१. मामू

कृती

(१) (अ) कोण ते लिहा.

(१) चैतन्याचे छोटे कोंब- शाळेतील मुले

(२) सफेद दाढीतील केसांएवढ्या आठवणी असणारा- मामू

(३) शाळेबाहेरचा बहुरूपी- मामू

(४) अनघड, कोवळे कंठ- शाळेतील मुले

(आ) कृती करा

Picture2

(इ) खालील वाक्‍यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

(१) मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. राष्ट्रभक्ती, स्वदेशाभिमान

(२) आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. हळवेपणा, संवेदनशीलता

(३) मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, “घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.” मायाळूपणा, आपुलकी

(४) माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. कर्तव्यतत्परता, चपळाई

(५) मामूएखाद्या कार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखाद्या विषयावर बोलूशकतो. उत्तम वक्तृत्व गुण, हुशारी

(ई) खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा.

(१) थोराड घंटा
उत्तरः प्रस्तुत परिच्छेदात लेखकाने शाळेच्या घंटेला थोराड अशी उपमा दिली आहे कारण जेवढी मोठी परंपरा शाळेला आहे तेवढीच या घंटेलादेखील आहे. थोराड म्हणजे वयाने मोठी झालेली, आकाराने भव्य असणारी व्यक्‍ती होय; मात्र मानवाप्रमाणेच या घंटेनेही अनेक वर्षे या शाळेत काढली आहेत. त्यामुळे, ही घंटा वयाने झालेली आहे. शिवाय, तिचा आकारही भव्य असल्याने ‘थोराड’ हे मानवाला लागणारे विशेषण येथे चपखल बसते. थोराड माणसांच्या पदरी जशी अनुभवांची, आठवणींची पुंजी असते तशीच अनुभवांची, आठवणींची पुंजी या घंटेकडेही असावी. मुलांच्या कित्येक पिढ्यांमधील चैतन्याचे कोंब उमलताना पाहणारी ही घंटा त्या पिढ्यांची साक्षीदार आहे. त्यामुळेच, घंटेला दिलेले थोराड हे विशेषण त्या घंटेचा इतिहास मांडून जाते.

( २ ) अभिमानाची झालर
उत्तर: संस्थानातील राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत त्यांच्या पदरी चाकरी केलेला मामू त्याच्या अनुभवांचे भरभरून वर्णन करतो. त्याच्या म्हाताऱ्या (बुढ्या) देहातील उमदं मनं त्याच्या चर्येवरील हावभावातून आपला त्या काळातील अनुभव मांडताना आजही अभिमानाने शहारून उठतं.
     राजाराम महाराजांचा मुक्काम जेव्हा पन्हाळ्यावर असे त्यावेळी मामू भल्या पहाटे आपल्या साथीदारांसह चौदा मैलांची पायपीट करत असे. यासाठी प्रचंड शारीरिक श्रम लागत असत; मात्र कर्तव्यनिष्ठेने भारलेल्या या सेवकाला त्या त्रासाची, वेदनेची कधीच पर्वा नव्हती. त्याचा लवलेशह मामूच्या चेहऱ्यावर दिसत नाही. उलट आजही त्या आठवणींत रमताना त्याच्या चेहऱ्यावर तोच विलक्षण अभिमान झळकू लागतो. हा अभिमान आपल्या राजाप्रती असलेल्या आदरभावाची, त्याच्यातील कर्तव्यनिष्ठतेची, कार्यतत्परतेची, सहनशीलतेची, राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देतो.  ही चमचमणारी अभिमानाची झालर त्याच्या चेहऱ्यावर आजही तसेच तेज पसरवताना दिसते.

(२) व्याकरण.

(अ) खालील शब्दांतील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

(१) इशारतीबरहुकूम
उत्तर: इशारती, रती, रबर, तीर, हुशार, हुकूम, मती, मर

(२) आमदारसाहेब
उत्तर: आमदार, आरसा, आहेर, आब, मदार, मर, दाम, दार, दाब, साम, सार, साहेब, हेम, हेर, बदाम.

(३) समाधान
उत्तर: समा, सन, मास, मान, मानस, धान, नस, समान.

(आ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

(१) चौवाटा पांगणे- चार दिशांना विखुरणे
वाक्य: महाविद्यालयात असताना नेहमी एकत्र राहणारे ते मित्र महाविद्यालयीन वर्षे संपताच चौवाटा पांगले.

(२) कंठ दाटून येणे- भावनेच्या आवेगाने मन भरून येणे
वाक्य: आपल्या खास मित्राच्या आठवणी सांगताना विराजचा कंठ दाटून आला.

(३) हरवलेला काळ मुठीत पकडणे- जुन्या आठवणी पुन्हा जगू पाहणे
वाकय: सेवानिवृत्तीच्या दिवशी आपटे काका आपल्या टेबलवर बसून हरवलेला काळ मुठीत पकडण्याचा प्रयत्न करत होते.

(इ) खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.

(१) अनुमती   (२) जुनापुराणा  (३) साथीदार   (४) घटकाभर   (५) भरदिवसा
(६) ओबडधोबड  (७) नानातऱ्हा  (८) गुणवान   (९) अगणित   (१०) अभिवाचन
उत्तर:
               

(३) स्वमत

(अ) “शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे’, या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर: ‘मामू’ हा शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला एक सर्वसामान्य माणूस; पण आपल्या अंगी असलेल्या बहुगुणांमुळे तो इतरांहून वेगळा ठरतो. मामू ज्या माणसांच्या संपर्कात जातो त्या साऱ्यांचा तो ‘मामू’ होतो. असा हा ‘मामू’ शाळेतील आपले काम अगदी मनापासून आणि चोखपणे बजावतो.
    मामू जेव्हा शाळेबाहेर पडतो तेव्हा मात्र तो शिपाई राहात नाही. आपल्या मोकळ्या आणि सारे काही सामावून घेण्याच्या वृत्तीमुळे तो जेथे जातो, तिथला होतो. कधी तो  बागवानाचे दुकान चालवणारा आणि मोबदल्याची अपेक्षा न करणारा दुकानदार होतो, तर कधी लहानग्यांना उर्दू भाषेचे धडे देणारा शिक्षक होतो. आपल्या घरी तो आपल्या मुलांचा जागरूक, जबाबदार, मुलांच्या भविष्याच्या चिंतेने दूरचा विचार करणारा पिता असतो, तर कधी आपल्या आईच्या आठवणीत रडणारा, क्षणात आपल्या लहान मुलांच्या वयाचा होणारा मुलगा असतो. वैद्याची भूमिका घेणारा मामू ही भूमिकाही चोख बजावतो.
   अशा अनेकविध भूमिकांमधून मामू आपल्यासमोर प्रकट होतो. जणू एखादा बहुरूपी अनेक रूपे घेऊन अगदी परिपूर्ण भूमिका बजावत असतो. प्रचंड उत्साहाने, तेवढ्याच समर्पक वृत्तीने प्रत्येक काम करणारा, भरभरून आयुष्य जगणारा, प्रत्येक भूमिका तितक्याच ताकदीने बजावणारा हा मामू जणू बहुरूपीच असावा असे क्षणभर वाटून जाते.

(आ) मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: अनेक वर्षे वाट्याला येणारे प्रत्येक काम खंबीरपणे पारपाडणारा मामू आजही संवेदनशीलतेचा हळवा कोपरा सांभाळून असल्याचे दिसते. ही संवेदनशीलता काही प्रसंगी प्रकर्षाने जाणवते. जेव्हा मामूच्या हृदयाच्या सगळ्यांत जवळ असणारी त्याची आई मृत्यू पावते त्यावेळी नातवंडं असलेला मामू आपल्या लहानग्या शाबूच्या वयाचा होऊन डोळ्यांतपाणी आणतो. मूल कितीही मोठं झालं तरी आईशी ते तितकंच जोडलेलं असतं याचा प्रत्यय मामूच्या बाबतीतही येतो. ‘दुनियेत सारं मिळेल सर; पण आईची माया कुणाकडनं न्हाई मिळायची’ या त्याच्या वाक्यातून त्याची आईविषयीच्या संवेदनशीलतेची, त्याच्या हळव्या मनाची प्रचीती येते. आईच्या आठवणीत आपल्या वयाचे भान न राखता मामू लहान मुलाप्रमाणे आपल्या वेदना, आपले दु:ख मांडू लागतो.
    शाळेत जेव्हा केव्हा लहानगी पोरं खेळाच्या अथवा प्रार्थनेच्या वेळी चक्कर येऊन पडतात त्यावेळी मामू तात्काळ त्यांना रिक्षात घालून डॉक्टरकडे नेतो. केवळं आपलं काम आहे म्हणून ते न करता तो आईच्या मायेने या घाबरलेल्या चिमुकल्यांना धीर देतो. ‘घाबरू नकोस. ता बस. काय झालं न्हाई.’ असे म्हणत तो कावऱ्याबावऱ्या पिल्लांना धीर देतो. त्यांची मायेने काळजी घेतो. यातून मामूमधील संवेदनशीलतेची प्रचीती येते.

