पावसात न्हाऊन निघालेली, जणू हिरवा शालू नेसलेली वसुंधरा (पृथ्वी) दिवसेंदिवस कुरूप होत चालली आहे. प्रगतिच्या नावाखाली तिचे सौंदर्य ओरबाडले जात आहे. तिचे हिरवेपण जपण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण/वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपन करण्याची खूप आवश्यकता आहे.
केवळ ‘झाडे लावा’ असे म्हणून चालणार नाही, तर लावलेली झाडे ‘जगवा’ असे म्हणावे लागेल. त्याकरता प्रत्येकाने आपल्या नावाने किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने एकतरी झाड लावून जोपासले पाहिजे. तसेच, झाडापासून बनवलेल्या प्रत्येक वस्तूचा व निसर्गातील साधनसंपत्तीचा जपून व काटकसरीने वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ, कागद. कागद बनवण्यासाठी झाडे कापावी लागतात. त्यामुळे, कागदाचा योग्य तेवढा वापर करायला हवा किंवा उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या पर्यायी कागदाचा वापर करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे.
तसेच, वनांसाठी राखीव जागा ठेवणे, इमारतींच्या आवारात शाळा-महाविद्यालयांत झाडे लावणे, पाण्याचा थेंब न् थेंब जपून वापरण्यासाठी कार्यशाळा राबवणे असे उपक्रम घेता येतील. पर्यावरण संवर्धनाशी संबंधित स्पर्धा आयोजित करून लोकसहभागातून वसुंधरेचे संवर्धन व संगोपन करण्याकरता पुढाकार घेता येईल, असे मला वाटते.