४. झाडांच्या मनात जाऊ

कृती

(१) (अ) योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

(१) पोपटी स्पंदनासाठी म्हणजे –
      (अ)   पोपटी पानात जाण्यासाठी.
      (आ)  उत्साहाने सळसळण्यासाठी.
      (इ)    पानांचे विचार घेण्यासाठी.
उत्तर: पोपटी स्पंदनासाठी म्हणजे – उत्साहाने सळसळण्यासाठी.

(२) जन्माला अत्तर घालत म्हणजे –
      (अ)   दुसऱ्याला आनंद देत.
      (आ)  दुसऱ्याला उत्साही करत.
      (इ)    स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.
उत्तर: जन्माला अत्तर घालत म्हणजे – स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.

(३) तो फाया कानी ठेवू म्हणजे –
      (अ)   सुगंधी वृत्ती जोपासू.
      (आ)  अत्तराचा स्प्रे मारू.
      (इ)    कानात अत्तर ठेवू.
उत्तर: तो फाया कानी ठेवू म्हणजे – सुगंधी वृत्ती जोपासू.

(४) भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे –
      (अ)   दारांना तोरणाने सजवू.
      (आ)  दाराला हलतेफुलते तोरण लावू.
      (इ)    निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.
उत्तर: भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे – निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.

(५) मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे-
      (अ)   निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन.
      (आ)  झाड होऊन फांद्या पसरीन.
      (इ)    झाड होऊन सावली देईन.
उत्तर: मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे – निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन.

(आ) खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.

उत्तर:

(२) (अ) खालील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

(१) झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ
उत्तर: निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याची कवींची मनोमन इच्छा आहे. म्हणून ते म्हणतात की आपण झाडाच्या मनात शिरू आणि पाने जी विचार करतात, तसे आपणच पानांचे विचार होऊ. म्हणजे आपण स्वत:च झाड होऊ.

(२) हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू
उत्तर: कवी म्हणतात की माझ्या ओंजळीमधल्या पाण्यात आकाश उतरले आहे. त्यात जेव्हा ऊन मिसळून हिंदकळते, तेव्हा असे वाटते की जणू सूर्य त्या हातातल्या पाण्यात पोहत आहे.

(आ) खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

(३) काव्यसौंदर्य.

(अ) ‘ पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ दे…’ या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर: ‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी उत्कटपणे वसंतातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांना आवाहन केले आहे.
    वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो. झाडांना नवी पालवी फुटते. ती कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते. अम्लान ताजेपणाची चमक पानांवर झळकते. सदाबहार वसंत ऋतूची चाहूल आधी कोकीळ पक्ष्याला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कुहू कुहू स्वरात गाऊन जगाला सांगतो.
    कवी म्हणतात की, वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडांशी एकरूप व्हायला हवे. त्यांच्या मनात शिरून पानांचा विचार आपणच व्हायला हवे. नवीन पानांमधील या पोपटी पालवीची स्पंदने अनुभवायची असतील, तर आपण स्वत: कोकीळ पक्षी होऊन गायला हवे.
    कोकीळ पक्ष्यांच्या स्वरांतून निसर्गाची एकरूप होण्याची उत्कट व भावपूर्ण अवस्था अतिशय विलोभनीय प्रतीकातून कवीने मांडली आहे.

(आ) ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारा आशय सौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर: कवी नलेश पाटील यांनी ‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेमधून वसंत ऋतूतील निसर्गसौंदर्याचे चित्रण उत्कट व भावविभोर शब्दकळेतून साकारले आहे. स्वत: निसर्गाचे घटक होऊन निसर्गसौंदर्याचा कसा आस्वाद घ्यावा, हे सांगताना कवींनी वेगवेगळी व अनोखी प्रतीके वापरली आहेत.
    बहरलेल्या झाडाचे वर्णन करताना कवी म्हणतात की झाडाच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या बहरलेल्या मोसमांचे साक्षीदार आहेत. झाडाच्या पायथ्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे. म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा पानांतून झाडाखाली झिरपतात त्या वेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्याची नक्षीदार पखरण होते. मग नक्षीलाच जेव्हा पंख फुटतात तेव्हा सावल्यांचेच कावळे आसमंतात उडताना दिसतात.
    ‘ऊन-सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काऊ’ या प्रतिमेतील ऊन- सावली ही प्रतीके सजग होतात. येथे चेतनगुणोक्ती अलंकाराचा लोभसवाणा आविष्कार मनाला प्रसन्न करतो.

