उपयोजित लेखन: निबंधलेखन

चला खेड्याकडे

‘माझं कोकणातील गाव, मनामध्ये त्याचा ठाव,
जन येथले प्रेमळ, आनंद असे येथे अंमळ’

        कवितेच्या या ओळी खेड्यांचे खरे रूप दर्शवणाऱ्या आहेत. खेड्यातले जीवन म्हणजे शांत व निरामय जीवन. शहरातील धावपळ नाही, गर्दी किंवा गोंधळ नाही, अथवा घड्याळाच्या काट्याचे गणित नाही. खेड्यातील हवेतच जणू निवांतपणा गवसतो. वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने होणारा त्रास नाही. पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यावी. नदीचे खळखळणारे पाणी, गाई-म्हशींचे हंबरणे अशी निसर्गाच्या कुशीत नेणारी खेड्यातील दुनिया. खेड्यातले वातावरण शुद्ध. रासायनिक कारखाने किंवा भरमसाठ वाहने नसल्यामुळे आजही खेडोपाडी शुद्ध हवा अनुभवता येते. माणसाला श्वास घेण्यास, खरंतर ‘मोकळा श्वास’ घेण्यास खेड्यासारखे ठिकाण नाही. येथील हे प्रसन्न वातावरण मानवी आरोग्यासही पोषक ठरते.
        शहरीकरणाच्या झपाट्यात विविध जाती धर्मांचे, विविध संस्कृती असलेले लोक एकमेकांच्या सान्निध्यात आले. तरीही कामात व्यस्त असलेल्या, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या लोकांना इतरांकडे लक्ष देण्यास किंबहुना स्वत:च्या घरात लक्ष देण्यास वेळ नाही. केवळ पैसा आणि काम यांमध्ये गुंतलेले लोक प्रेमळ, आनंदी जीवन विसरून गेल्यासारखे वाटतात. खेड्यात मात्र लोक कमी असल्यामुळे, एकमेकांना प्रत्यक्ष ओळखत असल्यामुळे प्रत्येकजण सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या घरी जात असतात. संपूर्ण खेडे हे एखादे कुटुंब असल्याप्रमाणे आपुलकी राखून असते.
        अशा सुंदर खेड्यांतून रोजगाराकरता शहराकडे वळलेल्या तरुणांना परत खेड्यात आणायचे असेल, तर त्यांच्यासाठी खेड्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. बंद पडलेले लघुद्योग, कुटीरोद्योग सुरू झाले अथवा नव्याने उद्योग निर्माण केले गेले, खेड्यातील नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगांना पाठबळ दिले गेले, तर खेड्यातील तरुण त्याच्या हक्काच्या घरी आनंदाने राहतील. शहरावर येणारा लोकसंख्येचा ताण त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.
        शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर किंवा इंजिनिअर बनायचे आहे या भावनेतून शिक्षण दिले जाते. ही पद्धती बदलून शेतकरी हा समाजाचा अत्यावश्यक घटक आहे ही भावना नव्या पिढीच्या मनात रूजवून शेतीचे आधुनिक शिक्षण दिले गेले, तर खेड्यापाड्यांतून शेती पुन्हा बहरेल. शेती शाश्‍वत आहे आणि ती ओसाड पडून चालणार नाही. ती फुलवण्यासाठी नव्या दमाच्या तरुणांनी खेड्याकडे वळायलाच पाहिजे.
        शहरात आलेल्या, शहरातील धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या प्रत्येकाचे स्वप्न असते मी माझ्या आयुष्यातील शेवटचा काळ निवांतपणे माझ्या गावात घालवेन. नोकरी, व्यवसायाच्या संधी, मूलभूत सुविधा निर्माण झाल्या, तर स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वयंपूर्ण खेडी परत एकदा माणसांनी बहरलेली दिसतील आणि जीवनाचा आनंद लुटतील, निवांतपणा अनुभवतील. खेडोपाडी मुक्तपणे जगताना दिसतील. यासाठी आपल्याला गांधीजींच्या ‘खेड्यांकडे चला’ हा संदेश प्रत्यक्षात उतरवावा लागेल.

कोरोना संकट

        ‘लॉकडाऊन’, ‘कॉरंटाईन’, ‘कोव्हिड’ या कधीही न ऐकलेल्या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या करोना महामारीने संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली. कोरोना विषाणूमुळे माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला. डिसेंबर २०१९ च्या दरम्यान चीनमध्ये या विषाणूचा प्रसार पहिल्यांदा लक्षात आला. पाहतापाहता जगभरातील विविध देशांत कोरोना झपाट्याने पसरला. भारतामध्ये कोरोना रुग्ण सापडण्याची सुरुवात जानेवारी २०२० मध्ये झाली आणि खबरदारीचा उपाय म्हणून मार्च २०२० मध्ये भारत सरकारने ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेतला.
        संपूर्ण मानवजातीला आव्हान देणाऱ्या या विषाणूमुळे संपूर्ण जगभरात करोडो लोक बाधित झाले. अनेक लोक मृत्युमुखी पडले. हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी भरून गेली होती. विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे नेमकी काय उपचारपद्धती द्यावी याविषयी संभ्रमाचे वातावरण होते. शाळा, कॉलेज, व्यवसाय, रेल्वेसेवा सारेच ठप्प झाले. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. कित्येक लोकांचे रोजगार गेले. जगणे असह्य झाले. हाताला काम नसलेले लोक शहर सोडून गावी गेले. या लोकांना गावी जाण्यासाठी कोणत्याही सेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अत्यंत हालअपेष्टा सहन करत प्रवास केला. लोकांच्या घरातील अन्नधान्याचा साठा संपल्यामुळे लोक हवालदिल झाले होते. घरातून बाहेर पडणे शक्य नसल्यामुळे आणि बाहेर भीतीयुक्त वातावरण असल्यामुळे लोकांमध्ये चिडचिड, नैराश्‍य आले होते.
         हे संकट भयावह असले तरी त्याने मानवाला काही गोष्टी निश्‍चितच शिकवल्या. या काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे गांभीर्यपूर्वक पाहिले गेले. संपूर्ण विश्‍वात माणूस किती क्षुल्लक प्राणी आहे याची जाणीव कोरोना महामारीने करून दिली. नोकरी, व्यवसाय, पैसा यांत गुंतल्यामुळे आपण जगण्यातील साध्या, निखळ आनंदाला मुकत असल्याची जाणीव प्रत्येकालाच झाली. या अतिशय तणावपूर्ण काळातही कुटुंब एकत्र आले. गप्पा मारणे, एकत्र जेवणे, बैठे खेळ यांतून विरंगुळा साधला गेला. कामधंदा बंद असल्यामुळे चित्रकला, लेखन, गायन, वादन असे छंद पुन्हा जोपासले गेले. दिवसरात्र यंत्राप्रमाणे काम करणार्‍या माणसाला स्वत:कडे बघण्यासाठी वेळ मिळाला. कुटुंबाला वेळ देता आला. अनेकांनी आपला गाव कित्येक वर्षांत पाहिला नव्हता. ते गावी जाऊन राहिले.
         कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. जगातील जवळपास प्रत्येक देश या संकटाचा सामना करत आहे. एकूणच मानवजातीवर आलेल्या या संकटाने अमेरिकेसारखा बलाढ्य देशही हतबल झालेला दिसला. संशोधनाअंती कोरोना विषाणू प्रतिबंधक लस तयार केली गेली; मात्र अजूनही हे संकट पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाचे रुग्ण आजही सापडत आहेत. ज्याप्रमाणे औषध तयार केले गेले त्याप्रमाणे विषाणूसुद्धा आपले स्वरूप बदलत आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. जगभरात अजूनही कोरोनाचे भय कायम असून यातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रत्येक देश शोधताना दिसत आहे.

सुसंवाद काळाची गरज

        अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत; मात्र यांच्याबरोबरीने काही भावनिक गरजाही त्याला जगण्यास उपयुक्‍त ठरतात. माणसांच्या गर्दीतही माणूस कुठेतरी एकटा पडत आहे. हे एकटेपण सहन न झाल्याने विचित्र वागणारी माणसे आपल्या आजूबाजूला दिसतात. मुळातच माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला आपल्या भावना व्यक्‍त करणे आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेणे आवडते. याकरता महत्त्वाचा ठरतो तो संवाद. संवाद हा सुसंवाद असेल, तर माणसाचे माणूस म्हणून जगणे सुसह्य आणि आनंदी होऊन जाते.
        एकमेकांशी बोलणे म्हणजे सुसंवाद नव्हे. मनापासून साधलेला आणि मनापर्यंत पोहोचलेला संवाद म्हणजे सुसंवाद. आपल्या कुटुंबियांसोबत आपल्याला हा सुसंवाद साधणे आवश्यक असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. कुटुंबाला वेळ देता येत नाही. कामाचा व्याप, सततची धावपळ यांमध्ये माणूस अशाप्रकारे गुरफटून जातो, की घरात असूनही घरात काय चालू आहे याचे भान त्याला नसते. त्यात आपल्या वागण्यावर लक्ष ठेवून असणारी वडीलधारी मंडळ कुटुंबव्यवस्थेतून बाहेर पडल्यामुळे एकटेपणाचे ओझे आपल्यावर आल्यासारखे वाटते. आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर राखून एखाद्या गोष्टीची चर्चा करणे म्हणजेच सुसंवाद साधणे ही कुटुंबाची गरज आहे.
        सामान्यपणे मित्र-मैत्रिणींसोबत सुसंवाद साधणे सोपे जाते.आपल्याच वयाच्या, आपले विचार अधिक चांगल्याप्रकारे समजून घेणारे मित्र-मैत्रिणी असतील, तर आपले मन मोकळे करायला हक्काचे माणूस सापडते. आपल्या मनात भावभावनांची, विचारांची दाटलेली गर्दी दाबून ठेवली, तर त्याचे मनावर दुष्परिणाम होतात. त्यासाठी आपला कोणाशी तरी सुसंवाद होणे आवश्यक असते.
        ‘मन करा रे प्रसन, सर्व सिद्धीचे कारण.’ हे मन आनंदी, स्थिर राहण्यासाठी सुसंवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. एखादी खोली झाडून स्वच्छ करावी त्याप्रमाणे मनातले विचार बोलून दाखवल्यावर मनही स्वच्छ झाल्यासारखे वाटते. एकटेपणाची भीती, हृदयावरील ताण, तणाव या गोष्टी माणसाला आत्महत्येकडे जाण्यास प्रवृत्त करतात. अशा धोक्यांपासून दूर राहण्यासाठी सुसंवाद साधला जाणे महत्त्वाचे ठरते.
         जीवन समृद्धीचे रहस्य म्हणजे सुसंवाद होय. ‘शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले’ हो परिस्थिती शक्‍य नसली तरीही जे वाटते ते बोलता येत असेल, जे सांगू ते ऐकून घेणारी माणसे आपल्या आजूबाजूला असतील, तर जीवनाची गोडी अनुभवता येते. संवाद प्रेमाची अनुभूती देतात. या सुसंवादातून प्रेरणा मिळते, नाती जुळतात, आयुष्य स्थिर बनते. असा सुसंवाद साधला, कीआपलं आयुष्यही अनमोल होतं.

भाषेचे महत्त्व

         माणूस हादेखील एक प्राणीच आहे; मात्र तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. त्याने आपली प्रगती साधली याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाला मिळालेली भाषेची देणगी. माणसाला भाषा बोलता येऊ लागली, त्या भाषेला विविध आकारांच्या साहाय्याने त्याने लिपीबद्ध केले आणि माणूस आपले विचार लिहून ठेवू लागला. माणसाला भाषा बोलता येते. त्यामुळे, त्याच्या विचारातील सुस्पष्टता इतरांना कळते. प्राण्यांची, पक्ष्यांची आवाजाची भाषा असते; मात्र माणसांच्या भाषांसारखी ती सुसंगत, सुस्पष्ट नसते.
         माणसाचे जीवन समृद्ध होण्यात त्याला गवसलेल्या भाषेचे खूप मोठे योगदान आहे. आपल्याला काय वाटते, समोरचा काय बोलतो? त्याचे विचार समजून घेण्यासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आपल्या विचारांचे आदान-प्रदान करण्यात भाषेचा मोठा वाटा आहे. भाषेमुळे माणसाने खूप मोठी प्रगती केली. आदिमानव ते आताच्या युगातील हायटेक मनुष्य यांमधील काळ हा भाषेमुळे माणसाची होत गेलेली प्रगती दर्शवतो. वेगवेगळे विषय, शास्त्रे, शोध, वस्तूंची निर्मिती या साऱ्यांचे मूळ भाषेमध्ये आहे.
         लहान बाळ आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींकडून भाषा शिकते. त्याच्या आजूबाजूला बोलले जाणारे शब्द आत्मसात करून वस्तू, व्यक्तींची नावे ते बाळ लक्षात ठेवते. पुढे आजूबाजूची मंडळी आणि शाळा यांद्वारे शब्दसंपदा वाढत जाते. त्याबरोबरीने ज्ञानही वाढते. अनेक व्यक्‍ती विविध प्रदेशांना भेटी देऊन नव्या भाषा शिकून, प्रचंड वाचन करून आपली शब्दसंपदा वाढवतात. विविध कलाकृती, काव्ये, महाकाव्ये, संगीत, नाटक, चित्रपट, वर्तमानपत्रे या साऱ्यांना भाषेचा खूप मोठा आधार आहे. भाषेचे स्वरूप देखील माणसाच्या प्रगतीप्रमाणे बदलत जाते. भाषेत नव्या शब्दांची भर पडते. ज्याप्रमाणे नवे शोध लागतात त्याप्रमाणे शब्दभांडार वाढत जाते. विश्वकोश, ज्ञानकोशदेखील शब्दभांडार विकसित करण्यास उपयुक्त ठरतात.
         मानवाला व्यवहार करताना भाषेचा उपयोग होतो. वस्तूंचे आदानप्रदान, उद्योग इत्यादींमध्ये सुसूत्रता येण्यासाठी भाषा दुवा म्हणून कार्य करते. व्यवहारात वापरली जाणारी भाषा ही त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदलत जाते. भाषेतील हा बदल काळाची गरज असते. अशारीतीने, माणूस म्हणून इतरांहून भिन्न प्रकारे जगताना भाषा त्याचे जीवन सुकर करते. भाषेने वेळोवेळी आपले रूप बदलले आहे. ज्ञानेश्‍वरांच्या काळातील मराठी आणि आजची मराठी यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. भाषा टिकून राहण्यासाठी तिने होणारे बदल स्वीकारले पाहिजेत. त्याचबरोबर ती व्यवहार्य असली पाहिजे. बोलण्यासाठी सोपी, रोजच्या वापरातील, शब्दसंपदा विपुल प्रमाणात असणारी भाषा माणसाच्या उन्नतीचे कारण बनते. ही व्यवहारात उपयुक्‍त ठरणारी भाषा सहजसोपी, सरळ, काळानुरूप असल्याने ती जनमाणसांत रूजते.

