शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित राहिले, तर त्याला शिक्षण म्हणता येत नाही. जे शिकलो ते वर्तनात आणणे, तसे आचरण करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षणातून विविध मूल्ये, संस्कार मनावर रुजवले जातात. त्यांचा प्रत्यक्षात उपयोग झाला नाही, तर मात्र त्याची किंमत शून्य होते. ‘प्राण्यांवर दया करा’ हा उपदेश शिक्षणातून दिला जातो; पण प्रत्यक्षात आपण मात्र प्राण्यांशी क्रूरपणे वागत असू, तर त्या शिक्षणाला शिक्षण म्हणताच येणार नाही. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, तर शिक्षण म्हणजे या पुस्तकातील मूल्यांचा, ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात केलेला अवलंब होय.