Marathi (Second Language) Set 1 2019-2020 SSC (English Medium) 10th Standard Board Exam Question Paper Solution

विभाग १ - गद्य

पठित गद्य

प्र.१.(अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. [7]

    “दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ – सोकाजी त्रिलोकेकर.
    “तुला सांगतो मी पंत, ‘डाएट’ कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.”
    “हो! म्हणजे ‘कुठं राहता?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाडीत राहतो’ म्हणा. ‘बटाट्याची चाड’ म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगडयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी? मी सांगतो तुला पंत – तू बटाटा सोड.”

१. कोण ते लिहा. (2)

i.नेहमी तिरके बोलणारे – ………………….
ii.बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे – …………………..

i.नेहमी तिरके बोलणारे – जनोबा रेगे
ii.बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे – सोकाजी त्रिलोकेकर

२. कृती पूर्ण करा. (2)

३. पंतांना उपासाबाबत मिडालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (3)

वजन कमी करण्यासंदर्भात पंतांना अनेक लोकांकडून वेगवेगळे सल्ले मिळाले. गंमत अशी, की वजन कसे कमी करावे या विषयाचे ज्ञान असलेले अनेक लोक त्यांना भेटू लागले. त्यांच्या चाळीत राहणाऱ्या लोकांनी त्यांना डाएट करण्याविषयी सुचवले. सोकाजी त्रिलोकेकर हे त्यांच्यापैकी एक, त्यांनी पंतांना बटाटा वर्ज्य करण्याचा सल्ला दिला; किंबहुना बटाटा खाणं सोडण्याबरोबरच बटाट्याचं नावही घेणं पंतांनी थांबवावं असं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांचं हे बोलणं ऐकून जनोबा रेगे या पंतांच्या दुसऱ्या शेजाऱ्यांनी त्यांची चेष्टादेखील केली. बटाट्याची चाळ या नावातील बटाटादेखील पंतांनी वर्ज्य करावा आणि नुसतं चाळ म्हणावं असं ते थट्टा करत म्हणाले. इतरांना सल्ले देण्याची लोकांची  सवय आणि त्यावर लेखकांनी केलेले नर्मविनोद यांमुळे हा प्रसंग अतिशय गमतीदार वाटतो.

प्र.१.(आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. [7]

     आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासातील’ पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्‍य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!
     पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती.

१. का ते लिहा. (2)

i. डॉ. माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले, कारण ____

डॉ. माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले, कारण डॉ. माशेलकर हे सहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांना आईबरोबर मुंबईला जावे लागले.

ii. 'शाळेत कसा जाऊ?' असा प्रश्न डॉ. माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला, कारण ____

‘शाळेत कसा जाऊ?’ असा प्रश्न डॉ. माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला, कारण वडिलांच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाहासाठी मुंबईला आलेल्या माशेलकरांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती आणि कोणतीच फी भरणे त्यांना शक्‍य नव्हते.

२. कृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत. (3)

शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.

डॉ. माशेलकर लहान असतानाच त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. दारिद्र्यामुळे शाळेची फी भरणेदेखील त्यांना अवघड वाटत होते; मात्र दारिद्र्यातही त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा कमी झाली नव्हती. ते शिक्षणासाठी आसुसलेले होते. मोठ्या मुश्किलीने खेतवाडीतील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण सुरू केले. पायात घालायला चप्पलही नाही अशी परिस्थिती असतानादेखील त्यांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली. या सर्वांमधून माशेलकर यांची शिक्षणाविषयीची तीवर आस्था आणि तळमळ तसेच कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द हे गुण जाणवतात.

अपठित गद्य

प्र.१.(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. [4]

    संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वतःसाठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे.