जलसाक्षरता: काळाची गरज

        पृथ्वीवरील पाणी हेच जीवन आहे असे म्हटले तरी ते चूक ठरणार नाही. पृथ्वीवर पाणी नसते, तर जीवसृष्टी निर्माणच झाली नसती. पाण्यामुळेच पृथ्वीवर सजीव आजवर टिकून आहेत. ‘जल है तो कल है!’ असे घोषवाक्य आपण अनेकदा ऐकतो. पाणी संपले, तर कदाचित संपूर्ण पृथ्वीवरचे जीवन नष्ट होईल. पृथ्वीवरील उपलब्ध पाण्यापैकी ०.९% पाणीच नद्या, सरोवरे, विहिरी, तलाव यांमध्ये उपलब्ध आहे. त्याचाच उपयोग आपल्याला करावा लागतो. लोकसंख्यावाढ, शहरीकरण, गरजांमधील वाढ या गोष्टी पाणीटंचाईला कारणीभूत ठरतात. एक दिवस असा येईल, की पाण्याची किंमत खनिज तेलापेक्षा जास्त असेल , येणारा भविष्यकाळ आपल्याला तिसरे महायुद्ध पाण्यासाठी दाखवेल अशी तज्ज्ञांची मते आपल्याला उद्याचे विदारक रूप दाखवतात.
         पाणीरूपी अमृताचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. भारतात जलप्रदूषणाची मोठी समस्या आहे. औद्योगिकीकरणामुळे नद्या- नाले प्रदूषित केल्या जातात. मोठे मोठे कारखाने पाण्याचा वाटेल तसा वापर करून त्याची नासाडी करतात. घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे गळके नळ किंवा वापरानंतर तसेच, चालू ठेवलेले नळ हे पाण्याच्या अपव्ययाला कारणीभूत ठरतात. पाणवठ्यांवरील अस्वच्छताही पिण्यायोग्य पाण्याचे प्रदूषण करते. सणांमध्ये मूळ परंपरा बाजूला ठेवून उगाच पाण्याचा अपव्यय केला जातो. नद्यांमधून चालणारी जलवाहतूकही पाण्याची नासाडी करण्यास कारणीभूत ठरते. या सर्व कारणांमुळे आज पिण्यायोग्य पाण्याचे साठे अत्यंत मर्यादित झाले आहेत. अनेक शहरे, गावे पाणीटंचाईची भीषण समस्या अनुभवत आहेत. पाण्यासाठी मैलोन्‌ मैलांची पायपीटही करावी लागत आहे. शेतीला पाणी नसल्याने ती ओसाड ठरत आहे. धरणांमधील पाणीसाठा आता अपुरा पडू लागला आहे. मनुष्य आणि इतर प्राणीही या पाणीटंचाईला बळी पडत आहेत.
         या संकटावर मात करण्यासाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करणे व पाण्याचा अपव्यय टाळण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती वैश्‍विक जबाबदारी आहे. त्यामुळे, प्रत्येक व्यक्‍तीने पाणी वाचवण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. जलशुद्‌धीकरणाच्या नव्या तंत्राचा वापर, दूषित पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर, नव्या बांधकामांमध्ये परवानगी देताना पावसाळी पाण्याच्या साठवणीसाठी टाकी बांधण्याची अट अशा प्रकारच्या गोष्टींतून जलसंवर्धन शक्य आहे. छोट्या छोट्या नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवले, तर ते जमिनीत झिरपून पाण्याची पातळी वाढू शकेल. नद्यांचे पात्र पुन्हा खणणे, नद्या एकमेकींना जोडणे यांमुळेही पाण्याच्या समस्या कमी होतील.
        पाऊस पडावा म्हणून झाडे लावून त्यांची काळजी घेतली, उघडे उजाड डोंगर हिरवेगार केले, तर निश्‍चितच पुरेसा पाऊस होईल. त्यामुळे, जलसाठे भरलेले राहतील. जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. प्रत्येकाने जलसाक्षर होऊन पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. नाहीतर माणसाकडे माणसाच्या डोळ्यांतल्या पाण्याशिवाय काही उरणार नाही.

‘मी एस.टी. बोलतोय . . .’

        बरं झालं बाई संपला एकदाचा लॉकडाऊन. या डेपोमध्ये उभं राहून अगदी कंटाळा आला होता. चला, मी निघाले माझ्या कामावर. मी कोण म्हणून काय विचारता? मी तुमची सर्वसामान्यांची लाडकी एस. टी. बोलतेय. काही जण प्रेमाने मला ‘लालपरी’ म्हणतात, तर काहीजण ‘लालडब्बा म्हणून चिडवतात; पण तरीही ‘वाट पाहीन; पण एस. टी. नेच जाईन’ असे म्हणत माझीच वाट पाहतात.
        साऱ्यांनीच अनुभवलेला लॉकडाऊनचा काळ म्हणजे जणू तुरुंगवासाची शिक्षाच. बाहेरचे जग बघण्याची, फिरण्याची, गावोगावी जाण्याची आवड असलेल्या आम्हांला एकाच जागी उभे राहण्याची वेळ आली. तसे आम्ही खूप संप, बंद, आंदोलने, दंगे पाहिले. तुम्ही फेकलेले दगड झेलले. तुम्ही लावलेल्या आगीत माझ्या बहिणी होरपळल्या; पण आम्ही थांबलो नाही, सलग इतके दिवस एकाच जागी उभे राहण्याची वेळ मात्र या कोरोना प्रादुर्भावामुळे केलेल्या ‘लॉकडाऊन’ ने आणली.
        आम्ही बंद झालो आणि संपूर्ण दळणवळण सेवा विस्कळीत झाली. खेड्यापाड्यांतील गरीब आणि श्रीमंत सगळ्यांच्या हक्काची एस. टी. बंद झाल्याने त्यांचे प्रवासाचे हाल झाले. शहराला आणि खेड्याला जोडणारा दुवा म्हणजे मी; पण लॉकडाऊनमध्ये हे सारेच ठप्प झाले. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही सातत्याने धावत असतो. उन्हातान्हातून, पावसापाण्यातून खेडोपाडी अखंडपणे सेवा देणे हेच आमचे काम. ज्या गावातून मी सुटते, त्या गावातील लोक मला ‘आमची एस. टी.’ असं आपुलकीनं म्हणतात, तेव्हा धन्य धन्य वाटते. आपल्या माणसांची भेट घडता त्यांच्या चेहऱ्यावर उमलणारा आनंद मला अभिमानाने फुलवून सोडतो. लोकांना मी अगदी हक्काची वाटते. हे पाहून समाधान मिळते. लोकांच्या जीवनात आपले महत्त्व किती आहे हे जाणवते तेव्हा उगाच मिरवावंसही वाटतं.
        अल्पदरात सोयीचा प्रवास करता यावा म्हणून माझी निवड सगळेच करतात. विद्यार्थ्यांना मासिक पास, ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना तिकीट दरात सवलत, प्रवाशांना सहलीसाठी सवलत अशा एक ना अनेक गोष्टींमुळे जनमाणसांत मी प्रचंड लोकप्रिय आहे. गौरीगणपतीच्या सणाला पार तळकोकणात जाणारे प्रवासी ‘आपली लालपरी बरी’ असे म्हणून प्रवास करतात तेव्हा खूप मजा येते. शहरे आणि अगदी विरळ वस्तीची खेडी एकमेकांना जोडण्याचे काम मी २४ तास अखंडपणे करत असते.
         या सगळ्या आपुलकीच्या नात्यामध्ये प्रवाशांबद्दल माझी एक तक्रार आहे. तुम्ही मला आपली म्हणता आणि माझी काळजी घेत नाही, याचे मला वाईट वाटते. शेंगांची टरफले, वेफर्सची पाकिटे, पान खाऊन थुंकणारे आणि उगीचच आपली नावे टाकून माझ्या सीटचा मागचा भाग खराब करणारे यांची मला चीड येते. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत आणि आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडणार आहोत. मग आमची काळजी तुम्हीसुद्धा घ्यायला हवी, नाही का?

