७. ‘माणूस’ बांधूया!

(१) (अ) कृती करा.

7

(आ) परिणाम लिहा.

(१) कुटंबांचा आर्थिक हव्यास वाढला.

परिणाम: यामुळे घराघरांतील संवाद संपले. आई-वडिलांच्या स्पर्शातून जाणवणारी उबदार माया हरवली. सारं घरपण या हव्यासाच्या बुलडोझरखाली भुईसपाट झाले. प्रेमळ, वात्सल्याने भरलेल्या घराच्या जागी नात्यांचा असा एक चकचकीत ‘काचमहाल’ उभा राहिला जिथे माणसाचे अस्तित्व तर होते; पण ते केवळ शरीराने. मने दुरावली गेली, संवाद हरवत गेला.

(२) माणसा-माणसांतील संवाद हरवला.

परिणाम: माणसा-माणसांतील संवाद हरवल्यामुळे माणसं माणसासारखी वागत नाहीत, त्यांना अधिकाधिक हव्यासाचा, कुठे थांबायचं हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ वाटत आहे.

(३) माणसं बिनचेहऱ्यानं बडबडत राहिली.

परिणाम: संवादाची सोबत, साथ लाभत नाही आणि मानवाजवळ फक्त एक प्रकारचे एकाकीपण उरते.

(४) नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली.

परिणाम: असे झाल्यामुळे यापुढील प्रश्‍न मनासंबंधीच अधिक असतील व ते धनाने सोडवता येणार नाहीत.

(इ) पाठाच्या आधारे कारणे लिहा.

(१) सत्तरपंचाहत्तरीची मनं कातर झाली, कारण . . .

आपापसांतील संवाद, प्रेम, जिव्हाळा, नाती हरवून बसलेल्या नव्या पिढीमध्ये हे काय घडतंय? माणसं असे का वागत आहेत? ‘शिक्षण केवळ पैशासाठीच’ असे शिक्षणाचे रूप का बदलत आहे? समाजाला तारण्याची क्षमता असलेली वृत्तपत्रे समाजाला कुठे नेत आहेत? कोसळत कोसळत ही पडझड कुठपर्यंत खाली जाणार आहे? अशा प्रश्‍नांचा भुंगा उत्कट नात्यांचे दुथडी भरलेले काठ अनुभवलेल्या पिढीचे मन पोखरत आहे.

(२) यंत्रसंवाद करून चालणार नाही, कारण . . .

यंत्रसंवादामुळे आपण इतके भटकले आहोत, की खरे सुख कोणते हेच आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे संवादशून्य एकाकीपण आपल्या वाट्याला येत आहे.

(२) पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

अ) आंतरिक दारिद्र्य

माणूस पैशालाच सर्वस्व मानून, संवाद, प्रेम, माया, वात्सल्य, भावना या साऱ्यांपासून दूर होत आहे. पैसा हेच सुख मानून त्याच्या प्राप्तीकरता तो स्वत:च्या जवळच्या माणसांपासून तुटला जातो. त्यामुळे, त्याला जे भावनिक, वैचारिक दारिद्र्य येते तेच आंतरिक दारिद्र्य म्हणून लेखकाने उल्लेखले आहे.

(आ) वात्सल्याचं उबदार घर

घर म्हटलं, की त्यात आई-वडील, कुटुंबीय यांच्याबरोबरीने येतो तो प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, आपलेपणा. केवळ चार भिंती म्हणजे घर नव्हे, तर ज्याला आई-वडिलांच्या इतर कुटुंबाच्या मायेचे छप्पर असते तेच खरे घर. कोणत्याही परिस्थितीत वात्सल्याचा हात डोक्यावर ठेवणारे आईवडील म्हणजे वात्सल्याचा उबदार, सुरक्षित आधार.

(इ) धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय

या शब्दसमूहाद्वारे लेखकाने दोन पिढ्यांच्या विचारसरणीतला फरक दर्शवला आहे. धावणारी तरुण चाकं म्हणजे आजच्या दुकानरूपी जगातील पैशांच्या मागे पळणारी वेगवान पिढी आणि थरथरणारे म्हातारे पाय म्हणजे नात्यांची माया अनुभवलेले, ती जपायचा प्रामाणिक प्रयत्न करणारी, आजच्या पिढीचे अध:पतन पाहून हादरलेली पूर्वीची पिढी.

(ई) संवेदनांचे निरोप समारंभ

पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्या काळात, पैशापुढे आपसांतील संवाद हरवत गेले. संवादाचे मूल्य तुडवले जाण्याच्या या काळात संवेदना मागे पडत गेल्या किंवा नष्टच झाल्या आणि माणूस भावनाशून्य झाला. या संवेदनांना मानवाने स्वत:हून निरोप दिला, म्हणूनच संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले असे म्हटले आहे.

(३) व्याकरण

(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

(१) मन कातर होणे.

मन कातर होणे – भयभीत होणे
वाक्‍य: परदेशात गेलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलीच्या सुरक्षिततेच्या काळजीने वत्सलाताईंचे मन सारखे कातर होत असे.

(२) काळजात क्रंदन होणे.

काळजात क्रंदन होणे – दु:ख होणे
वाक्‍य: सैन्यात शहीद झालेल्या जवानाचे पार्थिव पाहून उपस्थितांच्या काळजात क्रंदन झाले.

(आ) 'संवेदनशून्य' शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.

            . . . . . . . . . . . . . .               . . . . . . . . . . . . . .                . . . . . . . . . . . . . .                . . . . . . . . . . . . . .                    

   हेतूशून्य                 अक्कलशून्य                  विचारशून्य                  भावनाशून्य       

(इ) अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.

१) नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.

जुन्या जगाची शैली माणूसपणाशी जवळीक साधते.

(२) माणसा-माणसांत संवाद हवा.

माणसां-माणसांत विसंवाद नको.

(३) मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.

मनुष्य हा द्वेषाच्या आधारावर जगू शकत नाही.

(४) स्वमत.

(अ) 'पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे', हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

पैसा मिळाला, की सर्व सुखे आपल्या पायाशी लोळण घेतात ही एक प्रकारची चुकीची मानसिकता समाजात फोफावत आहे; परंतु वस्तुस्थिती तशी नाही असे सांगण्याचा प्रयत्न प्रस्तुत पाठातून लेखक प्रवीण दवणे यांनी केला आहे. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या आहेत. जसजशी प्रगती होत गेली, माणुसकी कमी होऊन त्याची जागा व्यवहाराने घेतली आणि साहजिकच पैसा मोठा झाला. प्रत्येक जण हा पैसा मिळवण्याच्या स्पर्धेत डोळ्याला झापड लावून धावू लागला. संवाद, प्रेम, वात्सल्य, प्रामाणिकपणा हा हळूहळू नष्ट झाल्यातच जमा होऊ लागला. लेखक इथे हेच सांगायचा प्रयत्न करत आहेत, की भविष्यात जर माणसा-माणसांतील नाती टिकवून ठेवायची असतील, कुटुंबव्यवस्थेला जपायचे असेल, तर संवाद हरवून चालणार नाही. पैशांच्या पाठी भान हरपून पळण्याआधी आपण थोडे थांबून स्वत:ला काही प्रश्‍न विचारले पाहिजेत जसं को आपल्या गरजा काय आहेत? आणि खरंच आहेत का? या जीवघेण्या स्पर्धेत आपण स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची हेळसांड करून काय मिळवले? याचा विचार होणेही गरजेचे आहे. त्यामुळे, पैसा हे आपल्या गरजा (त्याही मर्यादित) पूर्ण करण्याचे साधन असून ते आपले जीवनाचे साध्य नाही. आपले बहुमोल आयुष्य, आपली माणसे, आपले आरोग्य हेच आपले साध्य असले पाहिजे. माणसाने संवादाने माणसं जोडली पाहिजेत. पैशांनी फक्त व्यवहार होऊ शकतो, प्रेम नाही. त्यामुळे, भविष्यात आपल्याला माणसे जोडायची आहेत, संवाद फुलवायचा आहे, नाती जोपासायची आहेत आणि हे सर्व तेव्हाच शक्‍य होईल जेव्हा आपण पैशाला केवळ एक साधन मानू, साध्य नाही.

आ) 'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

माणसाच्या मनातील विचार, भावना, कल्पना या साऱ्यांची अभिव्यक्ती होते ती संवादातूनच. मग हा संवाद शब्दरूपी, स्पर्शरूपी किंवा नजरेतून केलेला असू शकतो. या संवादामुळे परस्परांमधील प्रेम वाढीस लागते, जवळीक वाढते, नवे संबंध जोडले जातात. वेगवेगळ्या अडचणी, प्रश्‍न, शंकाकुशंका या संवादाच्या माध्यमातून सोडवता येतात. या संवादामुळे नव्या कल्पना, नवी माहिती, नवे शोध, यांचा आविष्कार होतो. विचारांची देवाणघेवाण होऊन ज्ञानप्रसार व ज्ञानप्रबोधन घडून येते. अनेक माहिती नसलेल्या गोष्टीही कळतात. संवादातूनच माणसा-माणसांमध्ये विश्‍वासाचे बंध निर्माण होतात. योग्य आणि स्पष्ट संवादामुळे नातेसंबंध बळकट राहतात. आपसांतील प्रेम वृद्धिंगत होते. त्याचबरोबर विसंवादामुळे गैरसमज वाढीस लागतात, म्हणूनच संवाद हा मानवी नात्यांना जोडणारा एक दुवा आहे असेही आपण म्हणू शकतो. अनेकदा गुंतागुंतीच्या, क्लिष्ट वाटणाऱ्या समस्या या योग्यवेळी साधलेल्या संवादामुळे सुटतात.
      त्याचबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणूस हा समाजप्रिय प्राणी असून तो एकाकीपणाला खूप घाबरतो, त्यावरही संवाद हेच सर्वोत्तम औषध आहे. आपल्या जवळच्या माणसांशी, मित्र-परिवाराशी नियमितपणे केलेला संवाद आपले मानसिक स्वास्थ्य वाढवायला मदत करतो. अशाप्रकारे, जर येणाऱ्या काळात आपल्याला आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर संवाद हा हवाच. तेव्हा बोलते व्हा!

(५) अभिव्यक्ती.

(अ) 'नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही', लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.

लेखकाच्या मताशी मी सहमत आहे, कारण आज जरी आपण विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठले असले तरी आपली जीवनशैली मात्र आपलाच घात करणारी ठरत आहे. आपण पुढे पुढे जाण्याच्या, अधिकाधिक पैसा मिळवण्याच्या नादात माणुसकीचे तत्त्व विसरत चाललो आहोत. या आधुनिक युगात यांत्रिक कामे आणि संवादाला महत्त्व आले आहे. स्वार्थ पाहून नाती जपली जातात. एकमेकांविषयी वाटणाऱ्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. माणुसकी तर केव्हाच हद्दपार झाली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘सेल्फीचे’ अतिरेकी वेड. सेल्फीच्या नादात अनेकांनी जीव गमावल्याचे तर आपण वाचतोच; पण त्याचबरोबर अपघाताच्या ठिकाणी जखमीला मदत न करता तिथे सेल्फी काढणे, व्हिडिओ घेणे हे कशाचे द्योतक आहे? दुसऱ्याच्या वेदनेवर असे तटस्थ राहणे, ‘माझा काय संबंध’ या भावनेने दुर्लक्ष करणे ही समाजासाठी निश्‍चितच धोक्याची घंटा आहे. सतत मोबाइल इंटरनेटमध्ये हरवलेली नवी पिढी आपल्या सोशलमीडियावरील मित्रमंडळींमध्ये आपल्या जवळच्या माणसांना विसरून जाताना दिसते. मोठमोठ्या इमारतींमध्ये ब्लॉक सिस्टिमचे पालन करताना शेजारधर्म विसरून मानव बंद दरवाज्याआड एकाकी होत आहे. प्रत्येक जण केवळ स्वत:ची सोय पाहतो. सर्व सुख-सुविधा पायाशी लोळण घेत असल्याने हल्लीच्या मुलांना एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करावी लागते हेच कळत नाही. अशी ऐदी, चैनीच्या मानसिकतेवर जोपासलेली पिढी उद्याचे देशाचे भविष्य कसे घडवणार? यातून फक्त यांत्रिक पिढीच निपजणार. हे सर्व थांबवायचे असेल, तर लेखक म्हणतात त्याप्रमाणे ‘मनजागरण’ होणे फार गरजेचे आहे.

