भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले ताडोबा अभयारण्य माझ्या विशेष आवडीचे आहे. विविध प्रकारची वृक्षराजी कोरडे पानगळ वन, सपाट मैदानी भूप्रदेश, खोल दरी, तलाव आणि विविध प्रकारची प्राणिसंपदा अशी विविधता येथे आढळून येते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे अभयारण्य पट्टेरी वाघांसाठी राखीव क्षेत्र आहे. हेच या अभयारण्याचे आकर्षण आहे. या वाघाबरोबरच बिबट्या, अस्वल, उदमांजर, रानमांजर, रानकुत्रे, वन्यबैल, गवा, ढोल, तरस, लाडंगा, कोल्हा, हरिण, सांबर, चितळ, भेकर, नीलगाय, अजगर, कोबा, घोरपड अशा प्राणिसंपदेने हे अभयारण्य समृद्ध आहे. याशिवाय, येथे आढळणारे विविध जातीचे पक्षी व फुलपाखरे हीदेखील प्रेक्षकांना येथे आकर्षित करतात. येथे प्रशिक्षित मार्गदर्शकासह जीपमधून केलेली जंगल सफारी म्हणजे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. येथील निसर्गाची किमया पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.