(इ) ‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून दाखवा.
उत्तर: ‘झाडाच्या मनात जाऊ’ या कवितेमध्ये कवी नलेश पाटील वसंत ऋतूत फुललेल्या निसर्गघटकांचे लोभसवाणे दर्शन नितांत सुंदर प्रतिमांमधून उलगडून दाखवले आहे. रंग व गंधाच्या या उत्सवात आपणही निसर्गाचा घटक होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊया असे ते सांगतात.
    वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याचे वैभव अनुभवताना कवींना या सौंदर्याची निर्मिती अनोखी व अपूर्व वाटते. या रंगपंचमीमध्ये सारी सृष्टी न्हाऊन निघालेली आहे. हे सृष्टीचे अम्लान सौंदर्य मानवनिर्मित नसून ती ईशवराचीच किमया असावी, असे कवी आत्मीयतेने सांगतात. अवतीभवती आलेले हे आनंदाचे उधाण म्हणजे विधात्याची स्वत:ची गाणी आहेत. ही सर्व देवाजीची करणी आहे. हे अनोखे सौंदर्य पाहून कवींच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. ते म्हणतात की, या झऱ्यात वाहणारे पाणी आणि डोळ्यांत तरळलेले पाणी वेगळे नाही. ते एकच आहे. या झऱ्यातलेच पाणी माझ्या डोळ्यांत तरळले आहे, अशी एकतानता नि अद्वैत घडले आहे.
    ‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या भावपूर्ण प्रतिमेतून कवींनी निसर्गाशी घडलेली एकरूपता सजीव साकार केली आहे. मानव हा निसर्गाचेच अपत्य आहे, याचे प्रत्यंतर या प्रतिमेतून दिसून येते.

(४) अभिव्यक्ती.

१) ‘तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात’ , अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
उत्तर: माझे झाडांवर नितांत प्रेम आहे. मला नेहमी झाडाच्या मनात शिरावेसे वाटते. एकदा मी खरेच झाडाच्या मनात शिरलो. मी त्याच्या मुळांपाशी पोहोचलो. त्यांना विचारले की, तुम्ही सतत मातीखाली असता. वरती दिसत नाहीत. तुम्हांला तुमच्या वरच्या पिसाऱ्याविषयी काय वाटते? मुळे म्हणाली – ” मातीतच आमचा निवास! आम्ही खाली खोलवर जातो. जीवनरस घेतो आणि वरच्या अवयवांना पुरवतो. म्हणून तर फांद्या झुलतात, पाने डुलतात नि फुले फुलतात. आम्ही जरी मातीत असलो; तरी वरच्या अवयवांचे सर्व लाड आम्हीच पुरवतो. मातीतला गंध आम्ही फुलात ओततो. पानांची झळाळी मातीमुळेच दिसते. हे आमचेच वंशज असल्यामुळे त्यांच्या सुखात आमचे सुख सामावलेले आहे. सर्व ऋतूंत आमचे फुलणे, कोमेजणे सुरू राहते. आमची जीवनेच्छा दृढ आहे. त्यामुळे आम्ही कृतार्थ आहोत.
    झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनोगत मी जाणून घेतले नि मनोगताल शीर्षक दिले – ‘मुळांची मुले!

(२) निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
उत्तर: मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोसले जाते. आपल्या आजूबाजूला अफाट निसर्ग पसरलेला आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अतूट संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो नि चंद्र शीतल चांदणे देतो. डोंगरातून नदी उगम पावते नि काठावरच्या गावांची तहान भागवते. ही धरती मानवांसाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते. पशु-पश् पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी श्‍वास जगवते. सारा आसमंत मानवी जीवनासाठी नि:स्वार्थी वृत्तीने दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या निसर्गाविषयी मानवी जीवन कृतार्थ होऊन सदैव कृतज्ञ राहिले आहे.

(५) 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेचे रसग्रहण करा.

उत्तर:

    ‘झाडांच्या मनात जाऊ’ ही कवी नलेश पाटील यांची कविता ‘हिरवं भान’ या कवितासंग्रहातून घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे.
    झाडांच्या मनात शिरून त्याचे हृद्गत जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाणे दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे, याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके व प्रतिमा यांतून दृग्गोचर केले आहे.
    ‘फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यांत झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ’ अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकांतून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. ‘ईश्‍वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक’ ही कवींची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे.
    निसर्गचित्र रेखाटताना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पावून निसर्ग डोळ्यांत व हृदयात साठवतो आहोत, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवींचे शब्दसामर्थ्य अनोख्या व उल्हसित प्रतिमांतून प्रकट झाले आहे.
    ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रासाद व माधुर्य या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली.