८. ऐसीं अक्षरें रसिकें

(१) (अ) कृती करा.

(आ) रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा.

1

(इ) 'रसाळ बोल' आणि 'सूर्य' यांच्या कार्याच्या माध्यमातून खालील तक्ता पूर्ण करा.

5

(२) अर्थ स्पष्ट करा.

अ) 'माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके।'

प्रस्तुत ओवी संत ज्ञानेश्‍वरांच्या ‘ज्ञानेश्‍वरी’ या ग्रंथातील आहे. मराठी भाषेविषयी गौरवाची भावना व्यक्‍त करताना संत ज्ञानेश्‍वर म्हणतात, ‘माझ्या मराठीचे बोल अमृतापेक्षाही अवीट गोडीचे आहेत. ते इतके रसाळ, मधुर आहेत, की अमृताशीही पैजा जिंकतील.’
        येथे कवी मराठी भाषेतील माधुर्य टिपत तिच्याविषयीचा अभिमान व्यक्‍त करत आहेत.

(आ) वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।

प्रस्तुत ओवी संत ज्ञानेश्‍वरांच्या ‘ज्ञानेश्‍वरी’ या ग्रंथातील आहे. यात त्यांनी मराठी भाषेविषयी गौरवाची भावना आणि आपल्या शब्दसामर्थ्यावर असणारा सार्थ विश्‍वास व्यक्‍त केला आहे.
       या ओवीत संतकवी ज्ञानेश्‍वर म्हणतात, ‘माझ्या मराठीचे बोल नादब्रह्माहूनही अधिक कोवळे, मधुर, श्रवणीय आहेत. म्हणजेच, या शब्दांची कोवळीक नादब्रह्माहूनही अधिक रंगतदार आहे, त्यांच्या सुवासिकतेपुढे परिमळही (सुगंधही) फिका पडेल!’
       येथे कवी आपल्या अजोड रसिक वृत्ती व कल्पनावैभवाच्या आधारे रसाळ बोलांचे अनन्यसाधारणत्व वर्णन करत आहेत.

(३) चौकटी पूर्ण करा.

1
1

(४) काव्यसौंदर्य.

खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

(अ) ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा । बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।

प्रस्तुत ओवी संत ज्ञानेश्‍वरांच्या ‘ज्ञानेश्‍वरी’ या ग्रंथातील आहे. यात त्यांनी मराठी भाषेविषयी गौरवाची भावना आणि आपल्या शब्दसामर्थ्यावर असणारा सार्थ विश्‍वास व्यक्‍त केला आहे.
        ‘माझ्या मराठी भाषेतून अमृताशीही पैजा जिंकणारी अशी रसाळ शब्दमाळा मी गुंफीन’ असा आत्मविश्‍वास व्यक्‍त करणारे संत ज्ञानेश्‍वर त्या शब्दांतील रसाळपणाचे वर्णन करताना म्हणतात, ‘या शब्दांच्या रसाळपणाच्या लोभापायी कानांनाही जिभा फुटतील, म्हणजेच त्या रसाळ शब्दांचा स्वाद चाखण्यासाठी कानही आतुर होतील. सर्व इंद्रियेसुद्धा तो ब्रह्मरस चाखण्यासाठी एकमेकांशी भांडतील.’
         येथे कवी आपल्या अजोड रसिक वृत्ती व कल्पनावैभवाच्या आधारे रसाळ बोलांचे अनन्यसाधारणत्व स्पष्ट करत आहेत. रसाळ शब्दांचा स्वाद घेण्यासाठी सर्व इंद्रिये कशी आतुर झाली आहेत, याचे वर्णन येथे केले आहे.

(आ) तैसें शब्दांचें व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।।८।।

प्रस्तुत ओवी संत ज्ञानेश्‍वरांच्या ‘ज्ञानेश्‍वरी’ या ग्रंथातील आहे. यात त्यांनी मराठी भाषेविषयी गौरवाची भावना आणि आपल्या शब्दसामर्थ्यावर असणारा सार्थ विश्‍वास व्यक्‍त केला आहे.
        प्रस्तुत ओवीत संतकवी ज्ञानेश्‍वर म्हणतात, ‘या रसाळ बोलांची व्यापकता अनन्यसाधारण आहे. या शब्दांचे सामर्थ्य अफाट आहे. भाव जाणणाऱ्यांना किंवा गुण जाणणाऱ्या व्यक्‍तींना या शब्दांमध्ये इच्छिलेल्या मनोकामना क्षणार्धात पूर्ण करणाऱ्या चिंतामणीचे गुण आढळतात.’
        येथे कवी शब्दांना चिंतामणीची प्रभावी उपमा देत शब्दांचे सामर्थ्य वर्णन करत आहेत.

