२. प्राणसई

कृती

(१) (अ) चौकटी पूर्ण करा.

(आ) कारणे लिहा.

(१) बैलांचे मालक बेचैन झाले आहेत, कारण………
उत्तर: उन्हाळा संपत आला तरी उन्हाचा ताप असह्य होत आहे. पाऊस पडण्याची काही चिन्हे दिसत नाहीत, अशा वेळी मुक्‍या जनावरांना चारा-पाण्याची कमतरता भासू शकते, उन्हाच्या तीव्रतेचा फटका जनावरांना बसू शकतो. तसेच, पाऊस पडला नाही, तर शेतीभाती पिकणार कशी, या काळजीपोटी बैलांचे मालक बैचेन आहेत.

(२) बाळांची तोंडे कोमेजली, कारण…………
उत्तर: उन्हाचा तडाखा काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा वेळी तीव्र उन्हाच्या झळांमुळे लहानग्या बालकांचे चेहरे सुकले आहेत. त्यांना ही उष्णता सोसवेनाशी झाली आहेत.

(इ) कृती करा.

(२) (अ) खालील काव्यपक्तींचा अर्थ स्पष्ट करा.

(१) ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
उत्तर: प्रस्तुत काव्यपंक्ती कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘प्राणसई’ या कवितेतील असून यात पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कवयित्रीने आपल्या प्रियसखी घनावळीला/मेघमालेला पाऊस आणण्याचे आवाहन केले आहे.
    प्रस्तुत काव्यपंक्तींत, उन्हाचा असह्य ताप शांत करण्यासाठी, सर्वत्र आनंदीआनंद फुलवण्यासाठी तू धावतपळत ये, अशी आर्जवयुक्त विनवणी कवयित्री मेघमालेला करत आहे. मेघमाला वरुणराजासोबत येईल आणि शेतावर बरसेल तेव्हा शिवार हिरवाई पांघरेल. शेतीभाती पिकेल. हिरवाईच्या रूपाने समृद्धी येईल व बळीराजाचे स्वप्न साकार होईल, असा आशय या काव्यपंक्तींद्वारे सूचित होतो.

(२) तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं
उत्तर: प्रस्तुत काव्यपंक्ती कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘प्राणसई’ या कवितेतील असून यात पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कवयित्रीने आपल्या प्रियसखी घनावळीला/मेघमालेला पाऊस आणण्याचे आवाहन केले आहे.
    येथे कवयित्री तिच्या प्राणप्रिय सखीला – मेघमालेला सांगत आहे, की तुझ्या येण्याने सर्वत्र आनंदीआनंद पसरेल, शिवारे हिरवाईने सजतील. त्यामुळे, तू वरुणराजाला घेऊन, शेतांवरून झुलत झुलत थेट माझ्या घराजवळ ये कारण तिथे तुझे भाचे तुझी आतुरतेने वाट पाहत असतील. तुझ्या आगमनाने ते खूपच आनंदी होतील. ते तुझ्या जरीसारख्या चमचमत्या सरींमध्ये चिंब भिजतील, मनसोक्त बागडतील.
    येथे, कवयित्री प्रियसखी मेघमालेला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देत एका नवीन, प्रेमाच्या नात्याची (मावशी भाच्याच्या) ओळख करून देते.

(३) विहिरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग
उत्तर: प्रस्तुत काव्यपंक्ती कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘प्राणसई’या कवितेतील असून यात पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कवयित्रीने आपल्या प्रियसखी घनावळीला/मेघमालेला पाऊस आणण्याचे आवाहन केले आहे.
    उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याचा काळ जवळ आला, तरी पाऊस पडण्याची काही चिन्हे दिसत नाहीत, तापमानाने इतका उच्चांक गाठला आहे, की गाईगुरांना गोठ्यात बांधून ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही. शेतमालक पावसाच्या चिंतेने बेचैन आहेत. लहान बालकांचे चेहरे सुकून गेले आहेत. पाण्याचा साठाही संपला आहे. विहीर इतकी आटली आहे, की तिचा खोल तळ उघड्या डोळ्यांनीही सहज पाहता येऊ शकतो. तिच्या तळाशी थोडेच पाणी शिल्लक आहे. सूर्यकिरणे पडल्यामुळे ते पाण्याचे गोलाकार भिंग आरशासारखे  चमकताना दिसत आहे, असे वर्णन कवयित्री येथे करते.
    येथे कवयित्री प्रत्ययकारी प्रतिमेच्या आधारे पाण्याच्या टंचाईची समस्या सौंदर्यपूर्ण शब्दांत व्यक्‍त करते.

