‘औक्षण’ म्हणजे ओवाळणे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला सार्या देशवासियांकडून केले जाणारे हे एक प्रातिनिधिक औक्षण आहे. या क्षणी मनात दाटून येणाऱ्या विविध भावभावना कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेत व्यक्त केल्या आहेत. सैनिक जेव्हा रणभूमीवर युद्धासाठी उतरतात त्यावेळी अनेक बिकट प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागतो. बंदुकीच्या गोळ्यांचा, तोफगोळ्यांचा भडिमार होत आहे, नजरेपुढे धुराचे लोटच्या लोट उसळत आहेत, अशा परिस्थितीत न घाबरता, धडाडणाऱ्या तोफांची पर्वा न करता जिद्दीने, धैर्याने, शौर्याने तो लढतो. प्रसंगी प्राण तळहातावर झेलून संकटाला सामोरे जाणाऱ्या या सैनिकाचे शौर्य अवर्णनीय असते असा विचार कवयित्री या ओळींतून स्पष्ट करते.