सफाई कर्मचाऱ्याचे मनोगत

        माझ्या हातातील झाडू पाहून तुम्ही मला ओळखलं असेलच. होय, मी सफाई कर्मचारी आहे. परिसर स्वच्छ ठेवणे हे आमचे काम. ते आम्ही नियमित करतो. वर्षाचे बारा महिने आमची स्वच्छता मोहिम सुरू असते. ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र झटतो. स्वच्छता हीच मानवसेवा, देशसेवा आणि ईश्वरसेवा मानून मो हे काम आवडीने स्वीकारले. या कामाचा जो काही मोबदला मला मिळतो त्यापेक्षा अधिक पटीने आपला परिसर, आपले शहर स्वच्छ ठेवल्याचे समाधान मिळते.
        अगदी सकाळपासून आमचे काम सुरू होते. गल्लोगल्लीत कचरा गोळा करणे, घंटागाडीमध्ये तो भरणे, कचऱ्याच्या मैदानात नेऊन ओतणे, त्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करणे अशी एक ना अनेक कामे चालूच असतात. ना उन्हाची झळ, ना थंडी, ना पाऊस, आम्ही प्रत्येक ॠतूत आमचे काम चोख बजावतो. सरकारने आमच्या आरोग्याच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या असल्या तरीही सतत कचऱ्याच्या संपर्कात असल्यामुळे अधूनमधून आरोग्याच्या तक्रारी उद्‌भवतच असतात; पण त्याही बाजूला सारत आम्ही कामाला प्राधान्य देतो.
        मागील वर्ष मात्र खूपच भितोदायक होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि सगळ्यांनी आपापली कामे बंद केली. आमचे काम मात्र सुरुच होते. लोकांनी केलेल्या कचऱ्याशी आमचा सतत येणारा संपर्क, रस्त्यांवर फेकलेले मास्क त्यात हॉस्पिटलमधील जैविक कचरा यांमुळे आम्ही सतत भीतीच्या छायेत होतो. घरचे तर घाबरून गेले होते आणि त्यांच्या चिंतेने आम्हीही हादरलो होतो. आम्हांला सुट्टी घेऊन चालणारच नव्हते. आम्ही कचरा साठू दिला असता, तर कोरोनाबरोबरच इतर साथीचे आजार पसरण्यास वेळ लागला नसता. कोरोना काळात देशातील आरोग्य कर्मचारी, पोलीस, आशा वर्कर्स यांच्या खांद्याला खांदा लावून सफाई कर्मचारीही कार्यरत होते याचा मला सार्थ अभिमान वाटतो. स्थळ आणि काळाचं भान विसरून आम्ही काम केलं. तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो.
        लोकांना मात्र आजही या परिस्थितीची जाणीव होत नाही. सफाई कर्मचारी हा तुमच्यासारखाच एक माणूस आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आम्हांला सन्मान दिला नाहीत तरी चालेल; पण आम्हांला तुच्छ लेखू नका. आम्ही जरी नोकरदार मंडळी असलो तरीही स्वच्छता हा एक समाजसेवेचाच भाग आहे. आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करा. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवा. मास्क, हॅण्डग्लोव्हजची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. थोडी मानसिकता बदलून कचराकुंडीमध्येच कचरा टाकला गेला, तर स्वच्छतेचे आमचे काम अधिक सोपे होईल.
         या संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्हांला तुमच्या मदतीची गरज आहे. तेवढं कराल ना तुम्ही आमच्यासाठी?

मी शाळा बोलतेय . . .

        कंटाळा आला या एकटेपणाचा. काय ही भयाण शांतता. या कोरोनाने तर साऱ्यांनीच पाचावर धारण बसवली आहे. साऱ्यांचेच जीवन धोकादायक झाले आहे. आश्चर्याने काय पाहताय? अरे बाळांनो, मी तुमची लाडकी शाळा बोलतेय… जवळपास एक वर्ष झालं मी बंद आहे. ना घंटेची ठणठण ना तुमचा गोंधळ. सारं कसं उदास. तुम्ही मला विसरणार तर नाही ना? ऑनलाईन शाळेच्या दुनियेत तुमची खरीखुरी शाळा हरवून तर नाही ना जाणार? याची भीती वाटायला लागली मला. मोबाइलवरची कसली रे शाळा. सारं काही आभासी. मी होते, आहे आणि पुढेही असणारच. पोरांनो; पण तुमची मी मनापासून वाट पाहतेय रे! शाळा म्हणजे समाज मंदिर नाही का? समाजातील विविध जातींच्या, धर्मांच्या, गरीब, श्रीमंत सार्‍या विद्यार्थ्यांना मी आपल्यात सामावून घेते. माझ्यासाठी कोणीही हुशार नाही की ‘ढ’ नाहो. मी सगळ्यांनाच सारखे ज्ञान देते. उगीच का कवी मला ‘ज्ञानमंदिर’ म्हणतात. समाजात वावरताना तुम्हांला ‘माणूस’ म्हणून जगण्याचे बाळकडू मीच पाजते.
        या देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी, मोठमोठे उद्योगपती, नेते, डॉक्टर, इंजिनिअर, संशोधक, शास्त्रज्ञ, कलाकार, शेतीतज्ज्ञ सारे माझ्याच सावलीत वाढतात. तुमचे नेतृत्वगुण, तुमची धडपडी वृत्ती, वक्‍तृत्वशैली साऱ्याची सुरुवात माझ्यापासूनच होते. समाजजीवनातील माझे स्थान अढळ आहे, ते तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमुळेच. तुम्हांला कितीही प्रसिद्धी मिळाली तरीही तुम्ही मला कधी विसरत नाहीत. ‘ही आवडते मज मनापासूनी शाळा’ हे तुमच्या मनाचे भाव ऐकल्यावर धन्यधन्य झाल्यासारखे वाटते.
        माझा जीव, की प्राण म्हणजे तुम्ही विद्यार्थी. तुमचा आवाज म्हणजे माझा श्‍वास. तुमच्याविना सुट्टीचे दिवस कसेतरी कंठणारी ही शाळा आज कोरोनामुळे वर्षभराहून अधिक काळ बंद आहे. माझ्या मन:स्थितीची तुम्हांला कल्पनाही करता येणार नाही. माझा तर जीव गुदमरतोय अगदी. तुम्हांला जिंकताना, लढताना, आनंदी होताना बघण्याची इच्छा आहे. तुमच्या खोड्या, परीक्षेचं दडपण सारं पुन्हा अनुभवायचं आहे. कित्येक दिवसांत प्रार्थना नाही, की राष्ट्रगीत नाही. शिक्षकांचं रागावून ओरडणं, प्रेमाने समजावणं, कौतुकाची थाप सारं काही बंद आहे. या साऱ्यांसाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे.
        माझ्यासाठी माझे विद्यार्थी हेच माझे जीवन आहेत. मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी आईचा हात धरून पहिल्यांदा तुम्ही शाळेत येता. रडत रडत येताना तुम्हांला मी पाहते आणि मी मात्र मनात हसत असते; कारण मला माहीत असतं की आता रडणारे तुम्ही मला सोडून जातानाही रडणार आहात. येथे अनेक विद्यार्थी आले, शिकले, मोठे झाले. आपल्याबरोबरच त्यांनी माझे नाव मोठे केले. तुम्हा साऱ्यांचाच मला सार्थ अभिमान आहे. बाळांनो, लवकरच या. पुन्हा नव्या दमाने, भविष्य घडवण्यासाठी मो तयार आहे.

मोबाईलचे आत्मकथन

        हॅलो! मित्रांनो, मीच बोलतोय तुमचा आवडता मोबाइल. मी आता जुना झालो ना, म्हणून इकडे कपाटात बंद आहे. जेव्हा मी नवीन होतो तेव्हा काय थाट होता माझा! टेलिफोननंतर आमचा शोध लागला. घरापासून दूर असतानाही संपर्कात राहता यावे यासाठी खरं तर आमची निर्मिती झाली. आज आमच्या रूपात एवढे बदल झाले आहेत, की आजची माझी भावंडे ‘स्मार्ट’ म्हणूनच ओळखली जातात.
        माझ्या लोकप्रियतेबददल काय बोलणार. लोकांना माझे वेडच लागते म्हणा ना. पूर्वी माझा वापर खूप मर्यादित आणि खर्चिक होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अगदी रस्त्यावरील भिकाऱ्यापासून मोठ्या उद्योगपतीपर्यंत साऱ्यांकडे माझ्या भावंडांचा वावर असतो. लहान मूल असो किंवा वृद्ध असो, सारेच माझ्या प्रेमत पडतात. केवळ संपर्क साधण्यासाठी माझी निर्मिती झाली होती; मात्र आजकाल मी सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालो आहे.
        संगणकाची जागा जणू मीच काबिज केली आहे. मोबाइल ‘स्मार्ट’ झाला. त्यामुळे, लोकांचे मनोरंजन करू लागला. आम्ही तुम्हांला बँका, हॉटेल, वीजबील इत्यादी गोष्टींमध्ये उपयोगी पडतो. ‘सोशल मीडिया’ नावाचा जादुगार आमच्याच जीवावर तुम्हांला भुरळ घालत असतो. जगात कुठे काहीही घडत असेल, तर टिव्हीप्रमाणेच ते मोबाइलवरसुद्धा पाहता येते. ‘व्हिडिओ कॉल’ मुळे तुम्ही कुठे, कोण, काय करताय हे प्रत्यक्ष पाहू शकता.
        माझा योग्य वापर होणे आवश्यक आहे. माझी निर्मिती ही लोकांच्या सेवेसाठीच झाली आहे; पण लोकांना माझे व्यसन लागते. आपल्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमातसुद्धा थोड्याथोड्या वेळाने माझ्याकडे बघितल्याशिवाय तुम्हांला चैन पडत नाही. यामुळे, लोक माझ्यामुळे तरुण पिढी बिघडते असे म्हणतात. खूप वाईट वाटतं रे तेव्हा! मला बनवणारे पण तुम्हीच आणि वापरणारे पण तुम्हीच. माझा सुयोग्य वापर कराल, तर नक्कीच मी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. माझ्यातून बाहेर पडणारे तरंग काही वेळा आरोग्याकरता हानिकारक ठरतात. त्यामुळे, माझा मर्यादित वापर करणे आवश्यक आहे.
        आता हेच बघा ना या कोरोना संकटाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद पडली त्यावेळी माझ्या भावंडांनी खेडोपाडीसुद्‌धा ‘ऑनलाईन’ शाळा चालवण्याचा पराक्रम करून दाखवला ना? शिवाय, तुमच्या अभ्यासाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत माझ्याद्वारेच पोहोचले. तुमच्या अभ्यासाला कोणतीही अडचण आली नाही याचा मला अभिमान वाटतो.
        कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. माझे व्यसन लावून घेण्यापेक्षा माझा वापर आपल्या कामासाठी कसा करता येईल ते पाहा. माझ्यामुळे इंटरनेट तुमच्या खिशात असते. या मायाजालात गुरफटले न जाता तुमच्या उपयोगाच्या गोष्टींचा शोध घ्या. मोबाइलच्या अतिवापाराने तुमचे डोळे, कान, मान अगदी मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, कुठे थांबायचे हे ठरवा. मीही थांबतो एवढे बोलून.