१. योग्य जोड्या लावा. (2)

२.एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

i.  आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला – _______ 
ii. आपले पोषण करणारी – _______

i.  आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला –  संयम 
ii. आपले पोषण करणारी –  सृष्टी

विभाग २ - पद्य

प्र.२.(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. [8]

झाड बस्ते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत
धारण करून तपश्चर्या करत…
पक्षी झाडांचे कुणीच नसतात
तरीही झाड त्यांचं असतं
मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते
झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर
अलगद उतरतात दवांचे टपोरे येंब
झाडाकडे टक लावून पाहिलं तर
शरीरभर विरघळतो हिरवा रंग
रक्त होते क्षणभर हिरवेगार
आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत
झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी
पानझडीनंत्तर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं
नव्या नवरीसारखं
झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी
अन झटकली जाते मरगळ
पक्ष्यांच्या मंजुळ नादात झडाचंही जीवनाचं
एक संथ गाणे दडलेले असते
हसावं कसं सळसळत्या पानासारखं
मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत
जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं
रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं!

१. चौकटी पूर्ण करा. (2)

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

i.    मुकाट –
ii.   मुसाफिर –
iii.  संथ –
iv.  मौन व्रत –

i.    मुकाट – शांत
ii.   मुसाफिर – प्रवासी/ वाटसरू
iii.  संथ – सावकाश/मंद
iv.  मौन व्रत – काहीही न बोलणे

४. काव्यसौंदर्य: (2)

'जगावं कसं तर? हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

वरील काव्यपंक्ती जॉर्ज लोपीस यांच्या ‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेतील आहे. सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगातही न डगमगता पाय रोवून राहण्याचा खंबीरपणा हे झाडाचे गुण आपणही आपल्यामध्ये आणावेत असा संदेश कवी देत आहे. झाड आपल्याला सळसळत्या पानासारखे मनमोकळे हसायला शिकवते. मातीत घट्ट पाय रोवून उभे असणारे झाड आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती शिकवते, मातीत रुजण्याची, मुरण्याची कला शिकवते. हिरवेगार झाड आपल्याला जगायचे कसे हे शिकवते, तर रोज शांत चित्ताने चिंतन करण्याची कलाही झाडच शिकवते. असा विचार वरील ओळींद्ववारे कवी व्यक्त करतात. झाड जणू काही मानवाप्रमाणे विविध कृती करत आहे अशी वेगळी कल्पना येथे केली आहे.

प्र.२.(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

किंवा

विभाग ३ - स्थूलवाचन

प्र.३. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. [6]

(१) टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.

व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य होय. व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे प्रामुख्याने चार प्रकारचे असते, ते पुढीलप्रमाणे:
अ. शब्दाचे मूळ रूप दाखवणे: भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते.
उदाहरणार्थ मराठी भाषेतील ‘आग’ हा शब्द संस्कृतमधील ‘अग्नि’ या शब्दापासून आला आहे.
ब. अर्थांतील बदल स्पष्ट करणे: काळानुसार, शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्परसंबंधात बदल होतात. काहीवेळा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. उदा. व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान: पण सध्या ‘शहाणा’ म्हणजे ‘अतिशहाणा’ हा अर्थदेखील रूढ होत आहे. समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थदेखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात.
उदा. पाठ. शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा.
क. उच्चारातील बदल व फरक दाखवणे: एखाद्या शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हे ही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते.
उदा. दीपावली हा मूळ संस्कृत शब्द: मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे.
ड. बदलांचे कारण स्पष्ट करणे: भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांमागच्या कारणांची नोंद करणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे.

(२) 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.

लेखक ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ च्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असताना तेथे त्यांच्यासह सुमारे शंभर मुले-मुली दाखल झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी नेमलेल्या सर्वांना पुरेल एवढे काम बार्कमध्ये आहे का, असा प्रश्न प्रशिक्षणार्थींना पडला होता. त्यावेळी डॉ. होमी भाभा यांनी त्यांना “तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचे ते आपणच ठरवले पाहिजे. बॉसने आपल्याला सांगितलं असेल तेवढंच काम करायचं आणि काही सांगितलं नसेल तेव्हा आपल्याला कामच नाही असं समजायचं. ही चुकीची गोष्ट आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे.” असे मोलाचे मार्गदर्शन केले. लेखकाने त्यांनी दिलेल्या या सूचनेचे तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर आपले काम आपणच शोधल्यास ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती खरोखरच निर्माण होत असल्याचा अनुभव घेतला. म्हणजेच, एखादे काम करताना वरिष्ठ सांगतील तेवढे आणि तेवढेच न करता आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. स्वत: जबाबदारी घेऊन, स्वप्रेरणेने अधिकाधिक कष्ट घेऊन ते काम पूर्ण केले पाहिजे. आपण स्वत:च स्वत:ला घडवले, ऊर्जा मिळवली, स्वत:चे मार्ग स्वत:च शोधले, की ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती निर्माण होते.

