३.अशी पुस्तकं

कृती

(१)(अ)तुलना करा.

उत्तर:

(आ) कारणे लिहा.

(अ) ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण…
उत्तर: पुस्तकांवर, ग्रंथांवर अपार श्रद्धा असलेल्या लेखकाने पुस्तकांना छापलेले चोपडं समजणारी, त्यांच्याशी निर्दय-चाळा करणारी अनेक ‘पुस्तकशत्रू’ मंडळी पाहिली, अनुभवली होती. त्यामुळे, एका ग्रंथप्रेमी माणसाला आपली जिवापाड जपलेली पुस्तकं इतरांना देताना होणारी त्याची तळमळ, त्याला वाटणारी काळजी, त्याची व्याकुळता यांची लेखकास जाणीव होती. शिवाय, पुस्तकाच्या हाताळणीविषयी त्या ग्रंथप्रेमी माणसाने दिलेल्या सूचना अगदी रास्त होत्या.

(आ) ‘प्रत्यक्ष परमेश्‍वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा निश्‍चय पुस्तकप्रेमीने केला, कारण……
उत्तर: काही दिवसांपूर्वी पुस्तकप्रेमीकडून एका कवीने वाचायला नेलेली दोन पुस्तके गिळंकृत केली होती ती आपण घेतलीच नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.

(इ) ‘रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे’, कारण ……..
उत्तर: उत्तम साहित्यकृती ही जीर्ण होऊ घातलेल्या जीवनशक्‍तीला चैतन्याने न्हाऊ घालत असते. असे कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य वाचकाला कधीच म्हातारे होऊ देत नाही.

(इ) कृती करा.

(२) अर्थ स्पष्ट करा.

(अ) दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.
उत्तर: ‘दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे’ या म्हणीचा अर्थ ‘एकदा अद्दल घडल्यावर मनुष्य अगदी साध्या गोष्टीतही सावाधगिरी बाळगतो’ असा होतो. या म्हणीचा प्रत्यय प्रस्तुत पाठातील एका ग्रंथप्रेमी वाचकास आलेला दिसतो. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या या ग्रंथप्रेमी माणसाची जिवापाड जपलेली दोन पुस्तके एका कवीने वाचायला म्हणून नेली. पंधरा दिवस वाट पाहून ती परत मागितल्यावर त्या कवीने पुस्तके नेल्याचे नाकबूल केले. पुस्तकप्रेमी वाचकास अत्यंत प्रिय असलेली पुस्तके त्याने गिळंकृत केल्यामुळे त्याला प्रचंड मोठा धक्का बसला होता. त्यामुळे, या घटनेनंतर अपल्याकडील पुस्तकरूपी संपत्ती इतर कोणाला देण्याची हिंमत त्याला होत नव्हती. पूर्वीच्या या कटू अनुभवामुळे लेखकाला आपली पुस्तके देताना पुस्तकप्रेमीने बाळगलेल्या सावधगिरीतून वरील म्हण प्रत्ययास येताना दिसते.

(आ) पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.
उत्तर: सासरी गेलेली मुलगी जेव्हा आपल्या माहेरी सणावाराप्रसंगी परतते त्यावेळी घर आनंदाने फुलून जाते. तिची सारी हौसमौज पूर्ण केली जाते. बारीकसारीक प्रत्येक गोष्टीत तिची काळजी घेतली जाते. तिला कोणताही त्रास होणार नाही, ती सतत आनंदात असेल याची काळजी घेतली जाते. त्याप्रमाणेच पुस्तकप्रेमी माणसाने लेखकाला दिलेल्या पुस्तकाचीही काळजी घेतली जाईल याचे आश्‍वासन लेखक त्याला देतो. पुस्तकाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा घडणार नाही, त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल, त्याची योग्यप्रकारे हाताळणी केली जाईल, कोणतीही हयगय होणार नाही असे आश्‍वासन लेखक पुस्तकप्रेमीला देतो. मुलगी माहेरी आपल्या आई-वडिलांच्या सहवासात जेवढी सुरक्षित असते तेवढेच सुरक्षित हे पुस्तक लेखकाच्या हाती असेल, याची खात्री हे वाक्य करून देते.

(३) व्याकरण.

(अ) सूचनेनुसार सोडवा.

(१) ‘चवदार’ सारखे शब्द लिहा.
उत्तर: दमदार, धारदार, बहारदार, हवालदार, रखवालदार, जबाबदार, रसदार, कसदार, दाणेदार, भरदार

(आ) शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहा. उदा., 'उत्तेजक'

उत्तर: प्रेरक, मारक, तारक, लेखक

(इ) या शब्दगटातील विशेषणे ओळखा.

(४) स्वमत.