(आ) 'इथे माणूस 'दिसत' होता, पण 'जाणवत' नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती', या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

वरील विधान मानवाची सद्यस्थिती दर्शवणारे, मानवाचे मानवापासून दुरावणे, संवादाचे माध्यमच नाहीसे होणे या समस्यांच्या तीव्रतेची जाणीव करून देणारे आहे. पैसा मिळवला, की माणूस सुखी होतो, हे तत्त्वज्ञान समाजात पसरले गेले आणि मग संवाद लोप पावून उरला तो फक्त व्यवहार. हीच गत कुटुंबाचीही झाली. पैसा कमवण्याच्या स्पर्धेत माणूस इतका गढून गेला, की घराघरातला संवाद हरवू लागला. आई-वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारा उबदार मायेचा ओलावा आटू लागला. आता माणसाकडे पैसा आला; पण नाती ही फक्त इतरांना दाखवण्यापुरती किंवा वरवरची अशीच उरली. म्हणजे एकाच कुटुंबात राहणारी माणसे रोज एकमेकांना भेटत होती, एकमेकांशी बोलत होती; पण नात्यातली ओढ, उत्कटता विस्कटत चालली होती. आपल्याच माणसांचा संवाद आपलाच माणूस दुर्लक्षित करत होता, त्यामुळे एका मनाची व्यथा, भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचतच नव्हती.

इ) संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे भाकीत तुमच्या शब्दांत व्यक्‍त करा.

संवाद हा खरंतर मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि समाजातील इतर घटकांशी जुळवून घेताना त्याला सर्वाधिक गरज भासते ती संवादाची; पण अलीकडे काही वेगळेच चित्र आपल्याला दिसून येते. पैसा मिळवणे आणि तो टिकवण्यासाठी स्वत:चा वेळ, आरोग्य, भावभावना पायदळी तुडवणे हे जणू नित्याचेच झाले आहे. ही परिस्थिती निश्‍चितच स्वागतार्ह नाही.
      जर आपण दिवसेंदिवस यंत्रवत होऊन काम करत राहिलो, तर आपणही त्या यंत्रासारखेच भावनाशून्य होऊ. संवादाच्या कृत्रिम साधनांच्या वापराने आपण आज खूश असलो तरी भविष्यात हीच साधने आपल्याला एकमेकांपासून दूर करणार आहेत हा धोका ओळखण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत. जरा विचार करा, केवळ तासन्‌तास समाजमाध्यमांवर चॅटिंग करून, कृत्रिम संदेश, शुभेच्छांमधून मायेचा ओलावा जाणवेल तरी का? तसा तो जाणवत असता, तर मग आज समाजमाध्यमांवर सक्रीय असणाऱ्यांमध्ये एकाकीपणाची भावना जी लक्षणीय प्रमाणात आढळून येते ती का जाणवते? समोरासमोर असूनही एकमेकांशी काय बोलावं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसून येते. वरवर ही गोष्ट साधी वाटली तरी याचे परिणाम अतिशय घातक आहेत आणि ते आता समोरही येऊ लागले आहेत. संवादाअभावी मनोरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आत्मकेंद्रितपणा, ताणाचा निचरा न होणे, निद्रानाश, चिडचिड ही सारी लक्षणे हळूहळू माणसांत विकृती निर्माण करतात. यामुळेच की काय सहनशक्ती कमी होऊन आत्महत्यांचे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे, संवादाचा अभाव हा भविष्यातील मानवी जीवनासाठी अतिशय धोकादायक आहे.

error: Content is protected !!