(३) 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.

कॅक्टस हा वाळवंटी प्रदेशामध्ये दुष्काळाचा सामना करत जगणाऱ्या वनस्पतींचा जणू प्रतिनिधी आहे. वाळवंटात टिकून राहण्यासाठी निसर्गाने या झाडाला अनोखी वैशिष्ट्ये बहाल केली आहेत. पाऊस पडेल तेव्हा जे मिळेल ते पाणी कॅक्टस स्वतःमध्ये साठवून ठेवतो आणि कोरड्या हंगामामध्ये त्याची वाढ हळूहळू होत राहते. या झाडाच्या मुळांची रचना थोड्या वेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी असते. लांबवर मुळे पसरवून कॅक्टस सभोवतालच्या भागातील पाणी शोषून घेते. त्याचबरोबर कॅक्टसची अंगरचना पाणी साठवण्यासाठी अनुकूल अशी बनली आहे. त्याच्या अंगाचा कमीतकमी भाग कोरड्या, उष्ण हवेसमोर येतो. बहुतेक कॅक्टसची रचना घडीदार असल्यामुळे जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा घड्यांचा उपयोग पन्हाळीसारखा होऊन पावसाचे पाणी थेट मुळापर्यंत पोहोचते. त्याचबरोबर बाष्पीभवनापासून वाचण्यासाठी या झाडाला पानेच नसतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कॅक्टस हा थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा उत्तम नमुना आहे’, हे विधान यथार्थ वाटते.

विभाग ४ - भाषाभ्यास

प्र.४. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.

(१) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. [2]

i. तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?

प्रश्नार्थी वाक्य

ii. रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.

आज्ञार्थी वाक्य

(२) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. [2]

i. नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)

कधीही खोटे बोलू नये.

ii. तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)

तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करावी. 

(३) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन): [4]

i. उत्साहाला उधाण येणे

उत्साहाला उधाण येणे – खूप उत्साही वाटणे.
वाक्य – बाईंनी वर्गात सहलीची सूचना वाचून दाखवताच मुलांच्या उत्साहाला उधाण आले.

ii. गलका करणे

गलका करणे – गोंगाट करणे.
वाक्य – बागेजवळ आईस्क्रीमची गाडी पाहताच खेळणारी सगळी मुले गलका करू लागली.

iii. झोकून देणे

झोकून देणे – पूर्णपणे सहभागी होणे.
वाक्य – भूकंपग्रस्त गावाची अवस्था पाहताच सागररावांनी मदतकार्यात स्वत:ला झोकून दिले.

प्र.४. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.

(१) शब्दसंपत्ती:

(१) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

i. पाउस =

i. पाऊस = पर्जन्य

ii. मधुर =

ii. मधुर = गोड

(२) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

i. सुरुवात X

i. सुरुवात  X  शेवट

ii. स्तुती X

ii. स्तुती  X  निंदा

(३) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

(४) वचन बदला.

i. गोष्ट

i. गोष्ट – गोष्टी

ii. कल्पना

ii. कल्पना – कल्पना

(२) लेखननियमांनुसार लेखन:

खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. [2]

i. कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.

कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत.

ii. तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.

तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले.

(३) विरामचिन्हेः

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. [2]

i. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.

“अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.”

ii. "काका हे शास्त्रीय सत्य आहे"

“काका, हे शास्त्रीय सत्य आहे.”

विभाग ५ - उपयोजित लेखन

प्र.५. (अ) खालील कृती सोडवा. [6]

(१) पत्रलेखन:

खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.

