वरील काव्यपंक्ती ही जॉर्ज लोपीस यांच्या ‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेतील आहे. सहनशीलता, परोपकारी वृत्ती, नेहमी सर्वांना भरभरून देत राहण्याचा दानीपणाचा गुण, कठीण प्रसंगांतही न डगमगता पाय रोवून राहण्याचा खंबीरपणा हे झाडाचे गुण आपणही आपल्यामध्ये आणावेत असा संदेश कवी देत आहे.
झाडांच्या अनेक परोपकारांपैकी आणखी एक परोपकार म्हणजे झाडांपासून होणारी कागदनिर्मिती. जेव्हा झाडाच्या पानांचे रूपांतर कागदात होते, तेव्हा त्या पानांवरील दवबिंदू ‘अक्षरे’ बनून वहीच्या पानावर अलगद उतरतात, अशी सुंदर कल्पना कवी येथे करत आहे. वास्तव अतिशय तरल शब्दांत कवीने येथे मांडले आहे.