अन्नदाता शेतकरी मी

        नमस्कार मंडळी. मी ह्या काळ्या आईचा लेक बोलतोय…मला वाटलं आज थोडं बोलावं तुमच्याशी. माझी आई म्हणजे माझी काळी माती. तिच्याशी आमचं अनेक पिढ्यांचं नातं. तिच्याच कुशीत जन्मलो, तिच्याच अंगाखांद्यांवर वाढलो, घाम गाळायला शिकलो, तिची सेवा केली आणि मग तिने भरभरून त्याचे फळ दिले. काळ्या आईची सेवा म्हणजे समस्त मानवजातीची सेवा, म्हणूनच तर मला अन्नदाता, उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते. पण, याचा काय फायदा? आमची दुखरी बाजूही तुम्हांला कळायला हवी.
        आमची सगळी भिस्त पावसावर. पावसाचा लहरीपणा आमच्या साऱ्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी करतो. पाऊस जास्त झाला, कमी झाला किंवा अवेळी झाला तरी प्रत्येकवेळी नुकसान आमचेच. तोंडाशी आलेला घास कधी कधी पावसामुळे हिसकावलाजातो. घरात धनधान्य आले, की आपण काय काय करायचे ही स्वप्न आमची पोरंबाळं या बांधांवर बसून पाहतात. फार मोठी नसतात ओ ती स्वप्नं. पण उभं पीक जेव्हा समोर नष्ट होताना दिसतं, तेव्हा ही स्वप्नं अश्रूंमध्ये वाहताना दिसतात. ती स्वप्नं तरीआम्हांला पूर्ण करता यावीत एवढीच काय ती आमची अपेक्षा!
        शेतकर्‍याने आधुनिकतेची कास धरली पाहिजे अशी सगळ्यांची ओरड आहे. होय, बरोबरच आहे. मलाही ते मान्य आहे; पण आम्हांला योग्य ते साहित्य, मार्गदर्शन नको का मिळायला? नवे तंत्र, नवे शोध तेव्हाच लागतील जेव्हा शेतीविषयक अभ्यासक्रम शाळांमधून शिकवले जातील. डॉक्टर, इंजिनिअरप्रमाणे विद्यार्थी ‘मी आधुनिक शेतकरी बनणार’ असे स्वप्न पाहतील.
        आता आमची सारी भिस्त नव्या पिढीवरच आहे. नव्या संशोधनातून, वेगवेगळ्या साहित्यांच्या आधारे वातावरणातील बदल, ॠतूंमधील बदल, मातीचे परीक्षण, तिचे बदलते स्वरूप या साऱ्यांचा अभ्यास केला जाईल. मातीशी नाते राखणारा आणि आपल्या मेहनतीने आभाळालाही गवसणी घालणारा शेतकरी लवकरच तुमच्या पिढीत अवतरेल अशी आशा आहे.
        शेती करणे हे अजिबात सोपे काम नाही. अडते, दलाल आपल्या फायद्यासाठी आमचा उपयोग करून घेतात. हमी भाव मिळत नसल्याने पिकलेला माल कवडीमोल किमतीला विकावा लागतो. कधी कधी असाच फेकूनही द्यावा लागतो. भारतासारख्या शेतीप्रधान देशात आमच्या मागण्यांसाठी आम्हाला बंद, संप करावे लागतात. यासारखे दुर्दैव ते काय.
          सावकारी कर्जात अडकलेल्या माझ्या कित्येक बांधवांनी  टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी स्वत:चे जीवन संपवले. याचे एकमेव कारण म्हणजे आर्थिक चणचण. आर्थिक संकटात सापडलेल्या, कर्जबाजारी शेतकर्‍यांसारखी वाईट अवस्था इतर कोणाचीही नसेल. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने योग्य त्या योजना राबवून पाठबळ दिले, तर आम्ही शेतकरी म्हणून ताठ मानेने जगू शकू.
        एक गोष्ट मात्र नक्की, आम्ही लढवय्ये आहोत. आम्ही हार मानणार नाही. काळ्या मातीतून सोनं काढण्याची कला आम्ही जाणतो. चला खूप कामं पडली आहेत शेतात. रामराम.

माझी जंगल सफर

        मागच्या वर्षी मामाच्या गावी गेलो असताना जंगलची सफर करण्याचा अनुभव आला. माझ्यासारख्या शहरात वाढलेल्या मुलासाठी हा अनुभव विलक्षण होता. पहाटेपहाटेच मी, माझे भाऊ आणि दोघे मामा असा हौशी गोतावळा गावाबाहेरील शिवारातून जंगलाच्या झाडीत शिरला. मामाने हातात काठी घेतली होती. झाडांमधून वाट काढत आमची सफर सुरू झाली. मानवी वस्तीपासून दूर एका वेगळ्या दुनियेची मला ओळख होत होती.
        माझे मामा जंगलाशी चांगलेच परिचित असल्याने बिनधास्त वाट तुडवत होते. आम्ही शहरात वाढलेली भावंडं मात्र पायाखाली येणाऱ्या काटक्यांच्या आवाजानेही दचकत होतो. पक्ष्यांच्या वेगवेगळ्या शिट्ट्या ऐकताना गंमत येत होती; मात्र एक अनामिक भीती सतत जाणवत होतो. जंगलातील आतल्या बाजूला झाडांच्या दाटीमुळे फारसा सूर्यप्रकाश पोहोचत नव्हता. आकाश गायब झाल्यासारखे वाटत होते.
        कधीही न पाहिलेले, उंच उंच वृक्ष. कित्येक वर्षे जुने असलेले. जंगलाच्या जुनेपणाचा अंदाज देत होते. करवंदाच्या जाळ्या, त्यामध्ये पिकलेली करवंदे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. हात घालू पाहताच काट्यांनी आम्हांला बोचकारले. मामाने मात्र सराईतपणे एकही काटा न बोचता अलगद करवंदं काढून दिली. एवढा मधुर रानमेवा आम्ही कधी चाखलाच नव्हता. अचानक पुढ्यातून कोणीतरी टुणकन उडी मारली. मी आणि माझे भाऊ दचकलोच. पाहतो तर काय? आमच्या पुढ्यातून एक ससा उड्या मारत गवतामध्ये दिसेनासा झाला. पुढे मोठमोठी वारुळे पाहून मी मनातून चरकलो. मामाने ही वारुळे मुंग्यांची असल्याचे सांगितल्याने हायसे वाटले. ज्या वारुळांवर सापाच्या सरपटण्याच्या खुणा असतात त्याच्या आसपास जायचे नाही एवढे मात्र मामाने आवर्जून सांगितले. ही माहिती नव्यानेच आमच्यामध्ये रूजत होती. जंगलातील अनेकविध पक्षी, त्यांचे आवाज, रंग, त्यांच्या सवयी, त्यांची घरटी असा माहितीचा अमूल्य खजिनाच मामांनी आमच्यासमोर उघडला. त्यातून किती खजिना लुटू असा प्रश्‍न मनाला पडला होता.
         काही अंतर चालत गेल्यावर मामाने आम्हांला सावध केले. जंगलातील तळ्याच्या आजूबाजूला पाणी पिण्यासाठी अनेक प्राणी, पक्षी येत असल्याने त्यांना चाहूल लागू न देताच त्यांना पाहता येणे शक्य होते. आम्ही हळुवार पावलं टाकत झाडीतून तळ्याचे निरीक्षण करू लागलो. हरणं, काळवीट, माकडं असे कित्येक प्राणी सावधगिरीने पाणी पित होते. पक्षीही पाणी पिऊन गाणी गात भुरऽकन उडत होते. हा सृष्टीचा सोहळा फार आनंददायी होता. अगदी डोळ्यांचे पारणे फिटवणारा! मनामध्ये नवे चैतन्य भरणारा!
         या सार्‍या जंगलप्रवासात माझ्या लक्षात आले, की आपली निसर्गसंपदा समृद्ध आहे. खरे जीवन या निसर्गाच्या सान्निध्यात दडलेले आहे. माणसांप्रमाणेच या सृष्टीवर इतर प्राण्यांचाही अधिकार आहे. तो आपण मान्य केला, तर जगण्याची मजा आणखी वाढेल. निसर्गाच्या सहवासातील अप्रतिम आनंद काय असतो याचा अनुभव मी या जंगलसफारीत घेतला. जंगलात शिरताना घाबरलेला मी मात्र अलिबाबाची गुहा पाहून आल्याप्रमाणे मोठ्या आनंदात घरी परतलो.