अभिनंदन पत्र – (अनौपचारिक)
दिनांक : २३ जुलै, २०२०
प्रिय मित्र सुहास,

सप्रेम नमस्कार

आपल्या शाळेत झालेल्या कथाकथन स्पर्धेमध्ये तू प्रथम क्रमांक मिळवलास. खूप आनंद झाला. गेली तीन वर्षे तुझी कथाकथन स्पर्धेत बक्षीस मिळवण्याची परंपरा तू या वर्षीही जपलीस. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या मा. श्री. लागू सरांनी तसेच अध्यक्ष मा. श्री. कांबळे सरांनीही तुझ्या कथाकथनाचे कोतुक केले. तुझी भाषा, शब्दोच्चार, मांडणी, आत्मविश्वास या सगळेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तुझे कथाकथनातील नैपुण्य दिवसेंदिवस वाढत आहे, याची ही पावतीच म्हणावी लागेल.

तुझ्या या यशाचे माझ्या आई बाबांनाही खूप कौतुक वाटले. त्यांनीही तुझे अभिनंदन केले आहे. तुझ्या पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा.
पुन:श्च अभिनंदन.

तुझाच मित्र,
दीपक माने
जीवनज्योती विद्यालय,
नांदगाव, रत्नागिरा – 20486
jj22@gmail.com

किंवा

विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक : १७ जुलै, २०२०

प्रति,
माननीय श्री. उत्तम कांबळे
२९५, स्वरा सोसायटी,
अगरवाल नगर,
महाड, रायगड – 400562
xyz@gmail.com
विषय: ‘जीवनज्योती विद्यालयाच्या’ कथाकथन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत.

माननीय महोदय,

मी दीपक माने, जीवनज्योती विद्यालय, नांदगावचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र तिहीत अहे. दरवर्षी आमच्या शाळेमध्ये कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षपद अपप भूषवावे अशी आम्हां सर्वांची इच्छा आहे. अम्हां विद्यार्थ्यांना तुमचे विचार ऐकप्याची व मार्गदर्शन मिळवण्याची संधी यामुळे मिळेल.

तरी दिनांक २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या या स्मारंभास आपण अध्यक्ष म्हणून उपस्थित राहावे, अशी मी आपल्याला विनंती करतो. अप्पा या समारंभास उपस्थित राहून विजेत्यांना व आम्हां सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल असा आम्हांला विश्वास वाटतो.

धन्यवाद!

आपला कृपामिलाषी,
दीपक माने
जीवनज्योती विद्यालय,
नांदगाव, रल्लागिरा – 20486
jj22@gmail.com

(२) सारांशलेखन

    संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वतःसाठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे.

वरील उतार्‍याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

तुमच्या विकासासाठी व समाजहितासाठी संयम महत्त्वाचा आहे. निसर्गातील सूर्य, ढग, झाडे तसेच, शेतकरी, विणकर इत्यादींमुळे आपले पालनपोषण होते. तेव्हा या सर्वांचे आभार मानण्यासाठी आपण आपले आयुष्य त्यांना समर्पित केले पाहिजे.

प्र.५. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. [10]

(१) जाहिरात लेखन:

पुढील विषयावर जाहिरात तयार करा.

शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.

(२) बातमीलेखन:

खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

(३) कथालेखन:

खालील मुद्ययांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –

 माणुसकीची शिकवण

      त्यादिवशी वरद घरी आला तो उड्या मारतच. त्यांच्या जिल्ह्यामध्ये लवकरच आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होणार होती. क्रिडास्पर्धेमध्ये धावण्याची स्पर्धा होती. वरद हा एक उत्तम धावपटू असल्यामुळे शाळेतर्फे वरदने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असं मुख्याध्यापकांचं म्हणणं होतं. वरदने दुसऱ्या दिवशीपासूनच स्पर्धेचा सराव सुरू केला.
      वरदच्या घराजवळ राहणारा तनय हादेखील उत्तम धावपटू होता आणि तोही त्याच्या शाळेमधून आंतरशालेय क्रीडास्पर्धेमध्ये भाग घेणार होता. आपण तनयला नक्कीच हरवू आणि पहिला क्रमांक मिळवू असा वरदला आत्मविश्वास होता आणि त्यासाठी तो भरपूर मेहनतही करत होता. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली. वरद, तनय आणि आणखी दोन मुलांमध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा होती. वरद जीव तोडून धावत होता आणि अचानक तनयचा पाय मुरगळला. तनय मटकन खाली बसला. वरदच्या हे लक्षात आलं. मागचापुढचा विचार न करता त्याने स्पर्धा सोडून तनयकडे धाव घेतली. त्याला उठायला मदत केली आणि हळूहळू आधार देऊन धावपट्टीच्या बाजूला असलेल्या एका बाकावर बसवलं. तनयचे शिक्षक आणि क्रीडास्पर्धचे आयोजक हे सगळं बघत होते. तनयचे शिक्षकही धावत मदतीला आले.
      तनय आणि वरद दोघेही स्पर्धेतून बाद झाले आणि दुसरा एक मुलगा स्पर्धा जिंकाला. आपण जिंकू शकलो नाही या विचारांनी वरदच्या डोळयामध्ये पाणी आलं; पण तेवढ्यात अचानक त्याच्या नावाचा पुकारा झाला. स्पर्धेचे आयोजक बोलत होते, या धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस एका धावपटूने मिळवले असले, तरी या संपूर्ण क्रीडास्पर्धेमध्ये अव्वल ठरलेला एक खेळाडू म्हणून आज मी वरदचं नाव घोषित करतो. स्पर्धेपेक्षा देखील माणुसकी महत्वाची असते ही एका अतिशय महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला वरदने शिकवली. आयोजकांचे शब्द संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. स्पर्धा हरल्याचं दु:ख वरद विसरला. स्पर्धा जिंकण्याच्या आनंदापेक्षा दुसऱ्याची मदत करण्यातला आनंद मोठा आहे हे आज त्यालाही उमगलं होतं.

तात्पर्य: माणुसकीचा विचार करून एकमेकांना मदत करणे हा सर्वांत मोठा गुण आहे.

प्र.५. (इ) लेखनकौशल्य: खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. [8]

(१) प्रसंगलेखन:

खालील मुद्ययांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

पावसाळ्यातील एक दिवस

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
 शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले…

       या कवी बा. भ. बोरकरांच्या काव्यपंक्तींनी मनात फेर धरला होता. बाहेर अंधारून आले होते. मी खिडकीतून बाहेर पाहत होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. सूं सूं करत वारा थैमान घालू लागला. वावटळ येईल की काय अशी शंका मनात येत होती, तितक्यात दार जोरात बंद झाल्याचा आवाज आला. आमच्या घरासमोरून दिसणाऱ्या थोड्या अंतरावरच्या मैदानात धुळीचा लोट आकाशात उडाला, भोवऱ्यासारखा गोलाकार घुमत घुमत खाली आला आणि त्याने आपले अंग भसकन्‌ जमिनीवर लोटून दिले. सर्वत्र पालापाचोळा उडाला. संपूर्ण वातावरणात धूळभरलेपणा भरून राहिला होता. कोणत्याशा अनाम क्षणी आकाशात लख्खकन्‌ वीज सळसळली आणि टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला.
      धरतीवर सडा शिंपला गेला. मातीचा सुगंध आसमंतात दरवळला आणि त्या थंडगार सरींचा स्पर्श अनुभवण्यासाठी माझे हात नकळत खिडकीबाहेर सरसावले. हातावर पडणारे मोती झेलत, उधळत किती वेळ घरात राहणार? मग बिनधास्तपणे प्रत्यक्ष पाऊस अंगावर घेण्यासाठी बाहेर मोकळ्या वातावरणात आले.
      छपरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी छान ताल धरला होता. चिखलाचे छोटे-छोटे ओघळ पटापट, वाट फुटेल तिथे धावत होते. मी त्या पावसात अगदी मनसोक्त भिजले. आनंदाने गाणी गायले. चिखलात उड्या मारल्या. माझ्यासोबत आजूबाजूची झाडेही पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत होती. संपूर्ण धरती सचैल स्नान करत होती. ढगांनी आपली सर्व पोतडी भरभरून धरेवर लोटून दिली होती जणू! वातावरण चैतन्यमय झाले होते. नवजीवन ल्यायलेली सृष्टी आनंदविभोर बनली होती… अगदी माझ्याप्रमाणेच! थकलेल्या, कंटाळलेल्या, श्रांत मनाला या सरींच्या शिडकाव्याने उल्हसित केले होते. हे अविस्मरणीय क्षण मनात साठवत, पावसाचे मुक्‍त, बरसणारे रूप अनुभवत माझी पावले घराच्या दिशेने वळली. जणू ‘श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा। उलगडला पानांतून अवचित हिरवा मोरपिसारा।’ असा प्रत्यय मी आज अनुभवला होता!

(२) आत्मकथन:

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

मी पुस्तक बोलत आहे…

       “नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना? अहो, मी तुमचा मित्र ‘पुस्तकराव’ बोलतोय. तसे माझे आणि तुमचे नाते अगदी बालपणापासूनचे! माझ्याद्वारे तुम्ही गाणी, गोष्टी शिकता. तालासुरात कविता म्हणायला व घडाघडा पाठ वाचायलाही शिकता. माझ्यातील रंगीत, बोलकी चित्रे पाहून किती आनंद मिळतो तुम्हांला! खरंच, तुमच्या दिवसाची सुरुवात माझ्या वाचनाने होते, हे पाहून मला खूप आनंद होतो. मला माझ्याजवळ असलेला माहितीचा, ज्ञानाचा खजिना तुम्हांला उलगडवून दाखवता येतो. तुमचा एखादा कंटाळवाणा, थकलेला क्षण माझ्या संगतीने मनोरंजक बनू शकतो. तुम्हांला एखाद्या वेगळ्याच  विश्वात घेऊन जाताना मी तुमचा वाटाड्या बनू शकतो. ज्ञान, विज्ञान, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांशी तुमची भेट घालून देण्याचे भाग्य मला लाभते. त्यामुळे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो.
       झाडापासून कागदनिर्मिती होईपर्यंत, अगदी पुस्तक बांधणी ते पुस्तक प्रकाशित करण्यापर्यंतचा हा प्रवास मी अनुभवलेला असतो. हजारो हातांनी मेहनत केलेली असते, मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी! कागदनिर्मिती करणाऱ्या सामान्य मजूर, कारागिरांपासून लेखक, प्रकाशक यांचा माझ्या निर्मितीमागे मोलाचा वाटा असतो. या सर्वांच्या मेहनतीची जाणीव नसल्यामुळेच काही लोक माझा नीट वापर करत नाहीत. कव्हर्स घालणे तर दूरच: पण
काही खाता-पिताना माझ्यावर डाग पाडतात. माझी पाने दुमडतात. मला निष्काळजीपणे हाताळल्यामुळे मी फाटतो. काहीजण तर मला उशीसारखे डोक्याखाली घेऊन झोपतात. असे हे बेजबाबदार वागणे मला अजिबात आवडत नाही. अतिशय दु:ख होते.
       मला तुम्हां सर्व मुलांना असे सांगावेसे वाटते, की ‘ज्ञानमेव परा शक्ति:’। ज्ञान हीच सर्वोत्तम शक्‍ती आहे. हे ज्ञान आमच्यात वास करते. त्यामुळे, मला हाताळताना थोडीशी काळजी घेतलीत, तर मला खूप आनंद होईल. मी चांगल्या स्थितीत राहीन व इतरांनाही उपयोगी पडेन.
       सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मीही डिजिटल होत आहे. मला मोबाइलमध्ये, संगणकावर ‘इ-बुक’च्या स्वरूपात वाचता येते. माझ्या या काळानुसार बदलत्या रूपाची भुरळ तुमच्या नव्या पिढीला पडत आहे. तुमचा वाचनाचा छंद कायम टिकावा, हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे, तुम्हांला काहीतरी सांगण्याची, तुमच्यासाठी काही करण्याची, तुमच्या जवळ राहण्याची माझी इच्छा पूर्ण होईल आणि आपली मैत्री सदैव टिकून राहील.
       अच्छा, खूप वेळ झाला, अभ्यास करा बरं …”

(३) वैचारिक लेखन:

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.

युग संगणकाचे

      एकविसावे शतक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आणि संगणकाचे युग आहे, असे म्हटले जाते. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने अनेक शोध लावले आणि प्रगतिपथावर येऊन पोहोचला. त्यातील आपल्या सर्वांना परिचयाचा असलेला शोध म्हणजे संगणकाचा शोध. सन १८३७ साली चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्या यांत्रिक संगणकाचा शोध लावला. कालानुरूप त्याच्यात अनेक सुधारणा होत गेल्या आणि आजच्या युगात जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे.
      संगणक या यंत्राने आपली अनेक कामे अतिशय सोपी केली आहेत. बँकेचे व्यवहार, शासकीय कामे, अभियांत्रिकी-वैद्यवकीय क्षेत्र, शाळा, महाविद्यालये अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत संगणक प्रणालीचा वापर आवश्यक झाला आहे. पैशांचे व्यवहार आणि हिशोबाची कामे संगणकामुळे सोपी झाली आहेत. इंटरनेटच्या शोधामुळे तर आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही विषयाची माहिती तत्काळ आपल्याला संगणकाच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे मानवाला ज्ञानाची दालने खुली झाली आहेत. इ-मेल, सोशल मीडिया यांसारख्या गोष्टींचा वापर करून एकमेकांबरोबर माहितीची देवाणघेवाण करणे आणि संपर्क साधणे दोन्ही सहज शक्‍य झाले आहे. संगणक ही आजच्या युगाची क्रांती आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. संगणकामुळे आपली कामे लवकर होतात. कोणतेही काम तत्काळ आणि अचूक करता येत असल्यामुळे मानवी जीवनामध्ये संगणक काळाची गरज बनला आहे. कोरोनाच्या काळात तर लॉकडाऊनमुळे शिक्षण, ऑफिसची कामे, मीटिंग्ज या सगळ्याच गोष्टींसाठी संगणक अतिशय महत्त्वाचा ठरला आहे.   
      पण संगणकाचे अनेक उपयोग असले, तरी त्याचे काही तोटेदेखील आहेत. संगणकावर सतत काम केल्यामुळे अनेक लोकांना पाठदुखी, डोळ्याचे विकार जडत आहेत. संगणकावर काम करता करता माणसे अनेक वेळा संगणकाच्या आहारी गेल्याचे दिसून येते आहे. लहान मुले तसेच तरुण मुले अनेक वेळा दिवसभर कम्प्यूटर गेम खेळण्यात मग्न होतात. लहान मुले तर मैदानी खेळ विसरू लागली आहेत. त्या सगळ्याचा त्यांच्या डोळ्यांवर, शरीरावर, आरोग्यावर परिणाम होत आहे. संगणकामुळे दूरदूरच्या माणसांशी बोलणे सोपे झाले असले, तरी त्यामध्येच अडकून पडल्यामुळे घरातली माणसे, मित्रमंडळी यांच्याशी संवाद तुटला आहे. एक प्रकारचा दुरावा निर्माण होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा दुरुपयोग करणे, सोशल मीडियाचा वापर करून खोटी माहिती पसरवणे, लोकांना भडकवणे अशा गोष्टी सर्रास घडताना दिसत आहेत. अनेक वेळा दहशतवादी कारवाया करण्यासाठी सुद्धा संगणकाचा वापर केला गेल्याचे आढळले आहे. सायबर गुन्हे, अफरातफरी घडून येताना दिसत आहेत.

      शेवटी संगणक हे उपकरण आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्याची क्षमता कितीही जास्त असली तरी त्याला स्वत:चा मेंदू नाही. त्यामुळे योग्य काय अयोग्य काय हे संगणक स्वत: ठरवू शकत नाही, ते संगणक वापरणाऱ्या माणसावर अवलंबून असते. म्हणूनच मानवाने आपली सदसद्विवेकबुद्धी आणि नैतिकता वापरून संगणकाचा वापर कुठल्या गोष्टीसाठी आणि किती प्रमाणात करायचा हे ठरवणे जास्त महत्त्वाचं आहे. जर संगणकाचा वापर समाजाच्या, देशाच्या हितासाठी आणि विधायक कामांसाठी केला गेला, तर संगणक हा मानवी जीवनासाठी नक्कीच वरदान ठरेल.

 

error: Content is protected !!