(आ) खालील तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा.

उत्तर :

(३) काव्यसौंदर्य

(अ) खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

(१) ‘कां ग वाकुडेपणा हा,
              कां ग अशी पाठमोरी?
       ये ग ये ग प्राणसई
              वाऱ्यावरून भरारी’
उत्तर :
प्रस्तुत काव्यपंक्ती कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘प्राणसई’ या कवितेतील असून यात पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कवयित्रीने आपल्या प्रियसखी घनावळीला/मेघमालेला पाऊस आणण्याचे आवाहन केले आहे.
    प्रस्तुत कवितेत कवयित्री सखी मेघमालेला ‘लवकर येण्याचा’ निरोप पाखरांकरवी पाठवत आहे. उन्हाने बेजार झालेल्या गाईवासरांचे, शेतमालकांचे, बालकांचे दाखले देत पाणी टंचाईची भीती व्यक्त करत आहे. पावसाळ्याची पूर्वतयारी झालेली असून शेतीभाती पिकवण्यासाठी, घरदार चिंब भिजवण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, शेतात रमलेल्या सख्याचे कौतुक ऐकण्यासाठी तू ये, अशी नानाप्रकारे आळवणी करून देखील मेघमाला ऐकत नाही. ती मनात अढी धरून, पाठ फिरवून बसली आहे. तिची मनधरणी करण्यासाठी कवयित्री वरील पद्यपंक्ती तिला उद्देशून म्हणत आहे. तिच्या भेटीसाठी आतुर झालेल्या कवयित्रीला तिने वाऱ्यावर स्वार होऊन त्वरेने भेटायला यावे अशी विनवणी कवयित्री येथे करत आहे.
    मेघमालेचा रुसवा काढण्यासाठी कवयित्री तिची जिव्हाळ्याने कशी मनधरणी करते याचे भावरम्य चित्रण येथे आढळते.

(२)  ‘शेला हिरवा पांघर
      मालकांच्या स्वप्नांवर’
उत्तर:
प्रस्तुत काव्यपंक्ती कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘प्राणसई’ या कवितेतील असून यात पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कवयित्रीने आपल्या प्रियसखी घनावळीला/मेघमालेला पाऊस आणण्याचे आवाहन केले आहे.
    बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे पावसाआधी शेतकरी शेतजमीन भाजणे, नांगरणी करणे, आळी रचणे, तण काढणे अशी विविध कामे करत असतात. रात्रंदिवस, उन्हातानात घाम गाळत असतात. पाऊस आल्यानंतर त्यांच्या कष्टांचे चीज होणार असते; पण वरुणराजा वेळेवर बरसला नाही, तर त्यांचे कष्ट, त्यांनी पाहिलेले हिरव्यागार शिवाराचे स्वप्न सत्यात कसे उतरेल? यासाठी कवयित्री आर्जवयुक्‍त भाषेत मैत्रिणीच्या नात्याने मेघमालेला विनवत आहे, की तू लवकरात लवकर शेतांवर बरस, जेणेकरून शेतमालकांची स्वप्ने सत्यात उतरतील.
    येथे कवयित्रीने उत्कट व भावपूर्ण शब्दांत केलेली मेघमालेची आळवणी सूचित होते.

