पाठ ७. फूटप्रिन्ट्स (Marathi Question Paper Solution)

फुटप्रिन्ट्स हे सुमितने तयार केलेले अॅप होते.

माझ्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशी म्हणजेच मीना मावशी जणू आमच्या घरातील एक सदस्यच. अनेक वर्षांचं विश्वासाचं नातं आहे आमच्यात. संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून आम्ही निश्‍चिंत असतो. त्या मात्र प्रामाणिकपणे सातत्याने कामात गढलेल्या असतात. पतीच्या निधनानंतरही साऱ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी मीना मावशी आपल्या मुलांच्या बरोबरीने स्वत:ही रात्रशाळेत शिक्षण घेते. मुलांच्या उच्चशिक्षणासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी तो सतत धडपडते. आम्ही आमच्याकडचे दिलेले ज्यादाचे सामान ती फक्त स्वत:पुरते राखून ठेवत नाही, तर वस्तीतल्या इतर गरजूंनाही ती ते पुरवते. मीना मावशी कडक शिस्तीची आणि स्वाभिमानीही आहे. आपल्या तत्त्वांशी ती कधीही तडजोड करत नाही. त्यामुळे, आम्हांला तिचा खूप अभिमान वाटतो.

‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे आपण प्रत्येकाने केलेल्या थोड्या-थोड्या चुकांचा आता भस्मासूर बनून जागतिक तापमान वाढीच्या रूपात अवतरला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मागचा-पुढचा विचार न करता केली जाणारी जंगलतोड प्रथमत: थांबवली पाहिजे. विषारी धूर सोडणाऱ्या कारखान्यांवर नियंत्रण लावले पाहिजे. प्रदूषणाविषयक कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या कमी केली पाहिजे. त्याऐवजी सार्वजनिक वाहतुकीवर भर दिला पाहिजे. याव्यतिरिक्त वातानुकूलित यंत्र, शीतकपाटे, परफ्युम्स इत्यादी रासायनिक वायू निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर कमी केला पाहिजे. शिवाय, प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवून त्याची काळजी घेतली पाहिजे. यामुळे, जागतिक तापमान वाढीचा प्रश्‍न सोडवता येणे शक्‍य होईल.

शाळा हे विद्येचे मंदिर असते. त्यामुळे, या ज्ञानदेवतेच्या मंदिरात स्वच्छता नांदणे तितकेच महत्त्वाचे असते. यासाठी प्रत्येकानेच प्रयत्नशील राहणे आवश्यक ठरते. माझी शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याकरता मी शाळेतील कचरा व्यवस्थापनावर लक्ष पुरवेन. शाळेत होणारा कचरा कचरापेटीतच टाकला जाईल याची दक्षता घेईन. शाळेचा परिसर प्रसन्न वाटावा याकरता शाळेच्या आवारात झाडे लावून त्यांची काळजी घेईन. झाडांच्या पानांचा वापर खत निर्मितीसाठी करून त्याचा वापर त्याच झाडांच्या वाढीसाठी करेन. शाळेचा अस्वच्छ परिसर सफाई कामगारांकडून स्वच्छ करून घेईन. शाळेत स्वच्छता शिबिर राबवण्याचा प्रस्ताव मुख्याध्यापकांसमोर ठेवेन. शाळेतील वापरात नसलेल्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावेन. त्याकरता शिक्षकांची परवानगी घेईन. अशाप्रकारे, शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरता मी प्रयत्नशील राहीन.