपल्या अस्तानंतर पृथ्वीचे काय होईल याची चिंता वाटणे साहजिकच आहे.
आपल्या अस्तानंतर अंधकारमय होणाऱ्या पृथ्वीच्या काळजीने सूर्य चिंतित झाला आहे. पृथ्वी अंधारात बुडून जाऊ नये म्हणून तो या सृष्टीतील घटकांना पृथ्वीला मदत करण्यासाठी पुढे येण्याची विनंती करतो; मात्र कोणीही त्याच्या हाकेला प्रतिसाद देत नाही. त्याचवेळी लहानशी पणती मोठ्या धैर्याने सूर्याचे कार्य जमेल तितके करण्याची जबाबदारी उचलते. सूर्याइतका प्रकाश ती पृथ्वीला देऊ शकत नाही याची तिला पूर्णपणे कल्पना आहे. तरीही ती आपल्या प्रकाशाने शक्य तेवढा अंधार दूर करण्याची तयारी दर्शवते. सूर्याला मदत करण्याची उदात्त भावना या पणतीमध्ये दिसून येते. एखादे कार्य हाती घेताना प्रामाणिकपणा व दृढ इच्छाशक्ती कामी येते. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या वस्तूमध्ये आंतरिक शक्ती असते. फक्त त्या शक्तीला ओळखून जग सुंदर बनवण्याची इच्छा बाळगणे गरजेचे आहे, हा विचार पणतीसारख्या छोट्या प्रतीकाच्या माध्यमातून येथे व्यक्त झालेला आहे.
सूर्योदय व सूर्यास्तासमयी आकाशात दिसणारे प्रकाशाचे रंग, रूप डोळ्यांना सुखावणारे असतात. सूर्य अस्ताला जाऊ लागला, की कवीमन प्रकाशाच्या या रूपावर कविता करू लागते, तर चित्रकाराचा कुंचला अलगद रंगांची उधळण करू लागतो. त्या वेळचे निसर्गाचे ते रमणीय दृश्य पाहताना मन विचारांनी, आठवणींनी भरून येते.
सूर्योदयाचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर नवे चैतन्य निर्माण करतो. सूर्यास्ताचा प्रकाश मनाला शांतता व समाधानाचा अनुभव देत असतो.
दिवसभर कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी सूर्यास्ताचा प्रकाश विश्रांती घेऊन येतो. आजचा दिवस संपल्याची जाणीव करून देणारा हा क्षण मनात नव्या दिवसाची ओढही जागवतो. सरता प्रकाश भूतकाळात जमा होणार असतो व सुर्योदयाचा प्रकाश उज्ज्वल भविष्यकाळ घेऊन येत असतो. काहीवेळा अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची आशा मनात निर्माण करून, तर काही वेळा पूर्ण केलेल्या कामांचे समाधान चेहऱ्यावर उमटवून सूर्य आपल्या प्रकाशाचे विविध रंग आकाशात उधळत असतो. अगदी मिणमिणत्या पणतीचा प्रकाशही मनाला निश्चिंत करणारा ठरतो. सूर्य नसताना अंधाराला चिरण्याकरता हा प्रकाशही पुरेसा होता. अशाप्रकारे प्रकाशाचे कोणतेही रूप आनंददायी वाटते.