(इ) मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा.
उत्तर: ‘मामू’ म्हटलं, की समोर अवतरतो तो संस्थान व लोकशाही अशी दोन्ही राज्ये पाहिलेला, अनुभवलेला आणि भोगलेला, चुन्याच्या निवळीसारख्या पांढऱ्या दाढीचा उत्साही माणूस. आपल्या दीर्घ अनुभवाची साथ देणारी ही पांढरी दाढी म्हणजे त्याच्या आजवरच्या प्रवासाची साक्षीदार. आपल्या आगळ्यावेगळ्या मात्र नीटनेटक्या पोशाखामुळे वेगळेपणाने उभारून येणारा एक शिपाई म्हणजे मामू. डोक्यावरील अबोली रंगाचा फेटा, अंगात असणारा नेहरू शर्ट व त्यावर गर्द निळ्या रंगाचे जाकिट परिधान करणारा मामू त्याच्या जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचे एक जुने पॉकेट वॉचठेवायला कधी विसरत नसे. त्याच्या पेहरावातील हा घटक त्याचा वेगळेपणा उचलून धरताना दिसतो. खाली घेर असलेली आणि घोट्याजवळ चुण्या असलेली तुमान आणि पायात जुनापुराणा पंपशू असा ठरलेला पोशाख मामूचे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभे करतो. त्याच्या या पेहरावातून त्याचा साधेपणा आणि त्या साधेपणात असलेले वेगळेपण लक्षात येते.
     मामूच्या पेहरावात जितका साधेपणा होता तितकाच साधेपणा त्याच्या वागण्यातही होता. तो पैशाने श्रीमंत नसला तरी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने, माणुसकीने त्याने पैशाने आणि मानाने मोठी असलेली अनेक लोकं जोडली होती. धर्म, जात, गरिबी, श्रीमंती अशी कोणतीही भिंत त्याच्या मनात नव्हती त्यामुळेच हे सारे भेद कधी त्याच्या मोकळ्या मनाला शिवलेलेही दिसत नाहीत.
     ‘मामू’, मामू म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा, देशप्रेम, नम्रपणा, सेवाभावी वृत्ती, दूरदृष्टीपणा, सहृदयता, माणुसकी, जबाबदारपणा, हुशारी, कर्तव्यदक्षता, उत्साह या साऱ्या गुणांचे  अजबगजब रसायनच.

(४) अभिव्यक्ती.

(अ) ‘मामू’ या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तरः ‘मामू’ या पाठात लेखक शिवाजी सावंत यांनी साधी, सरळ, सोपी भाषा वापरली आहे. विविध रूपके, ओघवती भाषाशैली, संवादात्मक भाषेचा वापर, समर्पक प्रतीकांचा उपयोग यांमुळे पाठ अधिक वाचनीय झाला आहे. ‘चैतन्याचे छोटे कोंब’, ‘अवघड कोवळे कंठ’ अशी रूपके वापरून लेखकाने या पाठाला भाषिक वैभवाने समृद्ध केले आहे. मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी अशा चारही भाषांचा उत्तम संयोग या पाठात झालेला दिसून येतो. लेखक शिवाजी सावंत यांनी निरनिराळ्यया गोष्टींना दिलेल्या उपमा भाषासमृद्धीची जाणीव करून देतात. उदा. मामूची सफेद दाढी
चुनेवाणाची होती. ‘मामू’ या पाठात मामूच्या हातांना दिलेली अलिबाबाच्या हाताची उपमा म्हणजे लेखकाने साधलेला कल्पकतेचा भाषिक आविष्कारच म्हणावा लागेल. घंटेला लावलेले ‘थोराड’ हे विशेषण त्या निर्जीव घंटेवर मनुष्यपणाचा आरोप करताना दिसते. यामुळे, त्या घंटेच्या बाबतीतील तिचा भव्यपणा, तिचे जुनेपण एका शब्दात अधोरेखित होते. ‘बदलत्या काळाची पावलं ओळखतो’ सारख्या वाक्यात काळावर मानवी कृतींचा आरोप केलेला दिसतो. येथे चेतनगुणोक्ती अलंकार साधला गेल्याने हे वाक्य अधिक बोलके झाल्याचे दिसून येते. पाठात ‘इशारत मिळणे’, ‘पवित्रा घेणे’, ‘चौवाटा पांगणे’ इत्यादी वाक्‌प्रचारांच्या चपखल वापरामुळे भाषासौंदर्यात भरच पडली आहे.
      शब्दशक्तींच्या उत्तम वापराने हा पाठ समृद्‌ध झाला आहे. ‘शब्द खाली पडत नाही’ अशा वाक्‍यांमधून लेखकाने लक्ष्यार्थ साधलेला दिसतो.
      प्रस्तुत पाठात वीर रस, करुण रस, शांत रस यांची प्रचीती येते. या रसांच्या सुरेख संयोगातून हा पाठ आशयघन होऊन वाचकांपुढे प्रकट होतो. अशा रीतीने ‘मामू’ हा पाठ म्हणजे भाषासौंदर्याचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल.

