भाग १ पाठ – स्थूल्वाचन: मोठे होत असलेल्या मुलांनो ..

उत्तर (अ): ‘बार्क’ हे ‘भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या नावाचे लघुरूप आहे. डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांची आठवण म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलेले आहे. ही संस्था आता प्रचंड मोठी झालेली आहे. अणुसंशोधनाच्या क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या अनेक नवीन मुलांना तिथे कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. अनेक मुले इथल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये संशोधन करत असतात. योग्य प्रशिक्षण घेऊन स्वत:ला सक्षम करून स्वत:चे मार्ग शोधून पुढे जातात, आपले उज्ज्वल भविष्य घडवत असतात.

उत्तर (आ): डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. भारतातील अणुसंशोधन केंद्राला त्यांचेच नाव दिले आहे. ही संस्था ‘बार्क’ ‘भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या नावाने ओळखली जाते. अनेक मुले-मुली इथल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये संशोधन करत असतात. या शिक्षण घेणाऱ्या मुलांना भेटायला, त्यांना प्रोत्साहित करायला डॉ. होमी भाभा नेहमी तिथे येत असत. डॉ. होमी भाभा म्हणजे प्रचंड स्फूर्तिदायक असे व्यक्तिमत्त्व होते. लेखक स्वत: या ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना डॉ. भाभा तीन-चार वेळा स्वत: तिथे आले होते. त्यावेळी स्वत:ला सक्षम कसे करावे, ऊर्जा कशी मिळवावी, स्वत:च स्वत:चे मार्ग कसे शोधावेत यासाठीचे त्यांचे मार्गदर्शन लेखक डॉ. अनिल काकोडकर यांच्यासाठी फारच महत्त्वाचे ठरले होते.

(२) 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.

उत्तर : डॉ. होमी भाभा यांच्या मते, स्वत:च काम निर्माण करणे व काय काम करावे, हे स्वत:च ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने आपल्याला सांगितलं असेल तेवढंच काम करायचं आणि काही सांगितलं नसेल तेव्हा आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चुकीची गोष्ट आहे.  चिंता करीत न बसता, कार्यरत व कार्यमग्न झाले की ‘ स्काय इज द लिमिट ’ ही परिस्थिती निर्माण होते. कोणीतरी बोट धरून चालवेल, मार्ग दाखवेल ही स्थिती आरंभी ठीक आहे. परंतु शेवटी स्वत:चे मार्ग स्वत: शोधणे, ऊर्जा मिळवणे व कार्यात सक्षम होणे हे ध्येय असावे. यालाच ‘स्काय इज द लिमिट’ असे म्हटले आहे.

(३) मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?

उत्तर :  मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यासाठी ज्यांची नेमणूक केली जात असे ते लोक कामाचे स्वरूप, त्यांमधील बारकावे हे काहीही न शिकता प्रथम आपल्या हाताखाली काम करण्यासाठी मदतनिसांची मागणी करत. काम सुरू होण्याआधीच साधनसामग्रीची मागणी केली जात असे. या वृत्तीमुळेच ते काम कधी झाले नाही. वरिष्ठांना ही गोष्ट न आवडल्याने या कामासाठी कोणाची नेमणूक झाली नाही. यामुळेच, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम झाले नसावे असे वाटते.

(४) ' आधी केले मग सांगितले ', या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.

उत्तर :  परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या व्यक्‍ती ‘आधी केले मग सांगितले ’, या उक्तीप्रमाणेच काम करत राहतात. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्रातील प्रत्येक बारीकसारीक काम ते स्वत: शिकून घेतात. त्यातील बारकावे जाणून घेतात. ते काम करताना येणार्‍या अडचणी, त्यासाठी लागणारा वेळ याबाबत त्यांना नेमकेपणाने माहिती असते. त्यामुळेच, ते आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. आपल्या वरिष्ठांना या कामातील सारे काही करता येते, हे माहीत असल्यामुळे हाताखालचे लोक त्यांना मान देतात. त्यांनी केलेल्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करतात. अशाप्रकारे ‘आधी केले मग सांगितले ’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट होते.

(५) 'प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते', हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.

उत्तर :  दिवाळीत रंगीत कागदी कंदिलांची शोभा मला खूप आवडते. आई नेहमी बाजारातून छोटे कंदील विकत आणायची. या वर्षी मी ठरवले की आपण स्वत: कागदी कंदील तयार करायचा. बघू या जमते की नाही ते? मी स्वत: स्टेशनरीच्या दुकानातून रंगीत झिलेटीन, कागद व काड्या आणल्या. सुताचे बंडल आणले. नि दिवाळीच्या आदल्या सकाळी कंदील करायला घेतले. चौकोनात काड्या जोडायला घेतल्या. पण काही मनासारखे जमेना. दुपार झाली मी पुन्हा विस्कटायचो पुन्हा जोडायचो. नीट जमत नव्हते. पण निर्धार केला की कंदील पूर्ण झाल्याशिवाय जेवायचे नाही. हळूहळू मला ते जमायला लागले. पूर्ण कंदीलाचा काड्यांचा सांगाडा तयार झाला. मग त्यावर ताणून वेगवेगळे रंगीत कागद चिकटवणे सोपे गेले. अखेर खूप मेहनतीनंतर सुंदर कंदील तयार झाला. तेव्हा मला कळले की, ‘प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते. ‘