(५) अभिव्यक्ती.

'मराठी भाषेची थोरवी' तुमच्या शब्दांत लिहा.

‘माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजा जिंके’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्‍वरांनी मराठी भाषेविषयी गौरवोद्गाार काढले आहेत. मराठी भाषा इतकी समृद्ध व लवचीक आहे, की तत्त्वज्ञान, भक्ती, काव्य असा कोणताही विषय ती सहज व समर्थपणे पेलू शकते.
        मराठी भाषेतील वाङ्मय विपुल आहे. या भाषेला लिखित वाङ्मयासोबतच लोकवाङ्मयाचीही समृद्ध परंपरा लाभली आहे. प्रमाणभाषेसोबतच विविध बोलीभाषांनीही मराठीला समृद्ध केले आहे.
        ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज, ‘ज्ञानेश्‍वरी’, ‘ अमृतानुभव’ सारखे अजोड रसिकता ब तत्त्वज्ञानाने भरलेले ग्रंथ लिहिणारे ज्ञानेश्‍वर, ‘लीळाचरित्र’ हा पहिला गद्यग्रंथ लिहिणारे म्हाइंभट यांनी मराठी भाषेतील विविध वाङ्मयप्रकारांचा पाया रचला.
        त्यानंतर मध्ययुगीन काळात संत, पंत (पंडिती काव्य), तंत (शाहिरी काव्य) असे तीन प्रवाह मराठी वाङ्मयात तयार झाले. प्रत्येक साहित्यप्रवाहाने मराठी भाषेला संपन्न केले. स्वातंत्र्योत्तरकाळात ग्रामीण, दलित, स्त्रीवादी साहित्याने मराठी भाषेला उपेक्षितांचे जीवन दाखवले. सध्याच्या आधुनिक काळात महानगरीय जीवनजाणिवा मराठी भाषेत रुळू पाहत आहेत.
        ‘मराठी’ ही आपली मायबोली आहे. मनातील विचार, भावभावना, कल्पना सहजपणे व्यक्‍त करण्याचे ते एक प्रभावी माध्यम आहे. आपल्या या मायबोलीमुळे आपले सर्व जीवनव्यवहार सुरळीत सुरू आहेत. ज्ञान व मनोरंजन या आपल्या बौद्धिक गरजा तीच पूर्ण करते. आपल्या विकासात तिचे मोठे योगदान आहे. बालपणी गायलेली बडबडगीते, ऐकलेल्या कथा, कविता यांमुळे आपले भावविश्व समृद्ध होत असते, मायबोलीच्या माध्यमातूनच आपल्याला जगाची ओळख करून दिली जाते. मुलांची चांगल्याप्रकारे जडणघडण व्हावी म्हणून मूल्ये व संस्कार रुजवण्यासाठी मायबोली आवश्यक असते. आपल्या जीवाचे बौद्धिक, सामाजिक, वैचारिक भरणपोषण तिच्यामुळे होते.
        मराठी भाषेची थोरवी अशी अगाध आहे. त्यामुळे, तिचा गौरव फक्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यापुरताच मर्यादित न ठेवता मराठीतून बोलणे, पत्रव्यवहार करणे, दैनंदिन जीवनव्यवहारात मराठीचा वापर करणे, मराठी साहित्य वाचणे, मराठीतून शिक्षण घेणे हे आवडीने घडले पाहिजे, तरच आपण आपल्या मायबोलीचे संवर्धन करून तिला संपन्न करू व तिचे पांग फेडू असे मला वाटते.

(६) 'ऐसीं अक्षरें रसिकें' या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.

ज्ञानेश्‍वरीतील ‘ऐसीं अक्षरें रसिकें’ ही रचना श्रेष्ठ संत, प्रज्ञावंत तत्त्वज्ञ व अलौकिक प्रतिभावान कवी ज्ञानेश्‍वरांची आहे.
         भगवद्गीतेतील सहावा अध्याय म्हणजे ‘गीतार्थाचे सार’ होय. ते स्पष्ट करताना भाषेची कसोटी लागेल; पण असा गीतार्थ पेलण्यासाठी आवश्यक रसाळता मराठी भाषेत आहे, हे संतकवी ज्ञानेश्‍वर या रचनेद्वारे स्पष्ट करतात. ‘अतिंद्रिय परि भोगवीन इंद्रियांकरवी’ अशी प्रतिज्ञा त्यांनी ज्ञानेश्‍वरीच्या रचनेसंदर्भात केली होती. त्याचा प्रत्यय ही रचना वाचताना येतो. या भाषेचे बोल हे रंग, गंध, नाद, स्पर्श, रस या पंचसंवेदनांना जागृत करू शकतील असे आहेत. त्यामुळे, पंचेंद्रियांत रसाचा आस्वाद घेण्याची चढाओढ लागेल, अशी अजोड कल्पना संतकवी ज्ञानेश्‍वर येथे करतात. मराठी भाषेतील हे बोल म्हणजे जणू ‘कैवल्यरसाची पंचपक्वान्ने’ होत, जी निष्काम श्रोत्यांसाठी संत ज्ञानेश्‍वरांनी सादर केली आहेत.
         या आशयाचा आस्वाद घेण्यासाठी श्रोत्यांकडे आस्वादकता, तर असायला हवीच; पण आत्मप्रकाशाची स्थिरवृत्ती म्हणजेच ‘ठाणदिवी’ असणे आवश्यक आहे. जिच्याद्वारे त्यांना स्वानुभवातून ब्रह्मरसाचा आस्वाद घेता येईल असा आशय कवी येथे व्यक्‍त करतात.
         हे संतकाव्य अलौकिक आहे. माधुर्यगुणाने भरलेल्या या ओव्यांत तत्त्वज्ञान, भक्ती व काव्यसौंदर्याचा अपूर्व संगम आढळतो. आपल्या अजोड रसिक वृत्तीच्या आधारे संत ज्ञानेश्‍वर मराठीचे बोल अमृतापेक्षाही गोड आहेत, परिमळ त्यांच्या सुवासापुढे फिका पडेल, नादब्रह्माहूनही ते मधुर, श्रवणीय आहेत असा दावा करतात. सूर्य, चिंतामणी अशी प्रतीके वापरून शब्दांचे व्यापकत्व व सामर्थ्य अधोरेखित करतात. आत्मप्रभेचे नित्यनूतनत्व व त्या प्रकाशात सर्व इंद्रियांच्या नकळत ब्रह्मरसपान करण्याची अर्मूत कल्पना शब्दबद्ध करतात.
         ज्ञानेश्वरांची भाषाशैली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेही दर्शन घडवते. त्यांच्या रचनेत विनयशील वृत्ती, मातृहृदयी वात्सल्य, अजोड रसिकता अशा गुणवैशिष्ट्यांचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते.
         प्रस्तुत रचनेतील ‘श्रवणींचि होती जिभा’, ‘बोलांची ताटे भली’ कैवल्यरसें वोगरिलीं’ या शब्दसमूहांत टिपलेले कल्पनावैभव अजोड आहे. कौतुके, सहस्त्रकरु अशा उकारांत शब्दांमुळे भाषेचा गोडवा वाढला आहे व कवितेला नादसौंदर्य प्राप्त झाले आहे.
         ‘मराठीचे बोल अमृतापेक्षाही गोड आहेत’ असे म्हटल्यामुळे येथे व्यतिरेक अलंकार साधला जाऊन सौंदर्यनिर्मिती होते. तसेच कान, नाक, जीभ इत्यादी स्वतंत्र मानवी अवयव/इंद्रिये जणू मानवासारखेच वर्तन करू लागतील असे वर्णन आल्यामुळे येथे चेतनगुणोक्ती अलंकार साधला जाऊन आशयसौंदर्य वृद्धिंगत झाला आहे. ही कविता वाचल्यावर मनात शांती (शम) हा स्थायिभाव उत्पन्न होऊन मनाला शांत रसाचा प्रत्यय येतो.

error: Content is protected !!