उत्तर: प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून, योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध दृष्टान्तांतून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात – पाण्याने वरवरचा मळ निघतो; पण योग्यांच्या ज्ञानाने अंतर्बाहय निर्मळता होते. पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते, पण योगी चिरकाल टिकणारी स्वानंदतृप्ती देतात. उदकाचा म्हणजे पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो पण योग्यांचा गोडवा, त्यांचे ज्ञानाचे शब्द, प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते. पण योग्यांच्या कीर्तनाने, निजज्ञानाने जनांचा उद्धार होतो. त्यांचे पूर्ण जीवन सफल होते.