६. दवांत आलिस भल्या पहाटीं

(१) योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

(अ) शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे –
       (१) शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.

       (२) शुक्रताऱ्याच्या आकाशी आगमनात.
       (३) शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.
       (४) शुक्रताऱ्याच्या अहंकारीपणात.

शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात

(आ) हिरवे धागे म्हणजे –
         (१) हिरव्या रंगाचे सूत.
         (२) हिरव्या रंगाचे कापड.
         (३) हिरव्या रंगाचे गवत.
         (४) ताजा प्रेमभाव.

हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव

(इ) सांग धरावा कैसा पारा! म्हणजे –
       (१) पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.
       (२) हातातून निसटणारा पारा.
       (३) पाऱ्यासारखा चकाकणारा.
       (४) पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला.

सांग धरावा केसा पारा! म्हणजे – पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव

(ई) अभ्रांच्या शोभेंत एकदा म्हणजे –
       (१) आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.
       (२) काळ्या मेघांप्रमाणे.
       (३) आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे.
       (४) आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे.

अभ्रांच्या शोभेंत एकदा म्हणजे – आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे

(२) (अ) प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्‍न निवडा.

               (१) प्रेयसीचे नाव काय?
               (२) ती वळून पाहणे का विसरली असावी?
               (३) भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी?
               (४) ती कुठे राहते?
               (५) तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
               (६) तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
               (७) तिचे डोळे कोणता इशारा देतात?
               (८) तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?

i.     ती वळून पाहणे का विसरली असावी?
ii.    भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी?
iii.   तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
iv.   तिचे डोळे कोणता इशारा देतात?
v.    तळहाताच्या नाजुक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?

(आ) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

        (१) वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी?

‘ अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग! ‘

        (२) तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्यकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?

‘ तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणीं पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन्‌
शुभ्र चांदण्या कुणिं गोंदाव्या! ‘

        (३) विरल, सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.

‘ दवांत आलिस भल्या पहाटीं
अभ्रांच्या शोभेंत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा. ‘

(३) (अ) सूचनेप्रमाणे सोडवा.

        (१) ‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्‍न तयार करा.

कवीची प्रेयसी कवीला भेटण्यासाठी कोणत्या वेळी आली?

        (२) एका वाक्यात उत्तरे लिहा.

              (अ) कवीची प्रेयसी केव्हा आली?

कवीची प्रेयसी दवभरल्या पहाटेच्या संधिकाली आली.

              (आ) डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?

कवी डोळ्यांना डाळिंबांची उपमा देतो.

              (इ) कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?

कवीला जाणवलेली प्रेयसीची पावले तरल शोभा आणि आठवणींचा मंद गंध पेरत जाणारी आहेत.

              (ई) प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती?

प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत ‘कोमल’ व ‘ओल्या’ ही दोन विशेषणे वापरली आहेत.

              (उ) ‘अनोळख्याने’ हा शब्द कोणासाठी वापरला आहे?

‘अनोळख्याने’ हा शब्द कवीने स्वत:करता वापरला आहे.

(आ) खालील चौकटी पूर्ण करा.

(४) काव्यसौंदर्य.

        (अ) ‘डोळ्यांमधल्या डाळिंबांचा, सांग धरावा कैसा पारा!’ या काव्यपंक्‍तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

      ‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ ही प्रेमकविता कवी बा. सी. मर्ढेकर यांनी लिहिली आहे. यात त्यांनी प्रेमातील परस्परविरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मन:स्थितीचे अत्यंत तरलपणे चित्रण केले आहे.
      कवी म्हणतो, ‘लक्ष्य भलतीकडेच दाखवून प्रेमपिपासा लपवणारी तुझी चंचल नजर मला खुणावत आहे. तुझे सौंदर्य मला मोहवत आहे. तुझ्या डोळ्यांत दिसणारी ती लाजेची, प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसटणारा सुखद क्षण मी कसा बरे धरून ठेवू?’
      येथे, कवी प्रेयसीच्या रूपसौंदर्याचे अत्यंत रसिकतेने वर्णन करतो. ‘तिच्या’ डोळ्यांतील लाजेच्या प्रेमाच्या लालीला डाळिंबांची उपमा देत कवी कोमल प्रेमभाव नेमकेपणाने चित्रित करतो.

        (आ) ‘जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
                 मंद पावलांमधल्या गंधा,’ या ओळींमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

      ‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ ही प्रेमकविता कवी बा. सी. मर्ढेकर यांनी लिहिली आहे. यात त्यांनी प्रेमातील परस्परविरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मन:स्थितीचे अत्यंत तरलपणे चित्रण केले आहे.
      ही कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आहे. अशाच एका भल्या पहाटे दव पडण्याच्या वेळी आठवणींच्या धुक्यात हरवलेल्या कवीला तिच्या येण्याचा भास झाला. विरल, सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना ती आली आणि आठवणींचा गंध मनात पेरत हळुवार पावलांनी निघून गेली असा आशय या ओळींतून व्यक्‍त होतो.
      येथे कवी कोमल प्रेमभाव, मनाच्या कप्प्यात जपलेल्या प्रेयसीच्या आठवणी यांच्याविषयी बोलत आहे. प्रेमवेड्या मनाच्या हळव्या भाववृत्ती कवीने येथे अत्यंत तरलपणे टिपल्या आहेत.

(५) अभिव्यक्ती.

प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.

      ‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ ही कवी बा. सी. मर्ढेकरांची कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य चित्रण आहे. ही फक्त प्रेमकविता नाही, तर भावकविता आहे.
      या कवितेत काव्यसौंदर्य, भावसौंदर्य व आशयसौंदर्य पुरेपूर आढळते. शुक्राच्या तोऱ्यात आलेली ती, तिच्या तरल पावलांमधली शोभा या शब्दसमूहांतील कल्पनासौंदर्य, ‘डोळ्यांमधील डाळिंब’ या प्रतीकाद्वारे टिपलेले रूपसौंदर्य त्यातील वेगळेपणामुळे उठून दिसते.
       ही कविता भावोत्कट असून प्रेमातील परस्परविरोधी, संमिश्र भावभावनांचा व हळव्या मनोवृत्तीचा अत्यंत सूक्ष्मतेने वेध घेते. ही कविता प्रयोगशीलही आहे कारण ‘पुढे जराशी हसलिस’ नंतर अर्धविरामाचा वापर करत ‘मागे’ या शब्दाची विशिष्ट मांडणी कवीने केली आहे. जेणेकरून वाचकमनात ‘मागे’ या शब्दाविषयी कुतूहल जागे होते.
      ही भेट प्रत्यक्षातील आहे, की स्वप्नातील याचा अंदाज येत नाही. त्या प्रेमाचे भवितव्यही कवीने अर्ध्यावर सोडून दिले आहे. त्यामुळे, वाचकांच्या मनात ‘त्याच्या’ व ‘तिच्या’ प्रेमाच्या या अनाकलनीय भवितव्याविषयी उत्कंठा वाढते. कविता मुक्‍तछंदात असली तरी कवीने आलिस, जवळुनि, अडलिस अशा ऱ्हस्व शब्दांद्वारे आंतरिक लय साधली आहे आणि तिसऱ्या कडव्यापासून सहाव्या कडव्यापर्यंत यमक अलंकाराचाही वापर केला आहे, म्हणून या कवितेत रचनेच्या दृष्टीने नावीन्य आढळते.
      या कवितेतील प्रियकर सौंदर्यासक्‍त, रसिक आहे. तो तिच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला असला तरी त्याचा अनुभव तो संयतपणे व्यक्त करतो. ‘तीच हवी’ असा त्याचा अट्टाहास नाही. ती जरी कायम सोबत नसली तरी तिच्या आठवणींची कुपी तो आनंदाने जपतो व त्या आठवणींच्या कुपीतील सुगंधाचा आस्वाद तो अधूनमधून आवडीने घेत राहतो.
      अशा प्रकारे रचनेच्या, आशयाच्या दृष्टीने त्यांची प्रेमकविता वेगळी ठरते.

(६) रसग्रहण.

‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ या कवितेचे रसग्रहण करा.

      ‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ ही कवी बा. सी. मर्ढेकरांनी लिहिलेली प्रेमकविता आहे. प्रेमातील परस्परविरोधी भावना, प्रेमाचे अनाकलनीय भवितव्य, विरह, हळवी मन:स्थिती टिपत प्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणीचे वर्णन  करणे हा प्रस्तुत कवितेचा विषय आहे.
      पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीशी भेट झाली. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यांमुळे कवीचे मन मोहरून गेले; परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी वागली तेव्हा कविमन व्याकुळ झाले, असा आशय कवितेतून व्यक्‍त होतो.
      ही फक्त प्रेमकविता नाही, तर भावकविता आहे. या कवितेची भाषा भावोत्कट, तरल असून सूक्ष्म भाव-भावनांची आंदोलने टिपणारी आहे. रसिकपणे प्रेयसीच्या रूपसौंदर्याचा, चालीतील मनमोहकपणाचा आस्वाद घेता घेता प्रेमाच्या अनाकलनीय भवितव्याचा वेध घेऊ पाहणारी आहे. आपल्या अनुभवाची कलात्मक व सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती करणारी भाषाशैली या कवितेत आढळते.
      या कवितेत कवीने नव्या आशयाच्या प्रतीक-प्रतिमांचा चपखलपणे वापर केलेला आढळतो. ‘हिरवे धागे’, ‘तळहाताच्या नाजुक रेषा’, ‘डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा’ या प्रतीक-प्रतिमा खूप बोलक्या आहेत. त्या सूचकपणे कवितेत पेरल्या आहेत. येथे भाषेसह, विरामचिन्हांचाही नावीन्यपूर्ण पद्धतीने वापर केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, ‘पुढे जराशी हसलिस’ नंतर कवीने अर्धविरामाचा वापर करत ‘मागे’ या शब्दाची विशिष्ट मांडणी केली आहे. जेणेकरून वाचकमनात ‘मागे’या शब्दाविषयी कुतूहल जागे होते.
      या कवितेत काव्यसौंदर्य, भावसौंदर्य व आशयसौंदर्य पुरेपर आढळते. एका शब्दाच्या विविध अर्थच्छटा येथे पाहायला मिळतात. उदाहरणार्थ ‘लक्ष्य’ या शब्दाचे दोन अर्थ ध्वनित होतात. लक्ष्य म्हणजे तिचे लक्ष आणि लक्ष्य म्हणजे ‘नेम’. त्यातूनही कवितेच्या आशयसौंदर्यात भर पडली आहे.
      ही प्रेमकविता मुक्‍तछंदात रचलेली असून समर्पक शब्दांत कवीच्या भावना व्यक्‍त करते. स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीच्या तळमळीचे, विरहाचे, मनाच्या व्याकुळतेचे येथे दर्शन घडते. त्यामुळे, कविता वाचल्यानंतर शृंगाररसाचा प्रत्यय येतो.
      अडलिस, आलिस अशा र्‍हस्व शब्दांमुळे व काही कडव्यांत यमक योजल्यामुळे कवितेत आंतरिक लय साधली गेली आहे. प्रस्तुत कवितेचे रचनासोंदर्य, तिच्यातील कल्पनासौंदर्य अप्रतिम आहे, त्यामुळे ही कविता मला खूप आवडते.