भाग १ पाठ – ४ उपास

उत्तर: (अ) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण पंतांची नोकरी टेलिफोन-ऑपरेटरची होती.

उत्तर: (आ) बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

(अ) भीष्म प्रतिज्ञा

उत्तर: महाभारत या महाकाव्यातील भीष्माने आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ही प्रतिज्ञा त्याने जीवनाच्या अंतापर्यंत पाळली होती. त्यामुळे, तेवढ्या ताकदीने केलेल्या प्रतिज्ञेस भीष्म प्रतिज्ञा म्हणण्याचा प्रघात पडला. पाठामध्येही लेखकाने आपले अति प्रमाणात वाढलेले वजन कमी करण्याची प्रतिज्ञा केली आहे. ती प्रतिज्ञा साधीसुधी नसून ती भीष्म प्रतिज्ञा आहे असे लेखक मोठ्या उत्साहाने म्हणतो.

 

(आ) बाळसेदार भाज्या

उत्तर: लेखकाने विनोद साधण्याच्या हेतूने भाज्यांचे सडपातळ आणि बाळसेदार म्हणजेच गुबगुबीत असे प्रकार पाडले. बाळसेदार भाज्या स्वयंपाकघरातून हाकलून दिल्याने पंतांच्या वजनक्षयाच्या संकल्पासाठी त्याची मदतच झाली आहे असे म्हटले आहे. गुबगुबीत (बाळसेदार) भाज्या खाल्ल्याने पंतांचे वजन वाढून तेही बाळसेदार होतील, म्हणून या भाज्या वापरणे बंद केले हा यामागील दडलेला विनोद आहे.

 

(इ) वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.

उत्तर: पंतांनी वजन घटवण्यासाठी आहारशास्त्राची पुस्तके वाचली. चरबीयुक्त द्रव्ये, प्रोटीनयुक्त पदार्थ या शब्दांबद्दलची त्यांची आस्था वाढली, त्यांनी मित्रांचे सल्ले पाळले उदा. दुपारी झोपणे सोडा, पत्ते खेळणे सोडा, रनिंग करा, बोलणे सोडा, तोंडावर ताबा ठेवा, तूप, लोणी, तळलेले पदार्थ खाणे सोडा, दोरीवरच्या उड्या मारा वगैरे, पंतांनी एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार,

दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना करूनही पंताचे वजन झाले, “एकशे ब्याण्णव पौंड’. त्यामुळे त्यांनी यापुढे जन्मात डाएटच्या आहारी न जाण्याचे ठरवले. कारण त्यांच्या मते एवढे करूनही वजन काही कमी झाले नाही, कारण वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.

 

(ई) असामान्य मनोनिग्रह

उत्तर: मुळातच अफाट खाण्याची सवय असलेल्या, खाण्यापिण्यावर संयम नसलेल्या पंतांनी उपासाचा निर्णय घेणे ही असामान्य बाब होती. सुरुवातीला अनेक अडथळे येऊन, संकल्पाला सुरुंग लागूनही महिनाभर त्यांनी आपल्या मनावर दगड ठेवून आपले आवडते पदार्थ दूर केले. ‘डाएट’ बाबतीत मन घट्ट करून पथ्य पाळले. केवळ दोनदाच साखरभात, एकदा कोळंबीभात व वडाभात खाऊन इतर भात वर्ज्य करण्यासारखे असामान्य काम त्यांनी केले.

(अ) दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.
उत्तर: पंतांना डाएटिंगसाठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कचेरीतील सहकारी महिलेने दिला. पंतांची खोली आठ बाय दहा एवढी लहान होती. त्यात त्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला. दिवाणखान्यात संपूर्ण दोरी फिरवताना एकदा ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या व औषधांच्या बाटल्या खाली पडल्या. दुसऱ्या वेळेस दोरी शेजारच्या आचार्य बर्वे यांच्या गळ्यांत अडकली. या सर्व धडपडीतून अपुऱ्या जागेत दोरीवरच्या उड्या किती हास्यास्पद ठरतात, हे लेखकांना दाखवून द्यायचे आहे. डाएटिंग करण्याच्या अघोरी उपायांची या प्रसंगातून खिल्ली उडवली आहे. अशा प्रकारे विसंगतीतून घडलेला विनोद लेखकांनी मांडला आहे.

 

(आ) पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.

उत्तर: पंतांच्या वजन कमी करण्याच्या संकल्पाला त्यांची पत्नीही उत्साहाने साथ देत होती. जेवणातील सारी पथ्ये त्यांची पत्नी अगदी लक्षपूर्वक पाळत असे. पंतांनी उपास जाहीर करताच लेखकाच्या ताटात उकडलेल्या पडवळासारखे चमत्कारिक पदार्थ पाडण्याचे श्रेय त्यांच्या पत्नीलाच जाते. शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, भेंडी अशा सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू करणे आणि कोबी, कॉलिफ्लावरसारख्या बाळसेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी करण्यासारखी महत्त्वपूर्ण कामे त्यांनी केली, त्यामागे त्यांचा उत्साह दडलेला दिसतो. त्यांनी पंतांना बिनसाखरेचा चहाही द्यायला सुरुवात केली. घरातील साखर संपेपर्यंत चहात साखर घालणे, मुलांसाठी लाडू बशीत काढून ठेवणे यांसारखे काही प्रसंग सोडले, तर ती पंतांच्या या संकल्पाला मोठ्या
उत्साहात हातभार लावताना दिसते.

 

(इ) पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.
उत्तर: पंतांनी असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस पोंडानी वजन घटेल अशी खात्री बाळगली होती. परंतु वजन काट्यावर वजन करताच महिन्याभरापूर्वी ज्या वजन काट्याने त्यांचे वजन एकशे एक्याऐंशी पौंड दाखवले होते त्याच वजन काट्याने त्यांचे वजन आज एकशे ब्याण्णव पौंड दाखवले. शिवाय ‘आप बहुत समझदार और गंभीर है’ । असे भविष्यही दाखवले. पंत एकीकडे पोष्टिक सात्त्विक आहार घेतात. लिंबाचा रस, फलाहार, दूध व दुसरीकडे पंधरा दिवसात चार वेळा भात खाऊन वजन कमी झाले असेल अशी खात्री बाळगतात. हा विनोद मला सर्वात जास्त आवडला.

 

(ई) तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही, तर कुटुंबातील व्यक्‍ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.

उत्तर: मी संकल्प केला; पण तो पूर्ण केला नाही ही गोष्ट माझ्या आई-वडिलांना नक्कीच आवडणारी नाही. त्यामुळे, बाबा या गोष्टीने माझ्यावर रागावतील, मला ओरडतील. आई-बाबांची प्रतिक्रिया ही नेहमीच एकमेकांना पूरक अशी असते. त्यामुळे, बाबा रागावल्यानंतर आई मला समोर बसवून बाबांच्या रागावण्याचं कारण समजावून सांगेल. माझी चूक, त्याचे परिणाम हे सगळं ती मला पटवून देईल. एवढंच नव्हे, तर मी माझा संकल्प कसा दृढ करावा, यासाठी ती मला मार्गदर्शनही करेल; पुन्हा संकल्प करण्यासाठी प्रेरित करेल. ताईची प्रतिक्रिया मला चिडवण्याची असेलच; पण तिचं चिडवणंही मी सकारात्मक पद्धतीने घ्यावं असाच आईचा सल्ला असेल. बाबांचा धाक, आईचं प्रेमळ मार्गदर्शन आणि ताईचं गमतीदार चिडवणं हे सगळं माझ्यासाठी प्रेरणा देणारं असेल हे नक्की.