(आ) मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.
उत्तरः ‘मामू’ या सर्वसामान्यांतील असामान्य माणसाविषयी लिहिताना लेखक शिवाजी सावंत यांनी मामूच्या स्वभावातील अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. मामूच्या व्यक्तिमत्त्वाला प्रेमळपणा, मायाळूपणा,संवेदनशीलता, देशप्रेम, स्वामीनिष्ठा, जबाबदारपणा, समाधानी वृत्ती, माणुसकी, धर्मसहिष्णुता, दुसर्‍याला मदत करण्याची, आधार देण्याची वृत्ती, दूरदृष्टीपणा, चिकाटी असे अनेक आयाम दिसतात.
     मामूचा स्वभाव मुळातच प्रेमळ, मायाळू आहे. त्याचा जीव त्याच्या शाळेतील मुलांमध्ये वसतो. मुलांमधील चैतन्य पाहून त्याला समाधान मिळते. देशप्रेम हे मामूच्या नसानसांत भिनल्याचे दिसून येते. राष्ट्रगीताचा सन्मान, ध्वजवंदनेची त्याची पद्धत यांवरून त्याच्यातील देशप्रेमाची झलक दिसून येते. संस्थानिकांच्या काळात प्रचंड शारीरिक श्रम कोणत्याही तक्रारीविना करताना पाहून त्याच्यातील स्वामिनिष्ठता, कर्तव्यनिष्ठा आपणांस लक्षात येते. कोणत्याही प्रकारचा कमीपणा न मानता समोर दिसेल ते काम कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता करणे यातून त्याच्यातील कष्टाळूपणा व समाधानी वृत्तीचे दर्शन घडते. मामू जेवढा उत्साही, कष्टकरी आहे तेवढाच तो स्थितप्रज्ञ आणि जबाबदारही आहे. आपल्या मुलांवरील संस्कार, त्यांच्या शिक्षणाप्रती असलेली जागरूकता, त्यांच्या भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी यांवरून त्याच्यातील जबाबदार बापाची ओळख होते. शाळेतील आजारी असणाऱ्या लहानग्या मुलांना ‘मामू’ आई बनून माया देतो, मुलं घाबरलेली असताना त्यांना धीराने घ्यायला शिकवतो. त्याच्यातील ममता येथे प्रतीत होते; मात्र मुलांना ताठपणे उभे राहायला शिकवणारा कणखर ‘मामू’ आईच्या आठवणींमुळे अगदी लहान मुल होऊन रडू लागतो. यावरून त्याच्यातील संवेदनशीलतेची जाणीव होते. मामू धर्मापेक्षा माणुसकी जपणारी, माणुसकीला सम्मान देणारी व्यक्‍ती असल्याने त्याने अनेक माणसं स्वत:भोवती जोडली आहेत. मामूकडे असलेले ज्ञान, मग ते उर्दू भाषेचे असो, वैद्यकीचे असो वा शाळेतील कोणत्याही विषयाचे असो, तो सातत्याने ते वाटत राहतो. इतरांना समृद्ध करत राहतो. असा हा मामू आपल्या या आगळ्यावेगळ्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे साऱ्यांच्याच मनावर राज्य करतो.

(इ) ‘माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे!’, या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: माणुसकी हा मानवाचा मूलधर्म आहे. जर माणसामधून तीच वजा केली, तर उरतो तो इतर प्राण्यांप्रमाणे एक सर्वसामान्य प्राणी. तिच्याशिवाय माणसाचा विचारच अशक्य आहे.
     माणसामाणसांमध्ये धर्म, जात, वंश, वर्ण, श्रीमंती, गरिबी अशा अनेक कारणांमुळे मानवानेच भेद निर्माण केले आहेत. या आणि अशा अनेक कारणांच्या भिंती मानवामानवामध्ये बांधलेल्या आहेत. या साऱ्या भेदाभेदांच्या पलीकडे असते ती ‘माणुसकी’. या भिंती माणसाला अडवतात; पण त्या माणुसकीला अडवू शकत नाहीत. जगभरातील माणूस परस्परांमधील सारे भेद विसरून एकमेकांशी बांधला जातो तो या माणुसकीच्या बंधानेच. माणुसकी नाही, तर मानव नाही हे वास्तव आहे.
     माणूस श्रीमंत आहे, की गरीब; तो मनाने मोठा आहे, की लहान; सुंदर आहे, की कुरूप; हिंदू आहे, की मुस्लिम हे सारे वाद संपवते ती माणुसकी. ती समोरच्या माणसाच्या दु:खाने दु:खी होते, सुखाने सुखावते, म्हणूनच मला वाटते, की मानवाला मानव म्हणून जगायला शिकवणारी ही ‘माणुसकी’ मानवापेक्षा लहान असूच शकत नाही.

error: Content is protected !!