लॉकडाऊन संपल्यानंतरचा शाळेचा पहिला दिवस

         . . . आणि अखेर तो दिवस उजाडला. कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे बंद असलेली शाळा आज सुरू होणार होती. शाळेत जाताना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असल्यामुळे काहीजण ओळखूसुद्धा येत नव्हते. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरचे आमचे स्वागत मोठ्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले गेले. एकमेकांपासून दोन फुटांच्या अंतरावर आम्हांला उभे केले होते. हाताला ‘सॅनिटायझर’ लावून पुढे एक शिपाई काका आमच्या शरीराचे तापमान आपल्या रजिस्टरमध्ये लिहून घेत होते. स्वच्छतेविषयी घोषणा आणि सूचनाफलक जागोजागी लावले होते.
         शाळेची इमारत अगदी वेगळी भासत होती. जणू आम्हां विद्यार्थ्यांची वाट पाहून थकलेली; मात्र आम्हांला पाहून मनोमन खुललेली. रोज ऑनलाईन भेटणारी शिक्षकमंडळी आज प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मात्र मनाला खऱ्या अर्थाने समाधान वाटले. शिक्षकांच्या नजरेतही समोर आपले विद्यार्थी दिसल्यानंतर दाटणाऱ्या भावना स्पष्ट दिसत होत्या. खूप दिवसांनी भेटणारे मित्र, मैत्रिणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्साह पाहून, सारेच शाळा सुरू होण्याची किती आतुरतेने वाट पाहत होते याची प्रचीती आली.
         प्रार्थनेच्या वेळी कोरोना महामारीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जगभरातील नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, सफाई कामगार, आशा वर्कर्स, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी या कोव्हिड योद्ध्यांना टाळ्यांच्या गजरात सलाम केला गेला. शाळेत वावरताना काय काळजी घ्यावी हे पुन्हा एकदा सांगितले गेले.
         वर्गातील बसण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली होती. दरवाजाजवळ ‘सॅनिटायझर’ स्टँड होता. एका बाकावर एक अशा पद्धतीने बसण्याची व्यवस्था केली होती. वर्षभर ऑनलाईनचा अनुभव घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा आमचा प्रत्यक्ष अभ्यास सुरू झाला. प्रत्यक्ष शिकण्याचा हा अनुभव वर्षभराने पुन्हा एकदा घेता येणार या विचारांनी मनात हुरहूर निर्माण केली होती. पुन्हा एकदा शिक्षकांनी सांगितलेल्या गमतीजमती, शिकवता शिकवता मध्येच विचारलेले सामान्यज्ञानाचे प्रश्‍न, मध्येच बडबडल्याने शिक्षकांचा मिळणारा ओरडा या साऱ्याला आसुसलेल्या आम्हां विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या सगळ्या अनुभवांसह पहिला तास पार पडला आणि एक विलक्षण समाधान पदरी पडले.
         घरामध्ये बसून मोबाइल, टिव्ही आणि संगणक यांत अडकलेल्या आम्हांला अखेर एकदाचे मित्र-मैत्रिणी भेटले आणि मधल्या सुट्टीत गप्पांना अक्षरश: ऊत आला होता. काय सांगू आणि किती सांगू असे झाले होते. मोबाइलच्या माध्यमातून सारे भेटत होतोच; पण प्रत्यक्षात झालेली भेट ही आपल्या आयुष्यात आपले मित्र-मैत्रिणी किती आवश्यक आहेत याची जाणीव करून देणारी होती. कधी एकदा खेळाच्या मैदानावर जातोय आणि धमाल करतो, असे प्रत्येकाला झाले होते; मात्र काही दिवस खेळाचे तास होणार नाहीत, अशी सूचना येताच साऱ्यांचाच हिरमोड झाला. थोडी काळजी घेणे आवश्यक होतेच. शाळा तर सुरू झाली. आता सर्वच मौजमजा पुन्हा अनुभवता येतीलच असा विचार करून शाळा सुटल्यावर आम्ही खूप आनंदाने घरी आलो.

वाचन प्रेरणा दिन

         दरवर्षी शाळेत डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आमच्याकडे त्याचे आयोजन करण्याची जबाबदारी होती. शाळेची सजावट करण्याकरता आम्ही वेगवेगळ्या सुभाषितांनी फलक सजवले. कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कवी रमेश देशपांडे आणि लेखक राहुल पुरोहित यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.
         कार्यक्रमाचे प्रारंभीचे सोपस्कार उरकल्यावर मूळ कार्यक्रमामध्ये विविध कथांचे अभिवाचन केले गेले. आमच्यातल्याच काही विद्यार्थ्यांनी कथा एवढ्या सुंदर सादर केल्या, की आपण ती गोष्ट खरोखर पाहतो आहोत असा भास झाला. नटसम्राट नाटकातील स्वगत म्हणणाऱ्या विद्यार्थ्याने जणू ‘नटसम्राट’ नाटक आमच्यापुढे उभे केले.
         यात लक्षवेधी कार्यक्रम ठरला तो म्हणजे सामुदायिक काव्यगायनाचा. शाळेतील विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी कवितांना चाली लावून अशाप्रकारे सादर केले, की साऱ्यांनीच त्यांच्या या काव्यगायनाचे कौतुक केले. ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश देणारी एक छोटी नाटिका इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यातील विनोदी संवादाने साऱ्यांचीच हसून हसून पुरेवाट झाली.
         विद्यार्थ्यांनी कोणतेही एक पुस्तक वाचलेच पाहिजे या हेतूने शाळेच्या मुख्याध्यापकांनी वाचन संस्कृती रूजवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. कोणत्याही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांनी वाचलेले पुस्तक, त्यांना वाचनातून मिळालेला अनुभव व त्याविषयी त्यांचे मत याविषयी थोडक्यात सांगायचे होते. अनेकजणांनी आपल्या वाचनाचा आनंद खूप सविस्तरपणे मांडला.
         आम्ही इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी बालसाहित्याचे ऑनलाईन प्रदर्शन संगणक कक्षात भरवले होते. प्रत्यक्षात पुस्तके न मांडता संगणकावर इंटरनेटच्या साहाय्याने वेगवेगळी पुस्तके, साहित्य व वेबसाईट यांचे मार्गदर्शन यात करण्यात आले होते. शब्दकोश, व्युत्पत्ती कोश कसा पाहावा, त्याची पिडिएफ स्वरूपातील आवृत्त्यांची प्रात्यक्षिके या ऑनलाईन प्रदर्शनातून देण्यात आली.
         ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमासाठी लाभलेल्या दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून वाचनाची व लेखनाची प्रेरणा दिली. प्रसिद्ध कवी रमेश देशपांडे यांनी सादर केलेल्या त्यांच्या कविता आणि त्या कवितांमागच्या कथा आम्हां साऱ्या विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या होत्या. लेखक राहुल पुरोहित यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचा साधेपणा, त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व यांबद्दल सांगतानाच आपण आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगलो, तर जगण्याचा खरा आनंद घेऊ शकतो असा संदेश दिला. या साहित्यिकांचे अनुभव आम्हां साऱ्यांनाच प्रेरणा देणारे ठरले.
         कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. जोशी सरांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या नेटक्या आयोजनाबद्दल कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून त्यांनी ‘वाचन प्रेरणा दिन’ हा केवळ एका दिवसासाठी नसून साऱ्यांनीच रोज काही ना काही वाचावे असे आवाहन केले. वाचन प्रेरणा दिनांचा आगळावेगळा उत्सव अनुभवून आम्ही घरी परतलो.

मी फुलवलेली बाग

         कोरोना महामारी काळातील लॉकडाऊन म्हणजे अतिशय कंटाळवाणा काळ होता; पण मला मात्र या काळात आपलो आवड जपण्याची नामी संधीच मिळाली. ती आवड प्रत्यक्षात अवतरली ती आमच्या गॅलरीमध्ये फुलवलेल्या बागेच्या रूपात! आजोबांनी पाठिंबा दिला आणि माझी बागकामाची सुरुवात झाली. आमच्या अडगळीच्या सामानात प्लॅस्टिकचे मोठे ट्रे होते. त्यामध्ये माती भरून घेतली. जवळच एक फूलझाडांची नर्सरी आहे. मी जमवलेल्या पैशांतून आजोबांच्या सोबतीने तेथून काही फूलझाडे विकत आणली. आजोबांच्या मार्गदर्शनाखाली या रोपांची मी लागवड केली. त्यांना खतपाणी घालणे, त्यांची निगा राखण्याचे काम मल एक विलक्षण आनंद मिळवून देत होते.
         या बागकामातला माझा उत्साह बघून हळूहळू कुटुंबियांनीही आपले सहकार्य आणि मार्गदर्शन सुरू केले. आई पाणी घालण्याच्या वेळी मदत करू लागली. बाबांनी एक छोटी झारी आणि खुरपे आणून दिले. बागकामासाठी सेंद्रिय खताचा वापर करण्याचा सल्ला दादाने दिला. त्यासाठी आम्ही कोथिंबीर किंवा इतर भाज्यांच्या न वापरलेल्या भागांचा उपयोग खत म्हणून करू लागलो. डाळींचे पाणी, तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी, चहाचा गाळ यांचा वापर खत म्हणून केला. मासे धुतल्यानंतर त्याचे पाणी घातल्याचा चांगलाच परिणाम दिसून आला.
         फूलझाडांनी चांगली तरतरी धरली मग आम्हां सर्वांचाच उत्साह वाढला. पुढे भाजीपाला लागवड करण्याची इच्छा निर्माण झाली. आजोबांनी मेथी, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो घरच्याघरी कसे पिकवायचे ते सांगितले. मेथी पेरली. कोथिंबिरीसाठी धणे फोडून पेरले. मिरची आणि टोमॅटोच्या बिया टाकून ठेवल्या. थोड्याच दिवसांत मेथीची भाजी छानपैकी तयार झाली. ती मेथीची भाजी काढून आईला दिल्यानंतर आणि त्याची भाजी खाल्यानंतर काय आनंद झाला म्हणून सांगू!
         झाडांची काळजी घेत होतो. वेळेवर पाणी, खत देत होतो. मिरची, टोमॅटोची रोपे चांगलीच तयार झाली. मेथी पाठोपाठ आम्ही कोथिंबीर जेवणात वापरली. झेंडूची फुले, गुलाबाची फुले नेहमीच्या पूजेसाठी मिळू लागली. एके दिवशी मिरचीच्या रोपांवर पांढर्‍या रंगाची फुले दिसली. आजोबा म्हणाले, “राजे, तुमच्या बागेत मिरच्या येणार बरं का.” मिरच्यांच्या फुलांपासून मिरच्या तयार होण्याचा प्रवास मी रोज न्याहाळत होतो. आई मध्येच चिडून काय सारखं सारखं झाडांना त्रास देतोस, म्हणून ओरडायची. घरातले सारेच जण माझे आणि माझ्या बागेचे क करत होते. दादाने त्याच्या सोशल मीडियावर माझ्या बागेचे फोटो टाकल्यावर त्याला खूप ‘लाइक्स’ आल्या. मला या साऱ्यातून एक वेगळेच समाधान मिळाले. आपण काहीतरी नवनिर्मिती शिकलो अशी भावना निर्माण झाली.

मी बनवलेला पहिला पदार्थ

        त्यादिवशी घरी कोणीच नव्हते. फक्त मी आणि आई. संध्याकाळची वेळ होती. आई म्हणाली, “माझं डोकं फार ठणकतंय रे.” मी कसा काय ते चटकन म्हणालो, “आई, मी चहा करून देऊ का?” आई हसून म्हणाली, “तू चहा करणार?” मी म्हटले, “त्यात काय एवढे? तू सांग, मी बनवेन.” आईने ठीक आहे म्हटल्यावर मी तयारीला लागलो.
        आजपर्यंत मी कोणताही पदार्थ बनवला नव्हता. आईला विचारून साखर, चहापावडर, चहाचे भांडे, दूध सारे बाहेर काढले. छान आलं घातलेला चहा करायचा म्हणून एक आल्याचा तुकडा फ्रिजमधून काढला. आईने पाणी गरम करताना गॅस कसा पेटवायचा हे शिकवले होते. त्यामुळे, गॅस पेटवला. त्यावर चहाचे भांडे ठेवले. आईला विचारून त्यात पाणी टाकले. पाण्याला उकळ आल्यानंतर चहापावडर, दोन चमचे साखर आणि आलं टाकलं.
        मला तर असे वाटत होते, की किती सोपं आहे, चहा बनवणं. चहा बनवण्याचा आनंद फारच वेगळा होता. त्यात आईचं डोकं दुखतंय म्हणून मी स्वत: तिला चहा बनवून देत होतो, याचे एक विलक्षण समाधान वाटत होतं. चहाला चांगलाच उकळ आला. चहा तयार झाला हे माझ्या लक्षात आले. आई शांतपणे पडून होती.
        चहा देण्यासाठी मी कप बाहेर काढले. फ्रिजमधून काढलेले दूध गरम करत ठेवले. गॅस बंद केला. दोन्ही कपांमध्ये दूध ओतून गाळणीने त्यावर चहा गाळून घेतला. 
        दोन हातांमध्ये दोन कप घेऊन मी विजयी वीरासारखा आईला चहा घेऊन आलो.
        गरमागरम, वाफाळलेला चहा. माझा पहिला पदार्थ आणि मी पहिलाच पदार्थ उत्कृष्ट बनवला म्हणून आईकडून शाबासकी मिळणार. सारे कौतुक करणार. आईला चहाचा कप दिला आणि स्वत:चे कौतुक ऐकण्यासाठी ती कधी एकदा चहाचा घोट घेते हे बघत बसलो.
        आईने चहाचा घोट घेतला आणि तोंड वेडेवाकडे करत ती बेसिनकडे पळाली. मला समजेना. काय झाले? मला माझ्या हातातील चहा पिण्याचा धीर होत नव्हता. मी आईला विचारले, “आई, काय झाले गं? चहा कडू झाला का? साखर कमी पडली का?” आई बाहेर आली ती जोरजोराने हसतंच आणि म्हणाली, “अरे वेंधळ्या, साखर पडलीच कुठे चहात.” मी म्हणालो, “अगं आई, मी टाकली ना. चांगली दोन चमचे टाकली.” यावर हसून आई म्हणाली, “जरा स्वयंपाकघरात जाऊन बघ. तू साखरेऐवजी मीठ घातलंस चहामध्ये.”
         माझी चांगलीच फजिती झाली होती. मोठ्या उत्साहाच्या भरात साखरेच्या डब्याऐवजी मिठाचा डबा उघडून दोन चमचे मीठ मी चहात घातले होते. मग मात्र हसून हसून आमची पुरेवाट झाली; पण मी बनवलेला पहिला पदार्थ कायम माझ्या आठवणीत राहिला.