

डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ असून त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. अनिल काकोडकरांचे हे व्यक्तिमत्त्व घडले ते त्यांच्या जीवनातील अनुभवांनी. कोणत्या अनुभवातून काय शिकावे याची उत्तम पारख त्यांना असल्याचे या पाठातून जाणवते. डॉ. अनिल काकोडकरांच्या मनात डॉ. होमी भाभांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला अजरामर स्थान असल्याचेही लक्षात येते. अशा मोठ्या व्यक्तींच्या विचारांचा आदर करणे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर अंमल करणे यातून त्यांच्यातील आज्ञाधारकपणा, प्रामाणिकपणा दिसून येतो. डॉ. अनिल काकोडकर हे आपल्या कामावर प्रचंड निष्ठा असलेले, जबाबदारीने काम पूर्ण करणारे, स्वप्रेरणेने अधिक कष्ट घेऊन काम करणारे, स्वत:चा मार्ग स्वत: शोधणारे असे व्यक्तिमत्त्व आहे. ‘स्काय इज द लिमिट’ या स्थितीचा अनुभव घेणारे, ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे कार्य करणारे, अनुभवाद्वारे शिक्षणावर विश्वास असणारे डॉ. अनिल काकोडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते.

लेखकाचे कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर ते बार्क म्हणजेच ‘भाभा अणुसंशोधन केंद्राच्या’ ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथे असताना त्यांना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्ती देणारे होते. ‘आपण काय काम करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे’ हा अतिशय महत्त्वाचा व प्रेरणादायी विचार डॉ. भाभांनी डॉ. काकोडकरांच्या मनात रुजवला. हे प्रशिक्षण संपल्यावर लेखक बार्कमध्येच इंजिनिअर म्हणून रुजू झाले.
लेखकाने त्यांनी दिलेल्या या सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर आपले काम आपणच शोधल्यास ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती खरोखरच निर्माण होत असल्याचा अनुभव घेतला.
बार्कमध्ये इंजिनियर म्हणून रुजू होताच लेखक डॉ. अनिल काकोडकर यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगण्यात आले; त्याकरता आवश्यक यंत्रसामग्रीही तेथे उपलब्ध होती; मात्र आतापर्यंत त्यावर कोणीही काम केलेले नसतानाही लेखकांनी ते काम हाती घेतले व मदतीसाठी एक वेल्डर व एक फोरमन यांची मागणी वरिष्ठांकडे केली; पण त्याला नकार मिळताच लेखकांनी स्वत: कामास सुरुवात केली आणि धडपड करत त्यांनी ते काम पूर्णही केले. त्यानंतर वरिष्ठांनी कार्यक्रमाची व्याप्ती वाढवायला सुरुवात केली आणि मग मात्र सारी मदत पुरवण्याची तयारी दर्शवली; मात्र ही मदत लेखकांनी नाकारली. आतापर्यंत इतरांकडून काम न होण्यामागील कारण वरिष्ठांकडून कळताच मात्र ‘आधी तुम्ही करू शकता हे दाखवा, मग इतरांना काम सांगा’ या विचाराची लेखकास प्रचिती आली. अशाप्रकारे, लेखक बार्कमधील अनुभवांनी अधिक प्रगल्भ झाले.

डॉ. होमी भाभा हे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक डॉ. अनिल काकोडकर यांना भाभा अणुसंशोधन केंद्रात काम करत असताना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्ती देणारे होते. ‘आपण काय काम करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे’ हा अतिशय महत्त्वाचा व प्रेरणादायी विचार डॉ. भाभांनी डॉ. काकोडकरांच्या मनात रुजवला.

विद्यार्थी: सर, आम्ही इतकी मुलं-मुली आहोत; पण सर्वांना पुरेल इतकं काम बार्कमध्ये कुठे आहे?
वैज्ञानिक: तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत रहा, त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आता विचार करू नका; मात्र एक करा, तुम्ही स्वत:च काम निर्माण करा.
विद्यार्थी: म्हणजे नक्की आम्ही काय करायचं?
वैज्ञानिक: आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वत:च ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल, तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे.
विद्यार्थी: सर, तुम्ही आमच्या विचारांना नवी दिशा दिलीत. आम्हांला याचा भावी आयुष्यात नक्कीच फायदा होईल. धन्यवाद सर!