(आ) कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.
उत्तर: ‘प्राणसई’ या कवितेत कवयित्री इंदिरा संत विविध प्रतीकांच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करतात. कवितेच्या सुरुवातीलाच उन्हाचा भयंकरपणा दाखवण्यासाठी जणू काही आभाळात राक्षसीणीने धान्य कांडावे इतके कडक ऊन पडले आहे, अशा अर्थाचे प्रतीक त्या वापरतात. दाही दिशा तप्त झाल्या आहेत. सारी सृष्टी उन्हाने पोळून निघाली आहे. गाईगुरांना गोठ्यात कोंडून ठेवले आहे. रखरखीत उन्हाची तीव्रता न सोसवल्यामुळे लहानग्यांचे फुलांसारखे कोमल चेहरे उन्हाने सुकून गेले आहेत, हे सांगताना कवी ‘कोमेली तोंडे’ हे प्रतीक योजते.
    विहीर आटली आहे हे सांगताना कवयित्री भिंगाचे प्रतीक वापरते. विहिरीचा तळ दिसावा, इतकेसे पाणी भिंगासारखे चकाकताना दिसत आहे, असे ती म्हणते. मेघमालेतून झरणाऱ्या पावसाच्या सरींसाठी ती जरीच्या घोळाचे प्रतीक वापरते. कवयित्रीची मुले मावशीच्या नात्याने मेघमालेच्या जरीच्या घोळाशी खेळतील अशी सुंदर कल्पना कवयित्री येथे करते.
    मेघमाला/घनावळ ही जणू तिची खूप जवळची, जीवश्‍चकंठश्‍च मैत्रीणच आहे अशी कल्पना करत कवयित्री तिच्यासाठी ‘प्राणसई’ म्हणजेच प्राणप्रिय सखीचे प्रतीक योजते.

(इ) ‘कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे’, स्पष्ट करा.
उत्तर: कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘प्राणसई’ या कवितेत पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कवयित्रीने आपल्या प्रियसखी घनावळीला/मेघमालेला पाऊस आणण्याचे आवाहन केले आहे.
    प्राणसई म्हणजेच अत्यंत जीवाभावाची मैत्रीण, प्रिय सखी. प्रस्तुत कवितेत कवयित्री मेघमालेला प्राणसईच्या नात्याने येण्याचे आवाहन करत आहे. प्रियसखीने लवकरात लवकर आपल्याला भेटावे, म्हणून कवयित्री पाखरांकरवी निरोप धाडत आहे. त्यांच्या दृढ मैत्रीची हक्काने आठवण करून देत कवयित्री तिला धावतपळत येण्याविषयी विनवत आहे.
    आपल्या मनाची घालमेल आपल्या जिवलग मैत्रिणीकडे मनमोकळेपणाने व्यक्‍त करावी, त्याप्रमाणे कवयित्री मेघमालेशी संपूर्ण कविताभर जिव्हाळ्याने संवाद साधते. माझे लक्ष घरात लागत नाही तू कधी बरे येशील? असे विचारत कवयित्री आपले अधीर मन तिच्या जवळ मोकळे करते. तिच्या येण्याने सर्वत्र आनंदीआनंद भरून राहील, शेतमालकांची स्वप्ने साकार होतील, तिच्या भाच्यांना मावशीला भेटता येईल, तेही तिच्या येण्याने खूप खुश होतील आणि तिच्या जरीदार घोळांशी खेळत बसतील, अशी भावरम्य कल्पना कवयित्री करते.
      मेघमालेचे आणि कवयित्रीचे नाते इतके उत्कट, जीवाभावाचे आहे, की कवयित्री तिच्यासोबत खूप गप्पा मारणार आहे आणि काळ्या आईची सेवा करणाऱ्या,

शेतात हिरवं स्वप्न फुलवण्याच्या कामात व्यस्त असणाऱ्या आपल्या लाडक्या सख्याची कौतुके ती तिला सांगणार आहे.
मेघमालेवर कवयित्रीचा ‘मैत्रीण’ म्हणून इतका हक्‍क/अधिकार आहे, की तिचा रुसवा काढण्यासाठी कवयित्री तिची मनधरणी करते. वाऱ्याच्या वेगाने मला
भेटायला ये, अशी आळवणी करते.

(४) अभिव्यक्ती.

(अ) तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
उत्तर: कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘प्राणसई’ या कवितेत ग्रामीण भागातील घराघरांत चालणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन केले आहे; परंतु आमच्या शहरात मात्र पावसाळ्यापूर्वीची धांदल थोडी वेगळी असते. उन्हाळा ओसरत आला, की कडक उन्हात वाळत घातलेली सर्व वाळवणे (उदा. विविध धान्ये, सुकी मच्छी, पापड, कुरडया, सांडगे) आवरण्याची घाई दिसून येते. मसाल्याच्या पदार्थांना ऊन दाखवून गिरणीतून मसाले कुटून आणले जातात. लोणची, मुरांबे, पापड इत्यादी बेगमीचे पदार्थ डब्यांत व्यवस्थित भरून ठेवले जातात.
    स्वच्छ धुतलेली, उन्हात वाळवलेली अंथरुण-पांघरुणे, कपाटातील कपडे घड्या घालून कपाटात व्यवस्थित रचून ठेवले जातात. घरादाराला प्लॅस्टिकची आवरणे लावून पावसाच्या आगमनासाठी सज्ज केले जाते.
    आम्हां विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालये सुरू होण्याचे वेध लागतात. त्यामुळे रेनकोट्स, छत्र्या, चपला अशा साहित्याची खरेदी सुरू होते. नवीन गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या घेण्यासाठी दुकानात झुंबड उडते.