(अ) वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
उत्तर: विचारप्रवण करणारे, विविध विचार मांडणारे, विचारपूर्वक लिहिलेले साहित्य म्हणजे वैचारिक साहित्य होय. या वैचारिक साहित्यात कैद असलेले विचारानुभव हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यातून नवनव्या जीवनाच्या प्रेरणा वाचकास मार्ग दाखवतात. हे वैचारिक साहित्य केवळ जीवन कसे आहे याचे चित्रण करत नाही, तर याबरोबरच उत्तम जीवन कसे जगावे, समृद्ध जीवनाचा आस्वाद कसा घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन करते. ते मानवात जगण्याची ऊर्मी निर्माण करते. हे साहित्य कधी माणसाला माणुसकीचा परिचय करून देते, तर कधी जीवनावश्यक मूल्ये उदा. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादींवर भाष्य करते. कधी आपल्यात कैद तीव्र  विचारांद्वारे; धर्म, जात, प्रांत, भाषा, परंपरा यांच्या नावाखाली पायात घातलेल्या बेड्या तोडायला प्रेरित करते. या वैचारिक साहित्यातून मानवाला मानवतेची मूल्ये शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. हे साहित्य वास्तववादी विचार मांडत असल्याने सुखाबरोबर दु:खाचीही अनुभूती याद्वारे मिळत असते. त्याचा अनुभव केवळ व्यापक आणि उदार वाचकांना घेता येतो.
    वैचारिक साहित्य स्वत:मध्ये हरवत चाललेल्या माणसाला भानावर आणण्याचे कार्य करते. यातील अनुभव प्रसंगी हसवतात, रडवतात, मार्गदर्शन करतात, आनंद देतात एकंदरीत वैचारिक साहित्यात दडलेले अनुभव आपणास जीवनाचा अर्थ सांगतात. ते उत्तम प्रकारे जगण्याकरता, त्यात उत्तम प्रकारे रंग भरण्याकरता वाचकांना प्रेरणा देतात.

(आ) पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी ‘अशी पुस्तकं’ या पाठात पुस्तकांचे महत्त्व, मानवाच्या जडणघडणीतला त्यांचा हातभार आपल्या जीवनातील काही प्रसंगांच्या माध्यमातून मांडला आहे.
    लेखकाच्या मते पुस्तकं ही मानवाचे सर्वांत जवळचे मित्र असतात. ते कधीच आपल्या वाचकास एकटे पडू देत नाहीत. ते सतत आपल्या मित्रासोबत विचारांच्या रूपाने राहतात. ही पुस्तकं जीवनाला चैतन्य मिळवून देणारी असतात. त्यांच्या केवळ स्पर्शानेही अलौकिक सुख प्राप्त होते. निराशेच्या वेळी ही पुस्तकं आपल्याला दु:खातून, निराशेतून अलगद बाहेर काढतात.
    जीवन कसे जगावे याचे उत्तम मार्गदर्शन ही पुस्तकं करत असतात. त्यांच्यात मानवाला झपाटून टाकण्याची विलक्षण ताकद असते. ही पुस्तकं आपल्यातील ज्ञानरूपी, आनंदरूपी सुगंध वाचकाच्या मनात दीर्घकाळ दरवळत ठेवतात. पुस्तकांचे वाचन करणे ही उत्तेजक आणि आनंददायक प्रक्रिया आहे. तिची नशा शब्दांत वर्णन करता न येणारी आहे.
    लेखकाच्या मते पुस्तकं माणसाला घडवतात; पण त्याचबरोबर माणसाला उद्‌ध्वस्थ करण्याची ताकदही त्यांच्यात असते. ही पुस्तकं माणसाला जगायला शिकवतात. विविध मूल्यांची जोपासना कारायला शिकवतात. ही पुस्तकं मानवाला बंधनं तोडून मुक्‍तपणे जीवनाचा आस्वाद घ्यायला शिकवतात. या पुस्तकांतून आनंदाबरोबर दुःखाचीही अनुभूती येते. या साऱ्याचा अनुभव तेव्हाच घेता येतो जेव्हा ही पुस्तकं रसिकतेने वाचली जातात. अशा या मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या पुस्तकांशी निर्दयीपणे न वागता त्यांची थोडी काळजी घेण्याची गरज आहे असे लेखक या पाठातून सुचवतो.

(इ) हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर: हेमिंग्वेच्या साहित्याचे वाचन केल्यावर त्यातून त्याच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा वाचकास परिचय होतो. हेमिंग्वेच्या मते नियती ही प्रचंड शक्तिशाली, अतिबलाढ्य आहे. तिच्यासमोर मानव अगदी दुबळा, दुर्बल आहे. ती माणसाला सतत आपल्या तालावर नाचवण्याकरता प्रयत्नशील असते; मात्र मानवाने कधीही तिच्यासमोर हार मानू नये. आपल्या आशावादाच्या, आपल्या महत्त्वाकांक्षेच्या, आपल्या दुर्दम्य आकांक्षेच्या, आपल्या संघर्षशीलतेच्या बळावर तो कोणतीही अशक्यप्राय गोष्ट सहज शक्य करू शकतो याचे स्मरण ठेवावे. नियती माणसासमोर अनेक आव्हाने, अनेक संकटे उभी करत असते; पण मानवाने हार न मानता या संकटांना आव्हानांना सामोरे गेल्यास प्रारब्धाशी लढा देता येतो. या नियतीच्या हुलकावण्यांनी खचून न जाता नव्या जोशाने त्याने प्रयत्न करत राहिल्यास या नियतीला पराभूत करता येऊ शकते. नियतीने चालवलेले जीवन-मृत्यूचे चक्र सातत्याने सुरू असते. तिने फेकलेल्या मृत्युरूपी जाळ्यात न फसता ते जाळे आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने फाडून, तोडून टाकावे आणि मुक्तपणे, निर्धास्तपणे या जीवनाचा उपभोग घ्यावा. एकूणच, मानवाने आपल्याला कमी न लेखता, नियतीसमोर हार न मानता सतत प्रयत्नशील राहावे असा दृष्टिकोन हेमिंग्वे आपल्या साहित्यातून प्रकट करतो.

(५) अभिव्यक्ती.

(अ) ‘उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: उत्तम साहित्यकृती ही चिरतरुण असते. तिचं डोळसपणे, रसिकपणाने केलेले वाचन वाचकास आयुष्यभर पुरेल एवढी ज्ञानाची, आनंदाची शिदोरी मिळवून देते. अशा साहित्यकृतीचे वाचन करताना नकळतपणे तिच्यासोबत भावबंध जोडले जातात. उदा. ‘ज्ञानेश्‍वरी’ हा मराठी साहित्यविश्वातील साहित्याचा सर्वोत्तम नमुना मानला जातो. ही ज्ञानेश्‍वरी वाचकाच्या, अभ्यासकाच्या मनाचा ठाव घेते. तिच्यातील विचार, भावना मनात खोलवर रुजल्या जातात. या साहित्यकृतीच्या वाचनाने वाचकाच्या मनाची, विचारांची, भावनांची जडणघडण होते. नकळतपणे मनावर या कलाकृतीचे संस्कार होत असतात. ज्ञानदेवांच्या अथांग ज्ञानसागराचा निखळ आनंद आपणांस घेता येतो. त्यातील भावना जन्मभराकरता मनात कैद केल्या जातात. जेव्हा केव्हा या भावनांची, विचारांची आपणास गरज भासते तेव्हा ते नकळतपणे आपल्या सोबत वावरत असल्याची जाणीव आपल्याला होते. त्यामुळे, रसिकवाचकास कधीच एकटेपणा जाणवत नाही. या साहित्यरूपी मित्राची साथ त्याला आयुष्यभरासाठी लाभलेली असते. हा मित्र कधी आपली साथ सोडत नाही. उलट ज्ञानेश्‍वरीसारखी कलाकृती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या, वाईटाचा परिचय करून देण्यास, सत्कर्म करण्यास प्रेरित करते.

(आ) ‘निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर: सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. यात मानव तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने अनेक गोष्टींपासूनचे त्याचे नाते तुटल्याचे दिसून येते. त्यातील एक महत्त्वाची पण आता अनेकांपासून दुरावलेली गोष्ट म्हणजे वाचन आणि पुस्तके. आंतरजालामुळे आपल्यासमोर माहितीचा खजिना खुला झाला असला तरीही आपल्याला हवी तेवढी, मोजकीच माहिती मिळवण्याकडे आपला कल असतो. त्यामुळे, अवांतर वाचन करणे आता दुरापास्त होत आहे. थोड्या-थोडक्या माहितीकरता अनेकविध पुस्तके चाळणे, त्यातील नोंदी घेणे यांमुळे वाचन वाढून ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या जात. पुस्तकांच्या सुगंधात हरवून जाऊन ज्ञानसागरात तरण्यातील गंमतच न्यारी होती; मात्र आता पुस्तकात रमणारा, त्यांचे महत्त्व जाणल्याने त्यांची काळजी घेणारा वाचकवर्ग मिळेनासा झाला आहे. पुस्तकांच्या सहवासात रमणारी, त्यांच्यातील अर्थसौंदर्य, भावसौंदर्य, विचारसौंदर्य अनुभवणारी, वाचनातच सारं सुख मानणारी वाचकपिढी आता या माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात अडकताना दिसत आहे. त्यामुळे, पुस्तकांवर श्रद्धा असणारी, पुस्तकांशी नाळ जोडलेली, पुस्तकं जगणारी निष्ठावंत मंडळी आता अगदी नाममात्र उरल्याची जाणीव मनाला चटका देऊन जाते.

error: Content is protected !!