‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे आपण प्रत्येकाने केलेल्या थोड्या-थोड्या चुकांचा आता भस्मासूर बनून जागतिक तापमान वाढीच्या रूपात अवतरला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मागचा-पुढचा विचार न करता केली जाणारी जंगलतोड प्रथमत: थांबवली पाहिजे. विषारी धूर सोडणाऱ्या कारखान्यांवर नियंत्रण लावले पाहिजे. प्रदूषणाविषयक कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या कमी केली पाहिजे. त्याऐवजी सार्वजनिक वाहतुकीवर भर दिला पाहिजे. याव्यतिरिक्त वातानुकूलित यंत्र, शीतकपाटे, परफ्युम्स इत्यादी रासायनिक वायू निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर कमी केला पाहिजे. शिवाय, प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवून त्याची काळजी घेतली पाहिजे. यामुळे, जागतिक तापमान वाढीचा प्रश्न सोडवता येणे शक्य होईल.