(आ) पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
उत्तर: कडक उन्हाने तापलेल्या धरणीवर पावसाच्या सरी बरसल्यावर मातीचा सुंदर सुवास आसमंतात दरवळतो आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागते. पाऊस पडल्यावर परिसरातील धुळीने माखलेली घरे, इमारती, झाडे-वेली सारे चिंब न्हाऊन निघते! सर्व परिसर अंघोळ केल्याप्रमाणे निर्मळ होऊन जातो. झाडांची पाने अधिकच तजेलदार दिसू लागतात. खिडकीतून दिसणारे दूरवरचे डोंगर हिरवेगार होऊन जातात. वातावरण प्रसन्न होते. कधीकधी ऊन-सावलीचा लपंडाव सुरू होतो आणि आकाशात इंद्रधनुष्याची कमान उगवते, ती पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. या काळात रस्त्यावर डराँव-डराँव आवाज कानी पडू लागतो आणि इतके दिवस कुठेतरी गुडूप झालेले बेडूकदादा नजरेस पडतात. गांडुळासारखे निरुपद्रवी कृमी, तसेच माश्यांसारखे विविध कीटक ह्या ॠतूत हमखास आजूबाजूला दिसतात.
    पहिल्या पावसात भिजण्यासाठी, वाहत्या पाण्यात होड्या सोडण्यासाठी आम्ही बच्चेकंपनी अगदी आतुर असतो. रेनकोट्स घातलेली, रंगीबेरंगी छत्र्या घेऊन फिरणारी मुले-माणसे पाहताना रंगीबेरंगी फुलपाखरे भिरभिरल्याचा भास होतो.
    सखल भाग असल्यामुळे जरा पाऊस पडला, की आमच्या परिसरात नेहमी खूप पाणी साचते. इतके, की सर्वांना तुडुंब भरतात आणि मग ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती होते. परिसरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालयांभोवती तळी साचतात. मुसळधार पावसाचा तर आमच्या जीवनवाहिनी रेल्वेलाही जोरदार फटका बसतो.

(इ) पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो ते लिहा.
उत्तर: कडक उन्हाने सारी सृष्टी कोमेजून गेलेली असते. अशा वेळी उन्हाच्या काहिलीमुळे हैराण झालेले जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा एखाद्या क्षणी बरसणाऱ्या वळवाच्या सरी मनात कोण आनंद निर्माण करतात! पावसाच्या आगमनाने सारी सृष्टी आनंदविभोर बनते. तप्त जमीन तृप्त होते. पशू-पक्षी सुखावतात. पावसाची चातकासारखी वाट पाहणारा शेतकरी राजा मनोमन सुखावतो कारण आता त्याने केलेल्या कष्टांचे सार्थक होणार असते. शेतीभाती पिकून त्याने पाहिलेले हिरवे स्वप्न साकार होणार असते.
     पाऊस आला, की गारगार सरींत चिंब भिजायला मिळणार या कल्पनेनेच मुले आनंदित होतात. पावसाच्या पाण्यात कागदी होड्या सोडणे, चिखलात फुटबॉल खेळणे, नाचणे, उड्या मारणे, गाणी गाणे असे मनासारखे उपक्रम करायला मिळल्यामुळे ती भलतीच खूश असतात.
     मेघ दाटून येताच पिसारा फुलवून मोर नाचू लागतो. चोहिकडे आनंदीआनंद पसरतो. सृष्टीचे अनुपम सोंदर्य न्याहाळणारे पर्यटक, धबधब्यांना याच काळात भेटी देतात. वृक्षप्रेमी याच काळात वृक्षलागवडीचे उपक्रम आनंदाने पार पाडतात.
    अशाप्रकारे पशू-पक्षी, झाडे-वेली व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाऊस आल्यावर आनंद होतो.

(५) रसग्रहण

‘प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर: ‘प्राणसई’ या कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेल्या कवितेत ग्रामीण भागातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन आले आहे. उन्हाळा संपण्याच्या व पावसाळा सुरू होण्याच्या दरम्यानचा हा कालावधी आहे. घराघरांत, शेतांमध्ये आवश्यक ती पूर्वतयारी झालेली आहे. कवयित्री मैत्रिणीच्या नात्याने घनावळीला म्हणजेच मेघमालेला/ढगांना पावसाच्या सरी घेऊन लवकरात लवकर येण्यासाठी उत्कटपणे निरोप पाठवत आहे.
    मालकाच्या स्वप्नांवर हिरवा शेला पांघरण्यासाठी, आपल्या भाच्यांशी खेळण्यासाठी मेघमालेने यावे, असे आवाहन करण्यासोबतच कवयित्री पावसाच्या आगमनानंतर स्वत:च्या मनी असणाऱ्या इच्छा, अपेक्षा व्यक्त करते व मेघमालेने वाऱ्यावर स्वार होऊन लवकरात लवकर यावे ही विनंती तिला करते. साध्या, सोप्या शब्दांत केलेली ही पावसाची आळवणी अत्यंत भावरम्य आहे.
    कविता वाचल्यानंतर कवयित्रीच्या मनातील भावभावनांचा कल्लोळ मनाला भिडतो. अत्यंत उत्कट, भावपूर्ण व आर्जवी स्वरांत केलेली ही विनवणी वाचकमनावर ठसा उमटवते. नेमक्या व समर्पक शब्दांच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याचे वैशिष्ट्य या कवितेत आढळते. सहजसोपी शब्दरचना असल्यामुळे कवितेत ‘प्रसाद. हा काव्यगुण आढळतो. त्यांमुळे कवितेचे आकलन सहज होते. चित्रदर्शी, काव्यमय भाषाशैली डोळ्यांसमोर प्रत्ययकारी जिवंत चित्र उभे करते. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय सामावण्याच्या सामर्थ्यामुळे ‘अल्पाक्षरत्व’ हे वैशिष्ट्य या कवितेत दिसून येते.
    प्राणसई, हिरवा शेला, कोमेली तोंडे, जरीचा घोळ, विहिरीच्या तळी असलेले भिंग अशा कल्पक प्रतीक-प्रतिमांमुळे कवयित्रीच्या प्रतिभासंपन्न काव्यशैलीचे दर्शन घडते. सांगावा, हुडा, शेणी, आळी, ठाणबंदी अशा ग्रामीण शब्दांमधून ग्रामीण कृषिजीवनाचे हुबेहुब चित्रण घडते. कोमेली, वाकुडेपणा अशा शब्दांच्या नावीन्यपूर्ण वापरामुळे कवितेत आंतरिक लय साधली गेली आहे.
    ही कविता छंदोबद्ध असून अष्टाक्षरी छंदात गुंफली गेली आहे. प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक साधले गेल्यामुळे कवितेला नादमयता प्राप्त झाली आहे. उदा. तुडुंब-चिंब, भाजून-रचून इत्यादी. गेयता हे या कवितेचे वैशिष्ट्य असून अशा प्रकारच्या रचनापद्धतीमुळे कविता श्रवणसुभग व स्मरणसुलभ बनली आहे.
    ‘घनावळ’ या निर्जीव नैसर्गिक घटकावर मानवी भावभावनांचा आरोप झाल्याने येथे चेतनगुणोक्ती अलंकार साधला गेला आहे, त्यामुळे कवितेची शोभा वाढली आहे. मानवी जीवनातील पावसाचे; किंबहुना पाण्याचे महत्त्व ही कविता अधोरेखित करते. पावसापाण्याअभावी एकंदरीतच जनजीवन कसे विस्कळीत होते, याचे चित्रण येथे केले गेले आहे. तीव्र पाणीटंचाई, तीव्र तापमानवाढ, अवकाळी पाऊस अशा पर्यावरणीय समस्यांवर बोट ठेवतानाच निसर्गासोबत मैत्रभाव जपण्याचा संदेशही ही कविता देते. यातून अप्रत्यक्षपणे, पर्यावरणसंवर्धनाचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून ही कविता मला फार आवडते.